अनिता देसाई यांच्या ‘फायर ऑन दी माऊंटन’ ( किंवा नॉट वेलकम ऍटऑल) या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे आपण मागील ब्लॉगमध्ये लक्षात घेतली. आता या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करून लेखिकेच्या अंतर्दृष्टीचा शोध घेऊ.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

‘फायर ऑन दी माऊंटन’ या कादंबरीचे कथन तृतीय पुरूषी आहे.या कथनात निसर्ग वर्णनाचा भाग मोठा आहे. कादंबरीला व्यक्तीकेंद्री आणि स्त्रीकेंद्रीही म्हणावे लागेल. तीनच महत्त्वाच्या स्त्री व्यक्तिरेखा ‘फायर ऑन दी माऊंटन’ या कादंबरीत  आहेत. त्यातील नंदा कौल आणि ईला दास या दोघी समवयस्क आहेत तर राका ही कुमारवयीन आहे. या तीन व्यक्तिरेखांचे भूतकाळ आणि त्यातून घडलेली त्यांची मानसिकता वाचकांसमोर मांडणे हेच कथनाचे उद्दीष्ट आहे.या तीन व्यक्तिरेखांच्या आयुष्यात प्रत्य़क्ष घडणाऱ्या घटना मोजक्याच आहेत. या तीन व्यक्तिरेखा आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्यक्षातील घटनांना जोडणारे कथनातील दुवे म्हणून धुळीचे वादळ, धुंवाधार पाऊस, वणवा या नैसर्गिक आपत्तींचे वर्णन कथकाने कलात्मकतेने वापरले  आहे.एखाद्या संथ लयीतील पण निसर्गाचा मोठा पट दाखवणाऱ्या कलात्मक चित्रपटाप्रमाणे ‘फायर ऑन दी माऊंटन’ कादंबरीच्या कथनला दृष्य परिमाण प्राप्त झाले आहे.कथनाचा वेग प्रारंभीच्या दोन्ही भागात संथ आहे मात्र तिसऱ्या भागात कथन गतीमान होऊन अखेरीस धक्का देणारे ठरते. कथनाचा प्रारंभ साधा पण उत्सुकता वाढवणारा आहे तर शेवट वाचकांना भविष्यातील उद्वस्थतेची सूचना देणारा आहे.कथनाच्या ओघात फिक्शनचा किंवा कल्पनारंजनाचा वापर लेखिकेने लिलया केला आहे.ते फिक्शन आहे हे जेव्हा वाचकांना कळते तेव्हा त्यांना नंदा कौल या व्यक्तिरेखेची मानसिकता उलगडते.

  ‘फायर ऑन दी माऊंटन’ या कादंबरीच्या कथानकाचे विभाजन लेखिकेने तीन भागात केलेले दिसते. प्रत्येक भागाच्या केंद्रस्थानी एकेक स्त्री व्यक्तिरेखा आहे. पहिल्या भागात नंदा कौल केंद्रस्थानी आहेत. दुसऱ्या भागात राका केंद्रस्थानी आहे तर तिसऱ्या भागात ईला दास केंद्रस्थानी आहे.कादंबरीतील पहिल्या भागाच्या तुलनेत दुसरा भाग बराच मोठा आहे आणि तिसरा भाग साधारण पहिल्या भागाप्रमाणेच लहान आहे.यावरून दुसऱ्या भागातील कथनात अधिक घटना,अधिक तपशील आहेत हे स्पष्टच आहे.कथानकाच्या दुसऱ्या भागात राका आणि नंदा कौल यांच्या विशिष्ट पूर्वग्रहांमुळे व दृढ(Rigid)  मानसिकतेमुळे संबंध कसे अबोल पण दोघींच्याही मनात ताण वाढवणारे होत जातात ते लेखिकेने मांडले आहे.हे ताणच  कादंबरीच्या अखेरीस दोघींनाही उद्वस्थ करणारे ठरले आहेत.कादंबरीच्या तिसऱ्या भागात लेखिकेला जो संघर्ष दाखवायचा आहे तो ईला दास आणि ती जिथे काम करत आहे त्या गरीब वस्तीतील लोकांच्या पूर्वग्रहांचा व दृढ मानसिकतेतील आहे. पण कथनात तो तेवढ्या तीव्रतेने,तपशीलवारपणे न आल्याने ईला दास हिचा अंत होण्यामागील कार्यकारणपरंपरा सुस्पष्ट होत नाही.

