दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा एकदा ब्लॉग लेखनाला सुरूवात करते आहे. आपण ‘ऐसपैस’ या ब्लॉगमध्ये भारतीय इंग्रजी कादंबरीकार लेखिकांचा परिचय करून घेतो आहोत.तसे करताना प्रत्येक लेखिकेच्या चरित्राचा व कर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेऊन आपण त्या लेखिकेच्या तीन कादंबऱ्यांचा सखोल परिचय करून घेतो आहोत. आजवर कमला मार्कंडेय आणि नयनतारा सेहगल यांच्या प्रत्येकी तीन कादंबऱ्यांचा असा सखोल परिचय आपण करून घेतला आहे.या दोघींच्या थोड्या  नंतरच्या काळातील अनिता देसाई. त्यांच्या चरित्राचा व कादंबरीकार म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीचा धावता आढावा आपण आज घेणार आहोत.

ज्यांना ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.

अनिता देसाई यांचा जन्म २४ जून १९३७ चा आहे.आता त्या ८७ वर्षांच्या असून अमेरिकेत मॅसेच्युसेट विद्यापीठात मानव्यविज्ञान शाखेतील सन्माननीय प्राध्यापक म्हणून आजही त्या कार्यरत आहेत.पूर्वीच्या गढवाल प्रांतातील (आता उत्तराखंड)  मसूरी हे अनिता यांचे जन्मगाव आहे.त्यांची आई टोनी नाईम ही जर्मन महिला होती तर वडील डी.एन. मुझुमदार हे बंगाली होते.श्री.मुझुमदार हे जर्मनीला बर्लिन येथील महाविद्यालयात इंजिनियरींगचे शिक्षण घेत असताना त्यांची नाईम हिच्याशी भेट झाली. पुढे त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होऊन त्या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.त्या काळात भारतात असा आंतर्देशीय विवाह आगळावेगळा ठरला.कालांतराने मुझुमदारांनी आपल्या व्यवसायानिमित्त मसुरीहून दिल्लीत स्थलांतरीत होण्याचे ठरवले. त्यामुळे अनिताचे, तिच्या दोन थोरल्या भगिनींचे आणि भावाचे शिक्षण दिल्लीत झाले.दिल्लीत वास्तव्य असल्याने अनिताला सभोवतालच्या लोकांशी हिंदी भाषेत बोलावे लागे त्यामुळे हळूहळू त्यांना हिंदी भाषा अवगत झाली. जर्मन भाषा त्या फक्त घरात बोलत.घरीच त्या अन्य भाषा म्हणजे बंगाली,उर्दू आणि इंग्रजीही शिकल्या.सातव्या वर्षी त्यांना शाळेत इंग्रजी भाषा लिहिता येऊ लागली.इंग्रजी हीच त्यांच्या साहित्यनिर्मितीची भाषा झाली.नवव्या वर्षी अनिता यांनी आपला पहिला कथासंग्रह प्रकाशित केला.

दिल्ली येथे क्विन मेरी हायर सेकंडरी शाळेत अनिता यांनी शिकायचे ठरवले.१९५७ मध्ये त्या मिरांडा हाऊस, दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी विषयात पदवीधर झाल्या.१९५८ मध्ये त्यांचा अश्विन देसाई यांच्याशी विवाह झाला.त्या मुंबईत स्थलांतरीत झाल्या. देसाई हे पुढे एका नामांकित संगणक प्रणाली बनवणाऱ्या कंपनीचे डायरेक्टर बनले.अनिता आणि अश्विन देसाई यांनी चार अपत्यांना जन्म दिला.त्यातील एक किरण देसाई यादेखील एक नामांकित इंग्रजी कादंबरीकार आहेत आणि त्यांना मानाचा बुकर पुरस्कार मिळाला आहे.आपल्या लहान मुलांना अनिता देसाई मुंबईपासून जवळच असणाऱ्या अलिबागजवळील थळ या गावी  सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी घेऊन जात.या गावातील लोकांच्या जगण्यावरच त्यांनी आपली एक कादंबरी लिहिली. तिचे नाव होते ‘दी व्हिलेज बाय दी सी’.बालसाहित्य गटात या कादंबरीला १९८३ साली ब्रिटनमधील प्रख्यात गार्डियन पुरस्कार मिळाला. पुढील दोन ब्लॉगजमध्ये आपण या कादंबरीचा सखोल परिचय करून घेणार आहोत.

