मागील ब्लॉगमध्ये भारतीय इंग्रजी कादंबरीकार अनिता देसाई यांनी लिहिलेल्या ‘दी व्हिलेज बाय दी सी’ या कादंबरीच्या कथानकाचा आणि कथासूत्रांचा परिचय आपण करून घेतला.ही कादंबरी सत्य घटनेवर आधारित आहे आणि प्रत्यक्षातील व्यक्तींची नावे तेवढी बदलली आहेत असे खुद्द लेखिकेनेच नमुद केले आहे.त्यामुळे प्रत्यक्ष घडलेल्या घटना व खऱ्याखुऱ्या व्यक्तींबद्दल कथन करताना लेखिका नेमका कशावर भर देते ? तिला या घटनांतून विशेषत्वाने काय सांगायचे आहे ते पाहणे उद्बोधक ठरेल. त्यासाठी ‘दी व्हिलेज बाय दी सी’ या कादंबरीच्या प्रारंभीच्या भागातील कथनाचे विश्लेषण आपण करू.

ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे अधिक सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

‘दी व्हिलेज बाय दी सी’ या कादंबरीचे कथन तृतीय पुरूषी आहे.पण कथनापेक्षा अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरतात ती अनिता देसाई यांच्या कादंबऱ्यातील वर्णने.एखाद्या घटनेचा कालावकाश या वर्णनांतून लेखिका अतिशय प्रत्ययकारी करते. कधीकधी ही वर्णने कादंबरीतील आशयसूत्राला पुढे नेणारी ,प्रतिकात्मक वर्णने ठरतात.

‘दी व्हिलेज बाय दी सी’ या कादंबरीच्या शीर्षकावरून वाचकांना लक्षात येते की ही कादंबरी समुद्रकिनाऱ्यावरील एका गावाबद्दल आहे. म्हणजे लेखिकेला त्या गावालाच प्रमुख व्यक्तिरेखा बनवायचे आहे.स्वाभाविकच  गाव म्हणजे गावातील निसर्ग, गावातील घरे-दारे आणि गावातील लोकांची विशिष्ट मानसिकता हे सगळेच कथानकात केंद्रस्थानी येतात.

कादंबरीची सुरूवात थळ गावातील समुद्रकिनाऱ्याच्या वर्णनापासून होते.समुद्राच्या विशाल पार्श्वभूमीवर कथानकातील लीला या व्यक्तिरेखेने मनःपूर्वक केलेली समुद्रातल्या एका खडकाची पूजा तिची आणि अनुषंगाने त्या गावातील सर्वांचीच निसर्गावर श्रद्धा ठेवून जगण्याची मानसिकता व्यक्त करणारी आहे.या सर्व स्त्रियांनी तोच खडक पूजेसाठी का निवडला आहे त्याचेही तार्कीक कारण लेखिका कथनातून देते. ती म्हणते-

“लीलानंतर सकाळी  अनेक स्त्रिया येऊन या पवित्र खडकाला फुले वहात.काहीजणी कोळीबांधवांच्या सुरक्षिततेसाठी लहानशी प्रार्थना म्हणत कारण त्या सगळ्याच कोळ्यांच्या बायका ,बहिणी होत्या.काहीजणी त्या खडकासमोर फक्त नतमस्तक होत जशी लीला झाली होती.दिवसाची सुरूवात करण्याची ती एक चांगली पद्धत होती.त्यांनी पूजेसाठी नेमका तोच खडक का निवडला होता याचे काही विशेष कारण नव्हते.त्यांना आपली श्रद्धा व्यक्त करायला ,फुले आणि कुंकू वहायला, त्यांच्या प्रार्थना म्हणायला काहीतरी हवे होते.आणि हा मोठ्ठा, सपाट आणि फार खोल पाण्यात नसलेला खडक त्यांच्या चालत जाण्याच्या आवाक्यातला, सोयीचा होता.तो गावातील देवळासारखा खूप दूर समुद्रकिनाऱ्याच्या दुसऱ्या टोकाला नव्हता की त्याची पूजा करण्यासाठी कोणा पुजाऱ्याला दक्षिणा द्यावी लागत नव्हती.बायकांना स्वतःच त्या खडकाची पूजा करणे पसंत होते.”