‘फायर ऑन दी माऊंटन’ या कादंबरीच्या पहिल्या भागात  कसौनीतील एका टेकडीवर ‘कॅरिग्निनो’ या बंगल्यात एकटेच वास्तव्य करणाऱ्या नंदा कौल या वृद्ध बाईंबद्दल कथक सांगताना दिसतो.कथानकाच्या या पहिल्या भागात एकूण १० छोटी प्रकरणे आहेत.यातील पहिले प्रकरण नंदा कौल या बाईंची अलिप्तपणे, आपल्याच ताठ्यात जगण्याची मानसिकता आणि आयुष्यात कोणत्याही नव्या व्यक्तीसाठी त्यांनी बंद करून टाकलेली मनाची कवाडे याबद्दल कथक सांगतो. नंदा कौल यांना टेकडीच्या पायथ्यापासून एक पोस्टमन वर येताना दिसतो आहे आणि त्यामुळे त्या कशा अस्वस्थ झाल्या आहेत हे कथक कथनातून वाचकांच्या मनावर ठसवतो. तर दुसऱ्या प्रकरणात ‘कॅरिग्निनो’ या बंगल्याचा इतिहास कथकाने काहीशा उपरोधिक पद्धतीने सांगितला आहे.विशेषतः या बंगल्यातील ब्रिटीश दांपत्याची सात मुले दगावणे,बंगल्याचे छप्पर वादळात उडून जाणे,त्यानंतर बंगल्यात रहायला आलेल्या  अविवाहीत ब्रिटीश बायकांपैकी कोणी रागीट ,कोणी विक्षिप्त,कोणी बदफैली असणे हे सगळे कथक सांगतो तेव्हा हा बंगलाच कसा शापित आहे हे त्याला सांगायचे असावे असे वाटते.तिसऱ्या प्रकरणात पोस्टमन आणि त्याला वाटेत भेटलेला नंदा कौल यांचा स्वयंपाकी रामलाल दोघेही टेकडी चढून ‘कॅरिग्निनो’कडे हळूहळू येत आहेत हे नंदा कौल बंगल्याच्या आवारातून पाहतातच आहेत. पोस्टमन एकदाचा येऊन जावा यासाठी त्या अधीर झाल्या आहेत.मनोमन आपल्याला पत्रातून नातेवाईकांनी कोणाच्या आगमनाच्या बेताबद्दल कळवलेले नसावे असे त्यांना वाटते आहे. कारण आपण आयुष्यभर अनेक माणसांसाठी खूप कष्ट केले ,अनेकांची खूप काळजी घेतली आणि आता या उतारवयात तरी कोणाची जबाबदारी आपल्यावर येऊ नये असे त्यांना वाटते आहे. चौथ्या प्रकरणात पोस्टमनने आणून दिलेले पत्र नंदा कौल यांनी नाइलाजाने घेतले आहे आणि त्या पत्रातून त्यांची मुलगी आशा हिने गायलेले रडगाणे आणि तिच्या नातीला कसौनीला पाठवण्याचा तिने घातलेला घाट  याबद्दल नंदा कौल यांना कळते.आपल्या मुलीला नातीची जबाबदारी नको आहे म्हणून तिने ती परस्पर आपल्यावर लोटून दिली आहे, आपल्याला गृहीत धरले आहे हे नंदा कौल यांना अजिबात आवडलेले नाही हे कथनातून स्पष्ट होते.

 ‘फायर ऑन दी माऊंटन’ कादंबरीच्या पहिल्या भागातील पाच आणि सात या प्रकरणात नंदा कौल यांचा भूतकाळ काही क्षणचित्रांसारखा उलगडतो.पंजाब विद्यापीठाच्या कुलगुरूची पत्नी म्हणून नंदा कौल यांनी आपला बराच काळ विद्यापीठाच्या परिसरातील बंगल्यात व्यतीत केला आहे. त्या काळात अनेक पाहुण्या रावळ्यांचे आदरातिथ्य त्यांनी केले आहे, आपल्या चार लहान मुलांना वाढवले आहे,घर अगदी टापटीप ठेवले आहे. हाताशी नोकर चाकर असूनही नंदा कौल यांना गृहिणी म्हणून घराची घडी नीट रहावी म्हणून सातत्याने दक्ष रहावे लागले आहे. एका प्रतिष्ठीत व्यक्तीची पत्नी म्हणून स्वतःचा आब सांभाळत आपले अस्तित्व त्यांनी कायम जपले आहे.विशेषतः त्या व्यस्त दिवसांतही त्या दुपारचा तासभराचा वेळ शांत निजण्यासाठी कसा काढत असत आणि घरातले कोणीही त्यांच्या शांततेत व्यत्यय आणायला धजावत नसे हे कथक ठळक करतो. नंदा कौल यांचा घरातील दरारा,त्यांची कार्यमग्नता,आत्मप्रीती याबद्दल कथक काही घटनांतून सूचीत करतो. पण त्याचवेळी नंदा कौल यांचे रात्री उशीरापर्यंत बंगल्याच्या आवारात एकटीने  फेऱ्या मारणे,रात्री उशीरा त्यांच्या पतीचे कोणा एका पाहुण्याला की पाहुणीला घरी पोहचवून परत येणे आणि नंदा कौल यांनी अंधारातून  नवऱ्याला पाहून निःशब्दपणे परत फेऱ्या मारत राहणे याचे वर्णन कथक करतो तेव्हा तो नंदा कौल यांच्या वैवाहिक आयुष्यातील असफलता, एकाकीपण याकडे वाचकांचे लक्ष वेधतो आहे.