अनिता देसाई यांची कादंबरीकार म्हणून कारकीर्द१९६३ पासून सुरू झाली आणि आजवर त्यांचे कादंबरीलेखन सुरू आहे.त्यांनी एकूण बारा कादंबऱ्या लिहिल्या आहेत.यावर्षी म्हणजे २०२४ मध्ये त्यांची ‘रोझारीटा’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे.२००४ ते २०२४ या वीस वर्षांत मात्र त्यांनी कादंबरीलेखन केलेले दिसत नाही. कथा व अन्य ललित साहित्यप्रकारही  त्यांनी हाताळले आहेत.त्यांच्या तीन कादंबऱ्या बुकर पारितोषिकासाठी नामांकित झाल्या होत्या हे विशेष.

‘क्राय दी पिकॉक’ ही अनिता देसाई यांची पहिली कादंबरी.तिला १९६३साली भारतातील नामांकित साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे. उत्तरप्रदेशातील लखनौ येथील एका श्रीमंत रायसाहेबांची मुलगी माया ही व्यक्तिरेखा ‘क्राय दी पिकॉक’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे.मायाचा भाऊ अर्जुन हा अमेरिकेत शिक्षण घेतो आहे.माया ही रायसाहेबांची लाडकी मुलगी आहे आणि तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा रायसाहेबांचा प्रयत्न आहे.मायाची आई तिच्या लहानपणीच निधन पावली आहे.वडील हेच तिचे सर्वस्व आहेत.त्यांच्या इच्छेखातर ती त्यांचे मित्र गौतम यांच्याशी विवाह करते. जे वयाने तिच्यापेक्षा बरेच मोठे आहेत आणि त्यांची प्रवृत्तीही तिच्या स्वभावाशी जुळणारी नाही.गौतम हे आध्यात्मिकतेत आनंद शोधणारे आहेत तर मायाला भौतिक गोष्टींत स्वारस्य आहे.गौतम मायाला शारीरिक सुख देऊ शकत नाही आणि तिच्याकडे दुर्लक्षच करतात.त्यामुळे मायाचे आयुष्य जणू नरकासारखेच होते.गौतमची आई आणि बहीण त्यांच्या घरी अधूनमधून येतात तेव्हाच मायाला एकाकीपणातून थोडासा दिलासा मिळतो.मायाने टोटो नावाचा कुत्रा पाळला आहे. जो मरण पावल्याने माया फारच दुःखी होते. गौतमला मात्र तिचे दुःख जाणवत नाही.त्यांना वाटते की एक कुत्रा गेला तर दुसरा आणता येतोच.मनातील इच्छा दडपल्यामुळे माया हळहळू वैफल्यग्रस्त होते. तिची छोटी-छोटी स्वप्न देखील अपुरी राहतात.आपल्याच कल्पनाविश्वात ती स्वतःला रमवू लागते.प्रत्येक पावसाळ्यात जेव्हा मोर नाचताना माया पाहते तेव्हा ती स्वतःला मोराच्या जागी पाहते.मोर आपल्या जोडीदारासाठी उत्कट होतो तेव्हा मायाही प्रेमासाठी आतूर होते.मायाची आई लहानपणीच वारली आहे आणि कोणीही स्त्री तिच्या आयुष्यात नाही जिला ती आपले हे दुःख सांगू शकेल.तिच्या नकळत माया गौतमचा द्वेष करते आणि एके दिवशी दोघे घराच्या गच्चीवर गेले असताना ती गौतमला खाली ढकलून देते. आपली कोंडवाड्यातून मुक्तता झाली असे तिला वाटते.गौतमची आई आणि बहीण मायाला तिच्या माहेरी परत पाठवून देतात. पण तिथे मायाची वैफल्यग्रस्तता इतकी वाढत जाते की अखेरीस वडिलांना तिची वेड्यांच्या इस्पितळात पाठवणी करावी लागते.