कथक सांगतो की समुद्रातल्या खडकाची पूजा करण्याची आपल्या आईची परंपरा लीला पुढे चालवत होती.खरं तर, तिची आई नवऱ्याच्या सुरक्षिततेसाठी ही पूजा करे. कारण तिचा नवरा खोल समुद्रात मासेमारीला गेलेला असे. पण आता त्याने मासेमारीला जाणे सोडले होते,व्सनामुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी आपली बोट आणि दुभती म्हैसही विकून टाकली होती.लीलाची आई आजाराने बिछान्याला खिळली होती.आणि या असुरक्षित परिस्थितीत लीलाला रोज सकाळी समुद्रातल्या त्या खडकाला फुले अर्पण करून मनाची शांती,समाधान मिळत होते.दिवसभरातले काम सुरू करण्यापूर्वी लीला खडकाची पूजा करून आपल्या घराकडे परत येई.

लीलाच्या घराच्या वाटेवरील निसर्गदृष्य कथक वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे करतो.तो म्हणतो –

“सकाळचा उजेड अजूनही कोवळा,नारळी-पोफळीच्या झावळ्यांच्या चाळणीतून गाळलेला,ठिकठिकाणच्या झोपड्यांतून बाहेर पडणाऱ्या निळ्या धुरात मिसळलेला होता.दव अजूनही खरबरीत गवतकाड्यांवर पडलेले दिसत होते आणि त्यातील कोळ्यांची जाळी चमकत होती. ही छोटी परंतु दाट विणलेली ,सर्व बांजूंनी गवतकाड्यांवर ताणलेली कोळ्यांची जाळी होती ज्यात मधोमध एक छिद्र होते. किटकांसाठीचा तो सापळा होता.फुलपाखरे आजूबाजूच्या रानटी फांद्यांवरून, झुडपांवरून, फुलांवरून उडत होती.यातील काही मोठ्ठी,निळसर पंखांवर झेब्र्याच्या अंगावरील पट्टे असलेली फुलपाखरे होती.तर काही चमकदार काळ्या पंखांच्या टोकांवर लाल ठिपका असणारी होती.आणि गंधकासारख्या पिवळ्या रंगाची छोटी छोटी फुलपाखरे तर दोन-तीनच्या जोड्या करून उडत होती…मग तिथे सुरूच्या सुईसारख्या, सूक्ष्म पानांच्या सावलीतून सगळे पक्षी उडत  होते.दिवसाच्या अन्य कोणत्याही वेळेपेक्षा ते यावेळी जोरदार आवाजात  गात,एकमेकांना पुकारत, शीळ घालत होते….” कथक सकाळच्या त्या वेळेचे रंग-गंध-नाद सूक्ष्मपणे टिपत त्याचे वर्णन करतो.तो म्हणतो,

“हे थळ गावातले आवाज होते आणि समुद्राची गाज,लाटांची गर्जना, नारळी-पोफळीच्या बागांतून सळसळत वहाणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाची साथ त्याला होती.जणू हे आवाज लीलाला शांत,आनंदी रहायला सांगत होते आणि सगळे काही पूर्वीसारखे स्थिरस्थावर, ठीक होईल असे सांगत होते.”

इथे कथनात निसर्ग एका बुजुर्ग अनुभवी धीर देणाऱ्या व्यक्तीसारखा होतो. पुढे मग निसर्गातल्या या संतुलीत सौंदर्याचा लवलेशही लीलाच्या घरात कसा नव्हता आणि तिथे सगळेच कसे अस्ताव्यस्त, बिघडलेले होते याचे आधीच्या निसर्गदृष्याशी विसंगत वर्णन करून कथक लीलाच्या घराची बिघडलेली घडी अधिक ठळक करतो.