‘फायर ऑन दी माऊंटन’ या कादंबरीतील पहिल्या भागात पाचव्या प्रकरणात नंदा कौल यांची शाळेतील मैत्रीण ईला दास हिचा फोन येतो आणि ईला दास कसौनीतच राहते आहे हे कथक स्पष्ट करतो. ईला दास हिचा चिरका आवाज नंदा कौल यांना नकोसा वाटतो आहे. ईलाने ‘कॅरिग्निनो’ बंगल्यात येऊन आपल्याला भेटण्याचा प्रयत्न करू नये  म्हणून त्या तिला काहीतरी कारणे देऊन टाळत आहेत हेही कथनातून स्पष्ट होते.ईला दास यांनाही नंदा कौल पणतीच्या आगमनाची बातमी कळूनही आनंदात नाहीत हे लक्षात आले आहे.

‘फायर ऑन दी माऊंटन’ कादंबरीच्या पहिल्या विभागातील आठव्या प्रकरणात पुन्हा एकदा नंदा कौल यांच्या स्वभावातील ताठरता,रूक्षता कथक वाचकांच्या मनावर ठसवतो.नंदा कौल एकट्या राहत असल्या तरी त्यांनी त्यांचे दैनंदीन आयुष्य शिस्तीच्या घडीत बसवले आहे.त्यांनी घर स्वच्छ ठेवले आहे, त्या इंग्रजी पुस्तके वाचतात,बंगल्याच्या आवारात फिरतात,मोजकेच जेवतात आणि कोणालाही भेटणे टाळतात हे कथनातून स्पष्ट होते.आपण आजवर लोकांमध्ये खूप गुंतलो, लोकांसाठी खूप केले पण अशा त्यागातून  काहीच शाश्वत मिळाले नाही याचे असमाधान त्यांच्या मनात आहे. त्यामुळे आता कुणातही गुंतणे नको की कोणासाठी काही करणे नको असा  ठाम पूर्वग्रह त्यांनी मनोमन करून घेतला आहे हे कथक अधोरेखीत करतो.

कादंबरीच्या पहिल्या विभागातील दहाव्या प्रकरणात नंदा कौल या त्यांच्या ‘कॅरिग्निनो’ बंगल्यात रहायला येणाऱ्या त्यांच्या पणतीसाठी(राका) त्यांना काय, काय करावे लागेल,तिची आवडनिवड,तिचे आरोग्य जपण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला नाइलाजाने तिच्यात कसे गुंतावे लागेल असा विचार करत आहेत.राका आपल्यावर अवलंबून राहणार असे त्यांना वाटते आहे.पणतीच्या आगमनासाठी त्या स्वागतशील नाहीत. आपल्या आयुष्यात कोणताही बदल स्वीकारायच्या मानसिक स्थितीत नंदा कौल आता नाहीत हे कथक स्पष्ट करतो.

‘फायर ऑन दी माऊंटन’ या कादंबरीच्या दुसऱ्या विभागात एकूण २१ लहान प्रकरणे आहेत. हा विभाग प्रामुख्याने  राका या कुमार वयातील मुलीबद्दल आहे.ती नंदा कौल यांची पणती आहे. नंदा कौल यांच्या आशा या मुलीच्या मुलीची -ताराची ती एकुलती मुलगी आहे.आशा आणि तारा या दोघींबद्दल कादंबरीच्या पहिल्या विभागात नंदा कौल यांना आलेल्या पत्रामुळे वाचकांना कळलेले आहे.तारा आणि तिचा भारतीय प्रशासकीय सेवेतील नवरा यांच्या वैवाहिक नात्यात सौहार्द नाही.ताराचा नवरा बाहेरख्याली आहे आणि तो ताराला मारहाण करतो. ताराला स्वतःचे अस्तित्व नाही त्यामुळे ती वैफल्यग्रस्त झाली आहे हे कथकाने कादंबरीच्या पहिल्या भागात स्पष्ट केले आहे.त्यामुळे ताराची मुलगी राका ही कशी दुर्लक्षित असू शकते याची जाणीव वाचकांना आहे. राकाबद्दल वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण होते पण नंदा कौल यांना मात्र राकाबद्दल सहानुभूती वाटत नाही.राकाला प्रेमाची ऊब हवी आहे आणि सुरक्षिततेची हमी हवी आहे याची जाणीव त्यांना आहे पण त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा असे त्यांना वाटत नाही.कथक म्हणतो की नंदा कौल यांना राका एखाद्या मच्छरासारखी  वाटत होती.मच्छर  कसे कानाशी आवाज करतात म्हणून नकोसे वाटतात तशी ती त्यांच्यासाठी नकोशी होती. ‘राका’ या शब्दाचा अर्थ चंद्र पण राकाचा चेहरा चंद्रासारखा वाटोळा नाही की ती गोरी,सुंदर नाही हेही नंदा कौल यांना खटकत होते.