‘व्हॉईसेस इन दी सिटी’ ही अनिता देसाई यांची दुसरी कादंबरी १९६५ मधील आहे.या कादंबरीला कलकत्ता या भारतातील महानगराची पार्श्वभूमी आहे. आधुनिकतेचा स्वीकार करताना भारतात जे सामाजिक बदल झाले त्याचे प्रतिबिंब या कादंबरीत दिसते. तरूणांच्या मनातील पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा संघर्ष या कादंबरीत पाहता येतो.आधुनिकतेची काळी बाजू अनिता देसाई आपल्या कादंबरीतल्या वर्णनांतून दाखवतात.महानगरांतील गर्दी, आवाज,जगण्याचा प्रचंड वेग,तरूणांच्या जगण्यातील ताणतणाव, शांतपणे विचार करायल, अभिव्यक्तीला नसलेले स्वातंत्र्य व अवकाश याबद्दल अनिता देसाई लिहितात. महानगरांतील तरूणांचे जगणे त्यांना आनंददायी वाटत नाही.’व्हॉईसेस इन दी सिटी’ या कादंबरीच्या केंद्रस्थानी तीन भावंडे आहेत. यातील सगळ्यात मोठी मुलगी मोनिषा ही अतीविचारी, संवेदनशील आणि त्यामुळे मानसिक दृष्ट्या अस्थिर आहे.तिचे लग्न एका पारंपरिक विचाराच्या कुटुंबात झाले आहे.तिथे ती एका निष्ठावान,आज्ञाधारक पत्नीची भूमिका निभावते आहे.पण खोल मनात ती घरातील सर्वच बाबतीतील  अस्वच्छ वातावरणाने कुढत राहते.तिला मुल होत नाही.आपल्या जुनाट पारंपरिक कुटुंबात मुल जन्माला घालणे तिला निरर्थक वाटते.कादंबरीच्या अखेरीस मोनिषा बाथरूममध्ये स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करते.तिच्या भावंडांना तिने असा टोकाचा निर्णय का घेतला हे कळत नाही. पण नंतर तिची डायरी त्यांना मिळते आणि तिच्या अंतर्मनातील कोंडीची त्यांना जाणीव होते.मोनिषाचा धाकटा भाऊ निर्वेदला देखील कलकत्त्यातील जीवनात जुळवून घेता येत नाही. तो वर्तमानपत्रात काम करत असतो. पण लौकरच त्याला तिथे स्वतःच्या मुक्त अभिव्यक्तीला काहीच संधी नाही असे जाणवते आणि तो नोकरी सोडतो.खरे तर गावी त्यांचा जमिनजुमला आहे आणि त्याची विधवा आई त्याला काम शोधून देण्यासाठी प्रयत्न करते आहे पण निर्वेदला ते नको आहे.तो स्वतःचे मासिक काढायचा प्रयत्न करतो, नाटक लिहिण्याचा प्रयत्न करतो पण त्याला यश मिळत नाही.त्याला कलकत्ता महानगर  हे कालीमातेसारखे क्रूर,क्रोधीत वाटायला लागते.गावी जाऊन आईला भेटून आल्यावर मात्र त्याला काली केवळ क्रूर नसते तर ती प्रेमळ माताही असते याची जाणीव होते.’व्हॉईसेस इन दी सिटी’ या कादंबरीतील तिसरी व्यक्तिरेखा अमला ही देखील तिच्या भावंडांसारखीच संवेदनशील आहे पण ती निराशाग्रस्त नाही. तिच्यावरही तिच्या भावाप्रमाणे कलकत्त्यातील धर्मा या चित्रकाराचा प्रभाव आहे.धर्मा तिला आपल्या चित्रांसाठी मॉडेल बनवतो, आपल्या कलासक्त मित्रमंडळांत तिला सामावून घेतो. पण लौकरच अमलाला या चित्रकारांच्या जगण्यातील अंतर्विरोध जाणवतो. विशेषतः धर्मा स्वतःच्या मुलीशी किती क्रूरपणे वागतो ते पाहून तिला त्याच्याबद्दल भ्रमनिरास होतो.आपली जाहिरात कंपनीतली कंटाळवाणी नोकरी अमला करत राहते आणि शहरातील जगणे असेच असणार हे स्वीकारून स्वतःच्या अभिव्यक्तीसाठी संधी ती शोधते.त्यातून तिला जगण्यातले समाधान गवसते.अशाप्रकारे महानगरातील असमाधान, अतृप्ती आणि अंतर्विरोधाने भांबावलेले युवक हा ‘व्हॉईसेस इन दी सिटी’ या अनिता देसाई यांच्या कादंबरीचा विषय आहे.