लीलाचा भाऊ हरी दूध घेऊन घरी येतो आणि मग सगळे चहा पितात. हरीच्या धाकट्या बहिणी त्यांची फाटकी-तुटकी पुस्तके-वह्या घेऊन शाळेत जायला निघतात.हरीही त्यांच्यामागून गावात जातो.रस्त्यावर त्याला नवीन पत्र्यांचे एक खोपटे बांधलेले दिसते. बाजूलाच एक ट्रक उभा असतो आणि त्यातील ड्रायव्हर झोपलेला दिसतो. या नव्या गोष्टींबद्दल हरीला कतूहल वाटते. सायकलवरून येणाऱ्या रामूला तो या नवीन गोष्टींबद्दल विचारतो तेव्हा गावात नवीन फॅक्टरी उघडणार असल्याची बातमी त्याला कळते. एक पत्र्याची झोपडी फॅक्टरी कशी होणार याबद्दल हरीला शंका वाटते. तेव्हा कथक रामूच्या बोलण्यातून भविष्यातील चित्र हरीच्या आणि वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे करतो.रामू म्हणतो –

“अरे,ती पहारेकऱ्याची झोपडी आहे.पहिल्यांदा ते पहारेकरी पाठवतात. मग ते बांधकामाचे साहित्य पाठवतात ज्याची राखण पहारेकरी करतो.लौकरच ते बुलडोझर्स पाठवणार,माती गोळा करणारी, हलवणारी मशिन्स पाठवणार,रोलर्स पाठवणार.ते हा हमरस्ता अधिक रूंद करणार आहेत.आहे त्यापेक्षा दुप्पट रूंद.मग त्यांची मशिन्स इथे आणणं त्यांना सोपे होईल. मग ते कामगारांसाठी घरे बांधतील.कामगार येतील. फॅक्टरीज बांधल्या जातील.”

हरीने भविष्यातील हे चित्र मनोमन स्वीकारले नव्हते.आणि विशेषतः शेजारी उभा असणारा डोंगर आणि त्यावरील देऊळ कधीच जाऊ शकणार नाहीत असा त्याचा दृढ विश्वास होता.भाबड्या हरीला रामूने सांगितले-

“ते डोंगर कापून काढतील.सपाट करतील सगळे आणि त्यावर फॅक्टरी बांधतील.”

पण भाबड्या हरीला ते पटत नव्हते. जे देऊळ त्याच्या आज्यापणज्यांच्या काळापासून डोंगरावर उभे होते ते कसे नाहीसे होईल असा त्याचा साधा प्रश्न होता.इथे कथक हरीचा परिस्थितीच्या शाश्वततेवर किती ठाम विश्वास आहे हे हेतूतः स्पष्ट करतो.कारण पुढे आधुनिक विकासकामांत परिस्थिती बदलू शकते निसर्गाला,देवळालाही या आक्रमणापुढे टिकून रहाता येत नाही आणि मग प्रत्येकाला आपल्या अस्तित्वासाठी काहीतरी वेगळे मार्ग शोधावे लागतात,बदललेल्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी स्वतःत बदल घडवावे लागतात हेच कादंबरीच्या कथानकातून कथक सांगणार आहे.

कथनात पुढे हरीच्या मनात फॅक्टरी, तिथली मशिन्स आणि आपल्याला तिथे मिळणारे काम याबद्दल विचार कसे घोळत रहातात हे कथक सांगतो. हरीच्या मनातील प्रश्न तो वाचकांसमोर उपस्थित करतो.फॅक्टरीत काम करण्यासाठी पदवी हवी की कौशल्य ?असा तो प्रश्न आहे. समकालीन शिक्षणव्यवस्थाही या प्रश्नाकडे गांभिर्याने पहायचा प्रयत्न करते आहे कारण उच्चशिक्षितांची बेकारी आणि कुशल कामगारांची अनुपलब्धता हे दोन्ही प्रश्न आजही आपल्याला भेडसावत आहेत.इथे श्रमशक्तीला बौद्धिक शक्तीपेक्षा गौण लेखले जाते ही आपल्या समाजातील एक दुष्प्रवृत्तीही कथकाला ठळकपणे मांडायची आहे. जे हात शेतात राबू शकतात, पेरणी-लावणी-कापणी करू शकतात किंवा प्रत्यक्ष यंत्रावर काम करून वस्तू निर्माण करू शकतात ते अधिक उत्पादक की टेबलाशी बसून संगणकावर प्रोग्रॅमिंग करणारे बुद्धिमंत जास्त उत्पादक  असा तो प्रश्न आहे.हातांनी काय निर्माण करावे हाही तो प्रश्न आहे. अन्नधान्य की प्रक्रिया केलेले अन्न,नैसर्गिक खते की कृत्रिम खते,नैसर्गिक जंतूनाशके की घातक रसायने, मासेमारी करणाऱ्या बोटी की मोटारी ?  माणसांना नेमके महत्त्व तरी कशाचे वाटते आहे ? निसर्गाचे की सुखसोयींचे ? आणि सुखसोयी तो कशाच्या मोबदला देऊन मिळवणार आहे ?हा तो कथनात दडलेला प्रश्न आहे.