राका आजारपणामुळे काटकुळी झाली आहे, तिचे केस विरळ झाले आहेत आणि मोठ्ठे डोळे बटबटीत,बाहेर आल्यासाऱखे दिसतात त्यामुळे तर नंदा कौल यांनी मनोमन तिला किटक ठरवून टाकले होते.केवळ एक उपचार म्हणून ‘कॅरिग्निनो’ बंगल्याच्या कुंपणातून रामलालबरोबर आत आलेल्या  राकाला नंदा कौल कवटाळतात पण त्या मिठीत प्रेमाचा ओलावा नाही.राका नंदा कौल यांना ‘नानी’ म्हणते आहे.पण त्यातही केवळ औपचारीकता आहे.तिलाही मनोमन नानीसाठी आपण नकोश्या आहोत याची चाहूल लागली असावी.पण त्याने दुःखी,हळवी होणारी ती नाही.उलट एकप्रकारची बंडखोरी तिच्या स्वभावात आहे. ‘तुला माझी पर्वा नाही तर मी पण तुला भाव देणार नाही. गेलीस उडत !’ असे म्हणणारा पौगंडावस्थेतील विद्रोह जणू राकाच्या वागण्या-बोलण्यातून वाचकांना जाणवत राहतो.

‘राका’चा अर्थ चंद्र पण राका चंद्रासारखी शांत, शितल स्वभावाची नाही हे कथक स्पष्ट करतो. आपल्या नानीला लाघवीपणे आपलेसे करण्यात राकाला रस नाही.ती आल्या दिवसापासून तिला दिलेल्या खोलीत एकटी राहू लागते. कथक म्हणतो की एखाद्या पिंजऱ्यातल्या रानटी प्राण्यासाऱखी राका खोलीतील एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत फेऱ्या मारी.तिला कोणावरही अवलंबून राहायची गरज वाटत नाही.ती फक्त चहा आणि जेवणाला नानीबरोबर असते.दुपारीच ती खिडकीतून बाहेर पडते आणि बंगल्यामागील खोल दरीत उतरून काटेकुटे,दगड-गोटे,टाकाऊ वस्तूंचा कचरा यातून फिरत राहते.तिला मळलेल्या वाटांवरून जाण्यात स्वारस्य वाटत नाही. ती स्वतःच स्वतःची वाट शोधून काढते.तिच्या या रोजच्या शोधमोहिमांवरून परत येताना तिचे गुढघे,हात खरचटलेले असतात, बोटांना कोणत्याशा किटकाने चावा घेतलेला असतो, केसांत माती गेलेली असते.घरात शिरल्याबरोबर ती रामलालकडे जाते आणि आंघोळीचे पाणी गरम होईपर्यंत रामलालने सांगितलेल्या भुतांच्या, हडळींच्या सुरस ,चमत्कारीक कथा ऐकत राहते.रामलालशी बोलताना राका सहज,नैसर्गिक असते आणि आपल्याशी बोलताना मात्र तिच्या बोलण्यात ताठरता असते हे नंदा कौल यांना अस्वस्थ करते हे कथनातून कळते.एकप्रकारचे आंतरीक द्वंद्व नंदा कौल यांच्या मनात ,सुरू झालेले कथनातून लक्षात येते. त्यांनी राकाची जबाबदारी मनातून नाकारली आहे तर राकाने स्वतःच त्यांची जबाबदारी बनण्याचे नाकारले आहे. ती स्वतःच्या मनाप्रमाणे वागते आहे.  नंदा कौल यांच्यासाठी ते अनपेक्षीत आहे,त्यांच्या अहंकाराला राकाचे वागणे ठेच पोहचावणारे आहे.