‘बाय बाय ब्लॅक बर्ड’ ही अनिता देसाई यांची तिसरी कादंबरी १९७१ मध्ये प्रकाशित झाली.अनिता देसाई यांची ही तुलनेने कमी प्रसिद्ध कादंबरी म्हणता येईल.या कादंबरीच्या शीर्षकातला ‘ब्लॅकबर्ड’ हा शब्द इंग्लंडमध्ये स्थलांतरीत आफ्रिकन,दक्षिण अमेरिकी आणि आशियाई लोकांसाठी वापरला जातो.सर्वच ब्रिटीश स्थलांतरीतांबद्दल स्वागतशील, स्वीकारशील नसतात.कित्येकांना स्थलांतरीतांमुळे आपल्याला नोकरीची संधी मिळत नाही असे वाटते तर अजूनही कित्येकांना वर्णवर्चस्ववादी वृत्तीने ग्रासलेले आहे. त्यामुळे स्थलांतरीतांचे ब्रिटनमधील जगणे वाटते तेवढे आनंददायक नसते.त्यांना बरेचवेळा एकाकीपणा जाणवतो.’बाय बाय ब्लॅकबर्ड’ या कादंबरीत अशा तीन स्थलांतरीत भारतीयांवर स्थलांतराचे जे मनोकायिक परिणाम घडले ते दाखवले आहे. अदित ही एका बंगाली मुलाची व्यक्तिरेखा  आहे. तो ब्रिटनमध्ये नोकरी करतो आहे आणि ब्रिटीश मुलीशी त्याने विवाह केला आहे. पण तरीही त्याला कलकत्त्याची स्वप्ने पडतात,आपण सतार ऐकतो आहोत, आपल्या बायकोला आपली आई  सोनेरी काठाची साडी नेसवते आहे असे त्याला स्वप्नात दिसत राहते.दुसरा स्थलांतरीत देव याला खरं तर इंग्लिश भाषा व वातावरणाबद्दल अढी आहे पण प्रत्यक्षात लंडनमध्ये आल्यावर त्याला तेथील पब संस्कृती आवडते आहे.तिथे गेले की आपला एकाकीपणाचे दुःख तो विसरू शकतो आहे. सारा ही तिसरी व्यक्तिरेखा भारतीय वंशाच्या कुटुंबात ब्रिटनमध्येच जन्माला आलेली आहे आणि तरूण वयात तिला भारतीय स्थलांतरीत तरूणाचेच आकर्षण वाटते.अखेरीस ती त्याच्याशीच विवाह करते. जेव्हा ती आपल्या पतीबरोबर पुन्हा भारतात जायचे ठरवते तेव्हा तिच्या लक्षात येते की आपले आई-वडील लहानपणापासून जसे प्रेमळ वाटत होते तसे अजिबात नाहीत. ते तिला भारतात परत जाण्यापासून परावृत्त करू पाहत आहेत.ती मात्र आता एका अपत्याला जन्म देणार आहे आणि भारतीय संस्कृतीत बाळाला वाढवण्यासाठी उत्सुक आहे.भारतीय माणसाशी विवाह केल्याने आपले ब्रिटीश मित्र-मैत्रिणी एवढेच नाही तर आई-वडीलही आपल्यापासून दुरावणार अशी खंत मात्र साराच्या मनात आहे.अशाप्रकारे स्थलांतरीत भारतीयांच्या  वाट्याला येणारे परात्मतेचे अनुभव ,त्यांच्या वेगवेगळ्या मनोवृत्ती ‘बायबाय ब्लॅकबर्ड’ या कादंबरीत अनिता देसाई रंगवतात. 