कथानकातील लीला, हरी,बेला-कमला या लहान मुलांवर त्यांच्या वडिलांनी मासेमारी करणे थांबवले,ते व्यसनाधीन झाले,कर्जापायी त्यांनी बोट विकली, दुभती म्हैस विकली म्हणून उपासमारीची वेळ आली आहे.अशा परिस्थितीत लीला आणि हरी या दोन मोठ्या मुलांना आपल्यावरील जबाबदारीचे भान आले आहे.या दोघांनी शाळा सोडली आहे आणि आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी हातांनी कष्ट करण्याखेरीज दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नाही.लीला आणि हरीसारखी अशी कित्येक मुले शाळा सोडून लहान वयात कष्टकरी बनत असतील. कष्टच आपल्याला जगवू शकतात याचे येणारे हे भान त्यांना प्रयत्नवादी बनवते, नैराश्यापासून वाचवते.उच्चशिक्षितांना मात्र कित्येकवेळा बेकारीमुळे नैराश्य आलेले दिसते.’दी व्हिलेज बाय दी सी’ ही कादंबरी हे  वास्तवातील ही विसंगती प्रत्यक्ष दाखवत नसली तरी अप्रत्यक्षपणे या विसंगतीकडेही या कादंबरीला वाचकांचे लक्ष वेधायचे आहे.

आपल्या हातांनी, आपल्या कामाने आपण परिस्थिती बदलू शकू यावर लीलाचा विश्वास आहे आणि हरीलाही तसेच वाटू लागल्याचे पाहून ती सुखावली आहे असे कथक सांगतो. तो म्हणतो-

“हरीच्या बोलण्यावर लीलाने मान हलवली. तिचे मन हलके झाले. हरी मोठा होतो आहे, तो काम शोधेल, पैसे कमावू लागेल या विचाराने तिला दिलासा मिळाला. अर्थात तो अजून लहान होता तिच्यापेक्षा एका वर्षाने लहान ..  त्यामुळे ती त्याच्याकडून मोठ्या पुरूषांकडून केले जातात तसे अफाट कष्ट आणि खूप मिळकतीची अपेक्षा करत नव्हती.त्यांच्या परिस्थितीत, त्यांच्या घरात, कुटूंबात परिवर्तन अचानक, चटकन होणार नव्हते.पण ते येणार होते. लीलाला त्यावर विश्वास ठेवावा लागणार होता.”

एका बाजूला लीला आणि हरीसारखी मुले गावात आहेत की ज्यांना घरच्या दयनीय परिस्थितीमुळे कष्ट करून घर पुन्हा सावरावे लागणार आहे.पण गावात अशीही कितीतरी मुले आहेत की ज्यांनी काही कारण नसताना, केवळ अभ्यासाचा आळस म्हणून शिक्षण सोडून दिले आहे. त्यांच्या घरची परिस्थिती चांगली आहे आणि त्यांना बेकार असूनही उंडारायला मिळते आहे.गावात फॅक्टरी येईल तेव्हा आपल्याला काम मिळेलच असे या मुलांनी गृहीत धरले आहे. फॅक्टरीत कामासाठी लागणारे कौशल्य कसे मिळवावे किंवा फॅक्टरी येईपर्यंत अन्य काही रोजगार शोधावा असे या मुलांना वाटत नाही.गावातील ही विसंगतीही कथक मांडतो. तो म्हणतो –