कथक म्हणतो की आता नंदा कौल यांना राका एखाद्या सशासारखी वाटू लागली होती. जादुगाराच्या टोपीतून अचानक येणारा आणि अचानक गायब होणारा ससा !राकाचे गायब होणे त्यांना त्रासदायक वाटू लागले होते. कथक म्हणतो राका आपल्या या पणजीकडे इतक्या शांतपणे दुर्लक्ष करत होती की नंदा कौल यांना श्वास कोंडल्यासारखे वाटे.कुठेतरी राका ही आपल्यासारखीच धीट,स्वतंत्र बाण्याची आहे असेही नंदा कौल यांना वाटू लागले होते.तसे त्या एकदा राकाला सांगतातही पण राकाला ते ऐकूनही पणजीबद्दल जवळीक वाटत नाही.

कथक म्हणतो नंदा कौल आयुष्यातील वाईट अनुभवांमुळे,उपेक्षेमुळे अलिप्त झाल्या होत्या तर राका स्वभावतःच अलिप्त होती.नंदा कौल राकाला दरीत खोल खोल उतरताना पाहत राहात तेव्हा त्यांना मनोमन तिचे कौतुक वाटे पण ते त्या राकाला कधीच सांगत नाहीत.   तिच्यात भावनिक  गुंतवणूक त्यांना नको आहे हे कथनातून स्पष्ट होते.

राकाला दरीच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या लुई पाश्चर संस्थेबद्दल रामलाल सांगतो आणि तिथे वेगवेगळ्या आजारांवरील लसी बनवल्या जात असतात, गिनी पिग्जवर प्रयोग होत असतात, रसायने उकळत असतात हे ऐकून राकाला त्या संस्थेच्या इमारतीतून बाहेर पडणाऱ्या धुराचे आकर्षण वाटते.रामलाल तिला तिथे जाऊ नकोस तिथे रानटी कोल्हे, लांडगे असतात आणि ते चावले तर इंजेक्शने घ्यावी लागतात असे भय घालतो पण तरीही राकाला तिथे जायचेच असते.दरीत उतरताना एका खडकावर तिला उन्हात पहुडलेला पिवळा पट्टेरी साप दिसतो. राका स्थिर नजरेने त्याच्याकडे पाहात राहते.दरीतील खेड्यांत ती जाते. तेथील शेती पाहते. कोण्या शिकाऱ्याने सावज टिपण्यासाठी बंदुकीतून गोळी मारलेली ती ऐकते पण ती ना कोणाशी बोलत ना कोणाचे तिच्याकडे लक्ष जात.दूरवर दिसणारी पंजाबमधील मैदाने, चंदीगड शहरातील तलाव हे सगळे राकाच्या नजरेतून कथक वाचकांना दाखवत राहतो.धुळीच्या वादळात रामलाल घाबरतो, वणवा पेटेल याची त्याला भीती वाटते पण राका घाबरत नाही.अंधार, वादळ, पाऊस,रानटी प्राणी ,वणवा कशाचीच भीती राकाला वाटत नाही कारण त्याने काय नुकसान होऊ शकते त्याचे भान तिला नाही किंवा आपल्या आयुष्यात त्याने आहे त्यापेक्षा काय फरक पडणार असा बेदरकारपणा तिने मनात बाणवला आहे.’मी कशाचीच पर्वा करत नाही’ असे वाक्य तिच्या मनात सतत उमटत राहते असे कथक सांगतो.

राकाला परावलंबी,आज्ञाधारक व्हायचे नाही हे पाहून नंदा कौल बिथरतात.आपल्यावर तिची जबाबदारी नको, आपल्याला तिच्यात गुंतायचे नाही असे मनोमन घोकणाऱ्या नंदा कौल यांना राकाचे स्वतंत्रपण आता अस्वस्थ करू लागते.आता राकावर ताबा मिळवण्याचा त्या प्रयत्न करू लागतात. राका दुपारी चहानंतर बाहेर सटकणार हे माहीत असल्याने त्या पूर्ण तयारी करून तिला रोखतात आणि तिला मंकी पॉंईंटवर घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतात. वाटेत चालताना त्या गाईडची भूमिका वठवू लागतात तेव्हा राकाला ते अजिबात आवडत नाही. नंदा कौल आपले मोठेपण दाखवण्यासाठी  राकाला हॉपकिन्सची कविता म्हणून दाखवतात पण राकाला त्यात काही थोर वाटत नाही.वाटेतली माकडं आणि त्यांचे चाळे बघून मात्र दोघीही एकत्र हसू शकतात.मंकी पॉईंटवर पोहचल्यावर नंदा कौल बाकावर बसतात आणि राकाला पुढचा चढ चढून जायची इच्छा असेल तर तिने तसे करावे अशी परवानगी देतात. राका ज्या झपाट्याने डोंगर चढते ते पाहून त्या मनोमन तिचे कौतुक करतात पण प्रत्यक्षात मात्र ते व्यक्त करत नाहीत.राका डोंगरमाथ्यावर जाते तेव्हा आपल्याला पक्ष्याप्रमाणे उडून जाता आले पाहिजे अशी कल्पना करते.आपली पणजी खाली वाट पाहते आहे याची जाणीव तिला आहे म्हणून ती झपाट्याने खाली येते.पण परतीच्या वाटेवर दोघींमध्ये अजिबात संवाद होत नाही. पणजीने आपल्याला शाळेत जायचे का विचारले हे राकाला आवडत नाही. तिला आयुष्याला कोणतीही शिस्त लावून घेण्याची इच्छा नाही.राकाला कुठे घेऊन जाण्याचा पुढाकार घेण्यात काही अर्थ नाही असे नंदा कौल मनाशी ठरवून टाकतात. तरीही त्या राकाला बाजूच्या क्लबमध्ये कधीतरी जाऊन बघ ,तुला तिथे तुझ्या वयाची,प्रतिष्ठीत घरातील मुलं भेटतील असे सुचवतात. रामलालही राकाला तसेच सुचवतो.