‘व्हेअर शॅल वी गो धिस समर ?’ ही अनिता देसाई यांची कादंबरी १९७५ साली प्रसिद्ध झाली.या कादंबरीत सीता ही मुंबईत राहणारी मध्यमवर्गीय स्त्री केंद्रस्थानी आहे. सीता ही रमणची बायको आहे .रमण हा मुंबईत छोटा व्यवसाय करणारा माणूस आहे.मुंबईतील धकाधकीमुळे तो कोरडा, व्यवहारी झाला आहे. सीताकडे तो उपभोग्य वस्तू म्हणून पाहतो. सीता आणि रमण या दांपत्याला चार मुले आहेत आणि पाचवे मुल सीता जन्माला घालणार आहे. या पाचव्या बाळंतपणाची चाहुल लागल्यापासूनच सीता सैरभैर झाली आहे. तिला हे मुल नकोसे वाटते आहे.सीताचे वडील एकेकाळचे स्वातंत्र्यसैनिक पण नंतर त्यांनी मनोरी या गावी सर्वसामान्यांना जडीबुटीची औषधे देण्याचा, जादूटोणा करण्याचा व्यवसाय करून पोट भरले आहे .त्यांना सीताखेरीज आणखी एक मुलगाही आहे. पण त्यांनी कधीच मुलांवर प्रेम केलेले नव्हते. सीताची आईही नवऱ्याच्या जाचाला व बदफैली वागण्याला  कंटाळून संसार सोडून पळून गेली होती.आपले वडील काहीतरी जादुटोणा करून आपले बाळंतपण  आणि पाचव्या मुलाचा जन्म थांबवतील असे सीताला वाटते. म्हणून ती आपली दोन लहान मुले घेऊन मनोरीला जाते. वस्तुतः तिचे वडील कधीच मरण पावले आहेत. पण मुंबईतील निष्प्रेम आयुष्यात तिला मनोरी गावाची आठवण होत राहते.सीता मनोरीला जाते आणि तिथे तिचा भ्रमनिरास होतो. आपले वडील खरोखर कसे दुष्ट होते हेच तिला कळते.शेवटी रमण सीताला पुन्हा घरी न्यायला येतो आणि तोपर्यंत सीतानेही मुंबईतील आयुष्य कसेही असले तरी तिथेच आपले घर -कुटूंब आहे हे मनोमन स्वीकारले आहे. त्यामुळे कादंबरीच्या अखेरीस सीता  मनोरीहून मुंबईला परत येते.आता तिला मुंबईखेरीज दुसरीकडे जाण्यासाठी पर्यायच राहिलेला नाही.

१९७७ साली अनिता देसाई यांची ‘फायर ऑन दी माऊंटन’ ही कादंबरी प्रकाशित झाली.याही कादंबरीसाठी अनिता देसाई यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. अन्य मानाचे पुरस्कारही त्यांना या कादंबरीसाठी मिळाले आहेत. हीच त्यांची बहुचर्चित कादंबरी आहे. एका श्रीमंत स्त्रीचे एकाकीपण आणि स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी तिची चाललेली धडपड या कादंबरीत दिसते.या पुस्तकाबद्दल आपण पुढील एका ब्लॉगमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे इथे मी या कादंबरीबद्दल अधिक लिहित नाही.