“….हरी निघणारच होता तेवढ्यात रामू सायकल चालवत आला आणि सुरूच्या झाडांपाशी थांबला.त्याच्याबरोबर गावातील इतर दोन मुलगेही होते.त्या सगळ्यांनी हरीप्रमाणेच शाळा सोडली होती. पण हरीपेक्षा त्यांचे शाळा सोडण्याचे कारण वेगळे होते. त्यांच्यासाठी शाळेची फी भारी नव्हती की त्यांना पुस्तके घेणे परवडणार नव्हते असेही नव्हते. कारण त्यांच्या वडिलांकडे मासेमारी करण्यासाठी बोटी होत्या. त्यांचे वडील मासेमारीसाठी समुद्रात दूरवर जात होते.आणलेले मासे ते मुंबईहून येणाऱ्या विक्रेत्यांना विकत आणि ते विक्रेते मासे लॉरीने मुंबईत घेऊन जात.पण या मुलांना फक्त कंटाळा आला होता शाळेत जाण्याचा नी शिकण्याचा.ते थांबले होते अशा संधीसाठी की ज्यामुळे त्यांना कमी कष्टात,कमी वेळात बरे पैसे मिळतील. ही मुले आपल्या वडिलांना मदत करू शकतील एवढी निश्चितच मोठी झाली होती पण त्यांना हा पारंपरिक मच्छिमारीचा व्यवसाय करायचा नव्हता.त्यांच्या दृष्टीने तो अशिक्षित माणसांनी करायचा कंटाळवाणा धंदा होता.”

 कथकाला सांगायचे आहे की रामूसारख्या मुलांना शालेय शिक्षण अर्धवट सोडले असतानाही सुशिक्षित असल्यासारखे वाटते, मच्छिमारी करणे कमीपणाचे वाटते आणि फॅक्टरीत काम करण्यासाठी इंजिनीयर व्हावे लागते, त्यासाठी कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यावे लागते हे हरीचे म्हणणे ते हसण्यावारी नेतात.रामूसारखी अशी कित्येक मुले त्यांच्या कुटूंबांवर भार बनून राहतात.कष्ट करायचा आळस आणि शिक्षणाबद्दल अश्रद्धा असलेली ही मुले समाजव्यवस्थेला जणू वाळवीसारखी पोखरत असतात असे कथकाला सुचवायचे आहे.

हरीच्या दोघी लहान बहिणी कमला आणि बेला यादेखील घरातील परिस्थितीचे भान असल्याने खडकांवरील कालवे काढायला समुद्रावर जातात. ही कालवे काढून घरी नेली तरच आपल्याला भातावर कालवण मिळणार आहे याची त्यांना जाणीव आहे.

एकंदर ज्यांच्याकडे दारिद्र्य आहे त्यांना कष्टाचे,प्रयत्न करत राहण्याचे महत्त्व पटले आहे आणि ज्यांना आरामात खायला, प्यायला मिळते आहे त्यांना कष्ट करणे कमीपणाचे वाटते आहे ही विसंगती कथक कथनातून ठळक करतो आहे.

कथानकात पुढे हरी मुंबईत जातो, योगायोगाने जग्गूच्या खाणावळीत कामाला लागतो आणि सहा-आठ महिने काम करतो तेव्हाही त्याला हेच लक्षात येते की आपण कष्टाची तयारी दाखवली, नवीन कौशल्य शिकायची तयारी दाखवली की माणसेही मदतीला पुढे येतात.हरीला घड्याळ दुरूस्ती शिकवणारे पानवाला आजोबा भेटतात तर लीलाला डिकास्टा कुटूंब आणि सय्यदभाईंकडून कामाचा मोबदला मिळतो.हरी आणि लीलाच्या कष्टांमुळे त्यांचे कुटूंब परत एकदा सुखाने जगू लागते.हरी-लीलाने नैतिकतेचा मार्ग सोडलेला नाही, कष्टाची तयारी दाखवली आहे म्हणून त्यांना सुखाचे दिवस येतात. त्यांना अनैतिक मार्गाने चटकन श्रीमंत व्हायचे नाही. कष्टाने जे मिळेल त्यात ते समाधानाने जगणार आहेत.शहरातील एकाकीपण, बकाल, निकृष्ट राहणीमान यापेक्षा गावातील कष्टाची भाजी-भाकरी बरी याचे भान काही महिने शहरात राहून आलेल्या हरीला आले आहे.श्रीमंत होण्यापेक्षा आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच लीला आणि हरीसाठी जास्त मोलाचे आहे.त्यासाठी स्वतःच्या मानसिकतेत आवश्यक ते बदल त्यांनी केले आहेत. आणि तेच नैसर्गिक आहे.कथनात अखेरीस पक्षीनिरीक्षक सय्यदभाई हेत जीवनाचे तत्वज्ञान आपल्या वैज्ञानिक निरीक्षणातून हरीपुढे उलगडून ठेवतात.हरीने त्यांचे पाणी गेल्याने नादुरूस्त झालेले घड्याळ दुरूस्त करून देण्याची तयारी दाखवल्यावर  ते म्हणतात-