राका समाजात मिसळणारी मुलगी नाही. तिला समाजशील बनवण्याचा प्रयत्न तिच्या वडिलांनी केला होता. ते तिला हॉटेलमध्ये , नाचगाण्यांना घेऊन जात पण ती कधीच तिच्या कोषातून बाहेर आली नव्हती. आईने तिच्या आजारपणात तिला एकाच सुरात गोष्टी वाचून दाखवल्या आहेत पण राकाला त्या गोष्टींनी कधीच रिझवलेले नाही.पण आता राकाला वाटते की रामलाल सांगतो आहे तसं एकदा शेजारच्या क्लबमध्ये जाऊन पहावे.

एका रात्री शेजारच्या क्लबमधून नाच-गाण्याचा आवाज येतो आहे हे ऐकून राका मागच्या बाजूने लपून क्लबमध्ये जाते आणि तिथल्या खिडकीच्या पडद्याआडून आतील दृष्य पाहू लागते. आत चाललेल्या नृत्य- नाट्यातील हिंसक दृष्ये राकाला भूतकाळात नेतात.विशेषतः ‘ब्रिज ऑन दी रिव्हर क्वाय’ या इंग्रजी चित्रपटातील ताराSरारा SताराराSSहे गाणे ऐकून आपले वडील रोज रात्री उशिरा दारू पिऊन घरी येत आणि  आईला -ताराला कसे मारत ते तिने पाहिलेले दृष्य तिला आठवते आहे.आई रडत रडत आपल्या बिछान्याच्या पायथ्याथी येऊन बसे. एखाद्या मऊ-लिबलिबीत गोळ्यासारखी ती आपल्याला वाटे. पण त्याचवेळी घाबरून आपण बिछाना ओला करत असू हे सगळे राकाला आठवते.ती रडू लागते,घाबरते आणि  जीवाच्या आकांताने क्लबमधून ‘कॅरिग्निनो’ बंगल्यात पळत येते.राकाच्या स्वभावाची कारणे तिच्या भूतकाळातील घटनांमध्ये दडलेली आहेत असे कथकाला सुचवायचे आहे.

राका मूलतः अतिशय संवेदनशील, हळवी मुलगी आहे हे कथकाला सांगायचे आहे. त्या अनुषंगाने पणजीबरोबर पक्ष्यांची आपल्या पिलांसाठी  खाणे आणण्यासाठी चाललेली धावपळ पाहत असताना आपण जर असेच पक्ष्यांना पाहत अंगणात थांबलो तर पक्षी घाबरून जातील आणि त्यांची पिल्ले उपाशी राहतील हे  पणजीला सांगणारी राका कथक रंगवतो. तसेच अंगणात घुसलेल्या माकडाच्या कळपाला हाकलवून लावताना रामलाल जेव्हा एका लहान बाळाला पोटाशी कवटाळलेल्या माकडीणीवर दगड भिरकावणार आहे हे राकाला दिसते तेव्हा ती त्याचा हात पकडून ठेवते आणि दगड मारण्यापासून त्याला परावृत्त करते हे कथक सांगतो तेव्हा राकाच्या स्वभावातील भूतदया,संवेदनशीलताच त्याला अधोरेखीत करायची आहे.