‘क्लियर लाईट ऑफ दी डे’ ही अनिता देसाई लिखीत कादंबरी १९८० साली प्रकाशित झाली.या कादंबरीत आपले व्यक्तिगत चरित्र मोठ्या प्रमाणात चित्रीत झाले आहे असे अनिता देसाई म्हणतात. फाळणीनंतरच्या भारतातील जुन्या दिल्लीत घडणारे कथानक या कादंबरीत आहे.कुटुंबाचे महत्त्व,एखाद्याला माफ करण्याचे महत्त्व, लहानपणातील आठवणींचे सामर्थ्य आणि स्त्रियांचे समाजातील स्थान याबद्दल ही कादंबरी बोलते.या कादंबरीच्या केंद्रस्थानी दास कुटूंब आहे. त्यातील मुले मोठी झाल्याने कुटूंबापासून दुरावली आहेत.तारा ही दास कुटुंबातील मुलगी बकुलशी लग्न करून अमेरिकेत गेली आहे. बकुल हा भारताचा अमेरिकेतील राजदूत आहे.ताराची बहीण बिमला जुन्या दिल्लीतील एका घरात राहते आहे. ती इतिहासाची शिक्षिका आहे. आपल्या स्वमग्न भावाला-बाबालाही ती सांभाळते आहे.तारा आणि बिमलाचा आणखी एक भाऊ- राजा हा हैद्राबाद येथे राहतो आहे.त्याच्या मुलीच्या लग्नासाठी तारा अमेरिकेहून आली आहे पण बिमलाची त्या लग्नाला जाण्याची अजिबात इच्छा  नाही.राजा जेव्हा लहान होता तेव्हा त्याला टी.बी. झाला होता.बिमलाने त्याची काळजी घेतली होती.पण पुढे राजाने त्यांचे हैद्राबादचे त्यांचे राहते घर बळकावून बिमलाचा अपमान केला होता.बिमला हे अमेरिकेहून आलेल्या ताराला सांगते.बाबा या स्वमग्न भावाची जबाबदारी बिमलावर एकटीवर पडली आहे.राजाशी तर तिने संबंधच तोडला आहे.तारा लग्नाला निघून जाते आणि आपल्या स्वमग्न भावावर बाबावर बिमला सगळा राग काढते.पण नंतर मात्र तिला पश्चात्ताप होतो. शेजारच्या मिश्रांकडे ती संगीताचा कार्यक्रम ऐकायला जाते तेव्हा त्यातील गाण्यांनी बिमला अंतर्मुख होते. अखेर आपले नातेवाईकच आपल्या मनाला दिलासा देऊ शकतात हे तिला जाणवते. राजाच्या मुलीचे लग्न झाले की तारा परत बिमलाकडे येणार आहे. बिमला ताराला सांगते की तिने राजालाही सोबत आणावे कारण तिने त्याला माफ केले आहे.

‘इन कस्टडी’ ही अनिता देसाई यांची १९८४ साली प्रसिद्ध झालेली कादंबरी आहे.बुकर पारितोषिकासाठी तिचे नामांकन करण्यात आले होते.या कादंबरीवर आधारित चित्रपटही प्रसिद्ध झाला आहे. या कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा देवेन शर्मा ही आहे. दिल्लीतील एका छोट्या महाविद्यालयात हिंदीचे अध्यापन करणारा देवेन आयुष्याबद्दल असमाधानी आहे. त्याला उर्दू कवी बनण्याची इच्छा होती. किमान उर्दू शिकवणारा प्राध्यापक म्हणून आपली ओळख व्हावी असेही त्याला वाटत होते. पण प्रत्यक्षात तो हिंदीचा प्राध्यापक झाला होता जे त्याच्या असमाधानाचे एक कारण होते. त्याच्या संसारातही भांडकुदळ, प्रेमशून्य पत्नी वाट्याला आल्याने देवेन दुःखी होता.अशा निराश परिस्थितीत अचानक  उर्दू कवी नूर यांची मुलाखत घेण्याची संधी त्याचा एक मित्र त्याला देतो. नूर हा फार लहानपणापासून देवेनचा आवडता कवी आहे. त्याच्या वडिलांकडून त्याने नूरचे शेर बालवयात ऐकले आहेत.आणि पुढे नूरच्या कविता हा नेहमीच त्याच्या आदराचा विषय राहिला आहे. नूरची मुलाखत घेण्यासाठी देवेन पूर्ण तयारी करतो. नूरच्या घरी त्यासाठी देवेनला जावे लागणार आहे. पण ते घर शोधून काढूत देवेन जेव्हा प्रत्यक्ष नूरला पाहतो तेव्हा त्याचा भ्रमनिरास होतो. कारण नूर व्यसनात बुडालेला,अगदी सामान्य वस्तीत राहणारा,कुटुंबातील कटकटींना वैतागलेला माणूस आहे. त्याचे  अस्ताव्यस्त घर, तेथील अस्वच्छता , दारूचा दुर्गंध, त्याच्या भांडणाऱ्या बायका, नूरला लुबाडणारे त्याचे आप्तस्वकीय हे सगळे जेव्हा देवेन पाहतो तेव्हा तो मुलाखतीची जागा बदलतो. पण तरीही नूरची परिस्थिती तो विसरू शकत नाही.नूरच्या घरातील लोकांनी केलेल्या मानधनाच्या, प्रवासखर्चाच्या मागण्या ऐकून देवेन हैराण होतो.देवेनचे मुलाखतीवरचे मनच उडते आणि त्याला हवी तशी मुलाखत तो घेऊ शकत नाही.नूरच्या मुलाखतीचा प्रयत्नच देवेन सोडून देतो.मात्र या सगळ्या प्रक्रियेत त्याला स्वतःचे आयुष्य नूरपेक्षा बरेच चांगले आहे आणि वस्तुतः नूर आणि त्याच्यात काही फरकच नाही असे वाटू लागते. अखेरीस आपले आहे तेच आयुष्य स्वीकारून समाधानाने जगावे असे देवेन मनोमन  ठरवतो.