“स्वीकार, स्वीकार.. तेच तू करणार आहेस. जसे पक्षी आणि प्राणी जिवंत राहण्यासाठी करतात.चिमणी, कबुतर यांनी शहरातले जगणे स्वीकारले आहे. ते शेतात जाऊन धान्य शोधून खाण्यापेक्षा शहरातील माणसांनी उकिरड्यावर टाकलेलं खाऊन जगतात.तर ..तुला गावात येणाऱ्या नवीन पर्यावरणाचा स्वीकार करावा लागेल.” “पण मला नाही कळंत मी तो कसा करायचा ?”  या हरीच्या प्रश्नावर सय्यदभाई म्हणाले-

 “अरे मुला, तू तर आताच मला सांगितलंस ना की तू तसा स्वीकार करणार आहेस.तू तुझ्या वाडवडिलांचा जगण्याचा पारंपरिक मार्ग सोडणार आहेस आणि थळमध्ये फॅक्टरीमुळे येऊ घातलेल्या नव्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी नवे मार्ग शोधणार आहेस , नवी कौशल्य शिकून आत्मसात करणार आहेस. तू नक्की टिकून राहशील.”

अशाप्रकारे ‘दी व्हिलेज बाय दी सी’ या कादंबरीतील कथन आधुनिक काळात अपरिहार्य ठरणाऱ्या बदलांना सामोरे जाताना गावातील कष्टकरी माणसांनी जगण्यासाठी शोधलेल्या नव्या मार्गांबद्दल सांगते.  शाश्वत काहीच नाही निसर्गही शाश्वत नाही नी देवांची देवळेही शाश्वत नाहीत आणि जगण्याचे मार्गही शाश्वत नाहीत.बदल अपरिहार्य आहेत आणि ते स्वीकारताना कष्टांना,प्रयत्नांना पर्याय नाही. कल्पकता,नवीन कौशल्य शिकायची तयारी असेल तर माणसांना त्यांच्या सभोवतीच्या निसर्गाशी नाते न तोडता जगायचे मार्ग सापडतील असे ‘दी व्हिलेज बाय दी सी’ ही कादंबरीला सांगायचे आहे हे कथनाचे  विश्लेषण केल्यावर आपल्याला लक्षात येते.

तुम्हाला ‘दी व्हिलेज बाय दी सी’या कादंबरीच्या कथनाचे हे विश्लेषण आवडले का? मूळ कादंबरी तुम्ही वाचताय ना ?जरूर कळवा.पुढील ब्लॉगमध्ये अनिता देसाई यांच्या ‘फायर ऑन दी माऊंटन’ या कादंबरीबद्दल बोलू .

                                                                                                      -गीता मांजरेकर

2 प्रतिसाद

  1. “दी व्हिलेज बाय द सी” या कथनाचे विश्लेषण आम्हाला पटले.

    Like

  2. या संकटांच्या वेळीच बुद्धीची, नैतिकतेची खरी कसोटी लागते. संकटाचे वेळी ज्याची नैतिक तत्त्व ढळत नाही, तोच खरा नीतिमान … बाकी शालेय परीक्षेत अव्वल येणे ह्यात काहीच अर्थ नाही .. आम्ही संकटकाळीच मुळी हललो आहोत..

    Liked by 1 person

यावर आपले मत नोंदवा