दूरवरच्या डोंगरावर लागलेला वणवा आणि त्याचा दिसणारा जाळ राकाला आकर्षित करतो.पण नंदा कौल यांनी तिला इतर मुलांप्रमाणे घोड्यावर बसून कसौनी फिरून ये असे सुचवलेले मात्र तिला आवडत नाही. दरम्यान एके संध्याकाळी अचानक पाऊस सुरू होतो. त्या धुँवाधार पावसात पणजीबरोबर घरातच अडकून पडलेली राका सहजच टेबलावरील लहानशा बुद्धमुर्तीला स्पर्श करते आणि अचानक तिची पणजी-नंदा कौल तिला त्यांच्या बालपणीच्या गोष्टी काहीशा सांगितीक सुरात, आवाजात चढ-ऊतार करत सांगू लागतात.राका ते ऐकून चकीत होते ,अधूनमधून प्रश्नही विचारते पण हळहळू तिला त्या सगळ्या गोष्टी ऐकण्याचा कंटाळा येऊ लागतो.पाऊस कमी होतो पण पुन्हा नंदा कौल त्यांच्या पंजाब विद्यापीठातील घरात कसे प्राणी त्यांनी पाळले होते याबद्दल सांगू लागतात तेव्हा तर राकाला जांभयाच येऊ लागतात.कथक सांगतो राकाला घेऊन पडवीतून आत येताना नंदा कौल यांनी शिताफीने ‘ट्रव्हल्स ऑफ मार्को पोलो’ हे पुस्तक पुस्तकांच्या फळीवर सरकवले होते . तेव्हा नंदा कौल जे राकाला सांगत होत्या त्या फक्त कल्पित कहाण्याच होत्या हे त्याला सुचवायचे आहे.

पणजी -नंदा कौल आपल्याला वेगवेगळ्या कहाण्या सांगून घराबाहेर पडण्यापासून रोखते आहे आणि आपल्याला जणू बंदिस्त करू पाहते आहे असा समज राकाच्या मनाची पकड घेतो.कथक म्हणतो, एखाद्या छोट्या माशाने हवा घेण्यासाठी बाहेर डोके काढावे आणि कोळ्याच्या गळात अडकावे तसे राकाचे झाले होते. आणि मग तिच्या मनात एकप्रकारची सूडबुद्धी जागी झाली. वणव्याने उद्वस्थ झालेले घर , परिसर पहायला ती जाते तेव्हा हीच उद्वस्थता तिला हवीशी वाटते असे कथक सूचीत करतो आणि पुढे येणाऱ्या प्रसंगाची जणू कार्यकारण परंपरा सिद्ध करतो.विशेषतः नंदा कौल त्यांना आलेले आशाचे म्हणजे राकाच्या आजीचे पत्र तिच्यापासून दडवून ठेवतात हे राकाला कळते आणि त्या पत्रातून तिच्या आईला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये ठेवल्याची बातमी आहे हे नंदा कौल थेट तिला सांगतात तेव्हा राकाच्या मनाचा कल काहीतरी विध्वंसक करण्याकडे झुकू लागतो. आपल्या आयुष्यात आईकडून प्रेम मिळणे अशक्य आहे, सुरक्षितता, शाश्वतता मिळणे अशक्य आहे आणि पणजी तर आपल्याला बंदिस्त करून गुलामीत ठेवू पाहते आहे असा टोकाचा समज राकाचे अस्थिर मन करून घेते. या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग तिच्या नकळत तिच्या नेणिवेने तिला सुचवला आहे  तो विध्वंसक कृत्य करण्याचा.

एका बाजूला नंदा कौल यांना राका अगदी आपल्यासारखी वाटते. तिला एकटीलाच ‘कॅरिग्निनो’ बंगल्याचे सौंदर्य, येथील शांतता, येथील निसर्गातील बारकावे कळले आहेत. आपल्यानंतर राकाच या घराची देखभाल चांगली करेल. आपण मृत्यूपत्र लिहून राकालाच या घराचे हक्क दिले पाहिजेत असे नंदा कौल यांना वाटते. पण नंतर राकाला नाही पण तिच्या आईला ताराला आपण या घराचे वारस बनवले पाहिजे. तिला घराची खरी गरज आहे असे नंदा कौल यांना वाटते.पण मग मृत्यूपत्र तयार करण्यासाठी एखाद्या वकीलाला घरी बोलावावे लागेल किंवा आपल्याला त्याच्याकडे जावे लागेल या कल्पनेनेच नंदा कौल यांना काहीच करू नयेसे वाटते.या ‘कॅरिग्निनो’ बंगल्यासह आपण संपून जावे असेच त्यांना खोल मनात वाटते आहे असे कथनातून सूचीत होते.राकाचे त्यांच्या शांत आयुष्यात येणेच त्यांना इतका निर्वाणीचा, टोकाचा विचार करायला कारणीभूत ठरले आहे.