‘बॉंबगार्टनर्स बॉम्बे’ ही अनिता देसाई यांची आणखी एक कादंबरी १९८८ साली प्रसिद्ध झाली.जर्मनीतून भारतात पळून आलेली एका ज्यू व्यक्ती या कादंबरीची मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे.या कादंबरीला वैविध्यपूर्ण भौगोलिक व सांस्कृतीक पार्श्वभूमी लाभली आहे.बर्लिन, व्हेनिस, मुंबई आणि कलकत्ता या अवकाशात कादंबरीचे कथानक घडत जाते.ह्युगो बॉंबगार्टनर हा  तरूण जर्मनीतील एका श्रीमंत ज्यू दुकानदाराचा मुलगा असतो. पण त्याच्या वडिलांच्या फर्निचरच्या दुकानावर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते ज्यू म्हणून बहिष्कार टाकला जातो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मार्गच संपतो.ह्युगोच्या वडिलांना पकडून छळ छावणीत नेले जाते.वैफल्यग्रस्त होऊन ते पुढे आत्महत्या करतात. ह्युगोची आई जर्मनीतच राहते. पण तो स्वतः मात्र जीव वाचवण्यासाठी आधी व्हेनीसला जातो आणि तिथून पुढे मुंबईत आणि नंतर कलकत्त्याला जातो. तेथे तो लाकडाचा व्यापारी म्हणून काम करत असतो पण  इंग्रज सरकार त्याचा छळ करते.ह्युगो कलकत्त्यातून पळ काढतो आणि पुन्हा मुंबईत येऊन विरक्तपणे राहू लागतो.पण आपल्या देशापासून, माणसांपासून दुरावलेला ह्युगो मुंबईत तसा एकाकीच असतो.एक जर्मन बाई थोडा काळ त्याच्या आयुष्यात येते पण ती ह्युगोशी नाते जोडत नाही. चिमणलाल हा व्यापारी मात्र ह्युयगोचा चांगला मित्र होतो. हे दोघे मित्र घोड्याच्या रेसवर पैसे लावू लागतात.पुढे तर स्वतःच भागीदारीतून घोडा विकत घेतात आणि त्याला रेसमध्ये उतरवतात.त्यातून मिळालेली बक्षिसे चिमणलालच्या मृत्यूपश्चात ह्युगोकडे येतात. तो आपल्या कुलाब्यातल्या घरी ती जतन करतो.ह्युगोला भटक्या मांजरांना खायला घालायचीही आवड आहे. त्यासाठी तो कुलाब्यातील हॉटेल्समध्ये जाऊन उरलेसुरलेले खाद्य गोळा करतो आणि रस्त्यावर मांजरांना ते देत फिरतो.त्याचे नावच कुलाब्यात ‘दी मॅडमॅन ऑफ दी कॅटस’ असे पडलेले असते.अशा या प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसाचा खून झाल्याची बातमी वर्तमानपत्रात येते. पोलीस त्याच्या खूनाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना कळते की घोड्याच्या रेसमध्ये चिमणलालबरोबर ह्युगोने मिळवलेली आणि जतन करून ठेवलेली बक्षीसे चोरण्यासाठीच एका जर्मन हिप्पीने ह्युगोचा खून केलेला असतो.त्या हिप्पीला ती बक्षिसे विकून ड्रग्ससाठी पैसे मिळवायचे असतात.

