भारतीय इंग्रजी कादंबरीकार स्त्रियांचा आणि त्यांच्या निवडक कादंबऱ्यांचा परिचय आपण ‘ऐसपैस’ या ब्लॉगमधून गेले सहा महिने करून घेतो आहोत.आजच्या ब्लॉगमध्ये आपण किरण देसाई या भारतीय इंग्रजी कादंबरीकार महिलेचे चरित्र आणि साहित्यिक कर्तृत्व थोडक्यात समजून घेणार आहोत.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

किरण देसाई यांचा जन्म ३ सप्टेंबर १९७१ रोजी नवी दिल्ली येथे झाला. प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार अनिता देसाई यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या वडीलांचे नाव अश्विन देसाई. अनिता देसाई यांच्याबद्दल आणि त्यांच्या निवडक तीन कादंबऱ्यांबद्दल आपण यापूर्वीच्या ब्लॉग्जमध्ये जाणून घेतले आहे.

किरण देसाई भारतीय आहेत.वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत किरण देसाई यांचे शालेय शिक्षण भारतात मुंबई आणि पंजाबमधील एका शहरांत झाले.त्यानंतर त्या आईसोबत वर्षभर इंग्लंडमध्ये होत्या.आईच्या साहित्यिक कामगिरीचा किरणवर निश्चितच प्रभाव पडला. नंतर १९८६ मध्ये किरण देसाई यांनी आईबरोबर अमेरिकेत जायचे ठरवले.अनिता देसाई यांना अमेरिकेतील मॅसॅच्युसेट विद्यापीठात मानाचे प्राध्यापकपद मिळाले होते.किरण यांनी अमेरिकेतील बेनिंगटन महाविद्यालयात पदवीपर्यंत शिक्षण घेऊन पुढे उच्चशिक्षण कोलंबिया विद्यापीठात पूर्ण केले.सर्जनशील लेखन हाच त्यांचा अभ्यासविषय होता.

१९९८ मध्ये किरण देसाई यांची पहिली कादंबरी ‘हालाबल्लू इन दी ग्वावा आर्चड’ प्रकाशित झाली.सलमान रश्दी यांच्यासारख्या मान्यवर लेखकाकडून किरण देसाई यांना त्यांच्या या पहिल्याच कादंबरीबद्दल कौतुकाची थाप मिळाली.या कादंबरीला ‘सोसायटी ऑफ ऑथर्स’कडून राष्ट्रकुल देशातील युवकांनी लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट नवीन कादंबरीसाठी दिला जाणारा ‘बेटी ट्रास्क पुरस्कार’ मिळाला. ‘हालाबल्लू इन दी ग्वावा आर्चड’ ही कादंबरी भारतातील एका खेड्यात घडलेल्या खऱ्या गोष्टीवर आधारित कादंबरी होती. पंजाबमधील एका खेड्यातील माणसाने घरातील जबाबदाऱ्या टाळण्यासाठी पेरूच्या झाडावर चढून बसण्याची युक्ती शोधली आणि तो असा पेरूच्या झाडावर वास्तव्य करतो हे पंचक्रोशीत कळल्यावर लोकांना त्याच्यात काहीतरी दैवी गुण आहेत असे वाटू लागले ! आणि मग लोकांनी त्याला पंधरा वर्षे झाडावरून खाली उतरूच दिले नाही. तो झाडावरचा बाबा बनला ! भारतीय लोकांच्या या अंधश्रद्धाळूपणावर उपरोधिक भाष्य करणारी कादंबरी असे किरण देसाई यांच्या  ‘हालाबल्लू इन दी ग्वावा आर्चड’ या कादंबरीचे वर्णन करता येईल.

‘हालाबल्लू इन दी ग्वावा आर्चड’ या कादंबरीनंतर किरण देसाई यांची ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ ही कादंबरी २००६ मध्ये प्रसिद्ध झाली. या कादंबरीला जगातील सर्वोत्कृष्ट कादंबरीला दरवर्षी दिला जाणारा ‘मॅन बुकर’ हा मानाचा पुरस्कार मिळाला. तसेच ‘नॅशनल बुक क्रिटीक्स सर्कल’ या संस्थेकडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही २००६ साली ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीला मिळाला.त्यामुळे केवळ ३५ व्या वर्षी किरण देसाई या इंग्रजीतील एक मान्यवर कादंबरीकार झाल्या.

‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीच्या कथानकाचा अवकाश भारतातील नेपाळच्या सीमेवरील कॅलिंगपॉंग हे थंड हवेचे ठिकाण , अमेरिकेतील न्युयॉर्क शहर व हार्लेममधील बकाल वस्ती हा आहे.भारतातून अमेरिकेत बेकायदेशीर मार्गाने गेलेला बिजू तेथील वेगवेगळ्या उपहारगृहांत राबत राहतो.त्याचे आणि त्याच्यासारख्या अनेक भारतीय तरूणांचे अमेरिकेत होणारे शोषण दाखवणे हा ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीचा एक हेतू आहे.तसेच ब्रिटीशांची राजवट संपली तरी भारतातील एका विशिष्ट वर्गातील माणसांवरील इंग्रजी भाषा आणि ब्रिटीश  संस्कृतीचा प्रभाव कसा संपलेला नाही हेही ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ या कादंबरीला दाखवायचे आहे.याही कादंबरीत उपरोधिक शैली हे किरण देसाई यांच्या कथनाचे वैशिष्ट्य ठरते.

किरण देसाई या समाजमनस्क लेखिका आहेत. बीबीसी रेडियोने विविध सामाजिक विषयांसंदर्भात आयोजित केलेल्या चर्चेत किरण देसाई आमंत्रीत असतात. तसेच गेटस फाऊंडेशनने भारतातल्या आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरील गावांत वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रियांवरील जो अहवाल सादर केला त्यासाठी किरण देसाई यांनी सक्रीय सहभाग दाखवला.२००९ मध्ये किरण देसाई यांना कोलंबिया विद्यापीठाचे ‘मेडल ऑफ एक्सलन्स’ पारितोषिक मिळाले तर २०१३ मध्ये त्यांना ‘अमेरिकन ऍकादमी इन बर्लिन’ या संस्थेकडून फेलोशिप मिळाली.

किरण देसाई अमेरिकेतील न्यूय़ॉर्क येथे वास्तव्य करतात.२०१७ मध्ये त्यांनी असे घोषित केले आहे की त्या अशा एका भारतीय स्त्रीवर कादंबरी लिहीत आहेत जी सत्ताकांक्षी आहे. पण कादंबरीच्या कथानकाचा अवकाश फक्त भारतापुरता मर्यादीत नसेल तर तिचे कथानक जगाच्या पटावर पुढे सरकेल. इंग्रजी पुस्तके वाचणाऱ्यांना आजही किरण देसाई यांच्या येऊ घातलेल्या नव्या कादंबरीबद्दल उत्सुकता आहे.

पुढील ब्लॉग्जमध्ये आपण किरण देसाई यांच्या दोन्ही कादंबऱ्यांच्या कथानकांचा, त्यातील कथासूत्रांचा व कथनाचा सखोल,सविस्तर शोध घेणार आहोत. तुम्हाला किरण देसाई यांच्या कादंबऱ्यांबद्दल उत्सुकता वाटत असेल तर लगेच  वाचायला सुरूवात करा !

                                                                                         -गीता मांजरेकर

3 प्रतिसाद

  1. उपरोधिक शैलीत लिहिलेले लिखाण कोणाला आवडत नाही .. त्यामुळे आम्हाला नक्की आवडेल लोकांच्या गमतीदार किंवा चुकीच्या असलेल्या समजूती वाचायला.. त्यांच्या अंधश्रद्धा ऐकायला.. शिवाय कादंबरीचे नावेदखील गमतीशीर आहे..

    Like

  2. आवडेल खरंच खूप आम्हाला वाचायला पुढील कादंबरी..

    Like

  3. किरण देसाई यांच्या वरील उल्लेखलेल्या दोन्ही कादंबर्‍यांबद्दल वाचण्यास उत्सुक आहोत. ‘हालाबल्लू इन दी ग्वावा आर्चड’ बद्दल वाचून खानोलकरांच्या ‘कोंडूरा’ ची आठवण झाली. दोन्ही कादंबर्‍या पुन्हा एकदा वाचून काढण्याचे कुतूहल त्यामुळे निर्माण झाले आहे. मिळालेले पुरस्कार आणि मान्यता पाहता  ‘दी इनहेरिटन्स ऑफ लॉस’ बद्दल देखील मनात कुतूहल निर्माण झाले आहे.

    Like

यावर आपले मत नोंदवा