        ‘फायर ऑन दी माऊंटन’ या कादंबरीच्या कथानकातील तिसरा भाग १३ छोट्या प्रकरणांचा आहे. ईला दास या नंदा कौल यांच्या बालमैत्रिणींचे कॅरिग्निनो बंगल्यात सायंकाळी चहासाठी होणारे आगमन ते रात्री त्या कसौनीतलच गारखाल भागातील त्यांच्या घरी परतत असताना त्यांची झालेली निघृण हत्या असा भाग या कथनात उलगडतो.म्हटले तर या कथनाचा प्रत्यक्ष काळ काही तासांचा आहे पण ईला दास आणि नंदा कौल यांच्या संभाषणातून  अप्रत्यक्षपणे कथनातील काळ त्यांचे बालपण, तरूण वयातील घटना असा साधारण साठ वर्षे मागे जातो.ईला दास यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि घरची परिस्थिती ढासळल्याने त्यांची झालेली ससेहोलपट नंदा कौल यांना आठवते. तर ईला दास नंदा कौल यांनी त्यांच्या पतीच्या ओळखीने पडत्या काळात आपल्याला नेहमीच कशी मदत केली ते राकाला सांगतात.आपले बालपण आणि तरूणपण कसे आनंदी,मौजमजेचे होते हे ईला दास रंगवून सांगतात मात्र नंदा कौल व त्या बॅडमिंटन खेळताना श्री.कौल व त्यांची जोडीदार मिस डेव्हीड त्यांना कसे हरवत हे सांगून चपापून थांबतात. तेव्हा कथक नंदा कौल यांच्या आयुष्यातील दुःखाचे, असमाधानाचे कारण काय आहे हे सूचीत करतो.ईला दास यांच्या बोलण्यात त्या गारखालच्या आसपासच्या खेड्यांत शासनाने नेमलेला समाजसेवक म्हणून काम करत असताना त्यांना येणारे निराशाजनक अनुभवही येतात.आपण तळमळीने समाजासाठी काम करत आहोत पण समाजातील अडाणी,अंधश्रद्धाळू वर्गाला त्याची पर्वा नाही असे सांगताना ईला दास यांचा  सूर तक्रारीचा आहे. आपले स्वागत ती ग्रामीण माणसे करू इच्छित नाहीत.त्यांना त्यांच्या जगण्यात रूढी-परंपरात कोणतेच परिवर्तन स्वीकारायचे नाही हे वास्तव ईला दास यांच्या लक्षात येत नाही. आपले काहीतरी चुकत असेल याची जाणीव त्यांना नाही हे कथनातून स्पष्ट होते.ईला कौल यांनी समाजसुधारणांचा आग्रह धरताना गावातील पुजारी, तसेच प्रीत सिंगसारखा मुलीचा बालविवाह लावून द्यायला निघालेला बाप असे शत्रू नकळत निर्माण केले आहेत हेही कथनातून वाचकांना कळते. तरीही ईला दास यांचा अंत वाचकांवर अनपेक्षीतपणे आदळतो.अर्थात नंदा कौल यांनाही ईला दास यांच्या हत्येची बातमी अनपेक्षीत आहे. त्या सून्न होऊन बसल्या असतानाच त्यांचे एकाकी वर्तमान आणि पराभूत भूतकाळ,त्यातील कटू वास्तवासह त्यांच्या मनावर आदळतो.त्याचवेळी राका बंद खिडकीवर ओरखडे मारत त्यांना उत्साहाने सांगू पाहत असते की तिने बंगल्यामागील वाळलेल्या गवताला आग लावून दिली आहे…हे कथन भविष्यातील विध्वंसाचे भयावह चित्र वाचकांच्या डोळ्यांसमोर नकळतपणे उभे करते.

अशाप्रकारे ‘फायर ऑन दी माऊंटन’ ही अनिता देसाई यांची कादंबरी लहानशी असली तरी त्यातील कथानकाची कल्पक विभागणी व कथनातील सूचकता यामुळे ती एकाबाजूला वाचकांची उत्कंठा वाढवणारी तर दुसऱ्या बाजूला वाचकांना अंतर्मुख करणारीही ठरते असे म्हणावे लागेल.व्यक्ती परस्परांशी आणि समाजाशी संवाद ठेवत  नाहीत किंवा परस्परांचा स्वीकार करत नाहीत तेव्हा माणसांच्या मनात निर्माण होणाऱ्या क्रौर्यातून विध्वंसाशिवाय काही दुसरे घडू शकत नाही ही अनिता देसाई यांची अंतर्दृष्टी ‘फायर ऑन दी माऊंटन’ या कादंबरीच्या कथनाच्या विश्लेषणातून उलगडते.

तुम्ही ‘फायर ऑन दी माऊंटन’ ही कादंबरी आवर्जून वाचावीत ! पुढील ब्लॉगमध्ये अनिता देसाई यांच्या ‘फास्टींग-फिस्टींग’ या कादंबरीचे कथानक व कथासूत्रे आपण समजून घेऊ.

                                      -गीता मांजरेकर

यावर आपले मत नोंदवा