‘जर्नी  टू इथाका’ ही अनिता देसाई यांची आणखी एक कादंबरी.१९९५ मध्ये ती प्रकाशित झाली.एका प्रसिद्ध इंग्रजी कवितेवरून या कादंबरीचे शीर्षक लेखिकेने योजले आहे.तीन परदेशी माणसांच्या आत्मज्ञानाच्या शोधाचा प्रवास या कादंबरीत लेखिका रंगवते.ही माणसे इटली,जर्मनी अशा देशांतून आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याच्या इच्छेने भारतात येऊन पोहचतात.या तिघांतील एक मदर ही वयाने बरीच मोठी आहे. तर अन्य दोघे पती-पत्नी असून त्यांना दोन मुले आहेत. आपल्या मुलांना आजी-आजोबांकडे ठेवून कुठल्याशा आंतरीक ओढीने हे दांपत्य भारतात येते. इथे त्या दांपत्यातील पुरूष हा लैला (मदर)च्या व्यक्तिमत्वाने प्रभावीत होतो तर त्याची बायको मात्र मदरच्या आश्रमात एकटेपणा अनुभवते.या तीन परदेशी व्यक्तींना खरोखर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते की त्या ज्ञानाच्या शोधाच्या प्रवासात ते परागंदा होतात ते कादंबरी वाचले तर लक्षात येईल.रहस्यमय,गूढ कादंबरी असे ‘जर्नी टू इथाका’ या कादंबरीचे स्वरूप आहे.

‘फास्टिंग-फिस्टींग’ ही अनिता देसाई यांची कादंबरी पुनश्च एकदा बुकर पारितोषिकासाठीच्या स्पर्धेत आली होती.’फास्टिंग-फिस्टींग’ कादंबरीत अमेरिकेतील प्रचंड उपभोगवादी संस्कृती आणि भारतातील त्यागवादी संस्कृती यांच्यातील विरोध कथानकाच्या अनुषंगाने लेखिकेने ठळक केला आहे. आपण पुढील एका ब्लॉगमध्ये या कादंबरीचा सखोल अभ्यास करणार आहोत.

‘ दी झिगझॅग वे’ नावाची आणखी एक कादंबरी अनिता देसाई यांनी २००४ साली लिहिली तर २०२४ मध्ये त्यांची शेवटची कादंबरी ‘रोझॅरिटो’ प्रकाशित झाली आहे.या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये आपला भूतकाळ शोधायला निघालेले तरूण दिसतात.’झिगझॅग वे’ या कादंबरीत मेक्सिकोच्या खाणीत पूर्वी काम करणाऱ्या आजोबांचा, आजीचा शोध घेणारा एक तरूण केंद्रवर्ती आहे. तर ‘रोझॅरिटा’ या कादंबरीत अमेरिकेत येऊन आपल्या घटस्फोटीत आईचा शोध घेणारी भारतीय मुलगी आहे.

 अशाप्रकारे आधुनिकतेचा स्वीकार करताना तो विशिष्ट मर्यादेतच करावा तसेच अस्तित्वाचे प्रश्न कित्येकवेळा आपल्या विशिष्ट मानसिकतेतून, आपल्या कल्पनाविश्वातून निर्माण होतात आणि वास्तवाचे भान आल्यावर ते सुटू शकतात  असेही अनिता देसाई यांना आपल्या कादंबरीतून सुचवायचे असावे.पुढील काही ब्लॉग्जमध्ये आपण अनिता देसाई यांच्या निवडक तीन कादंबऱ्यांची कथानके लक्षात घेऊन , कथनाच्या विश्लेषणाआधारे या कादंबऱ्यांचा सखोल अभ्यास करणार आहोत.

  • गीता मांजरेकर

__________________________________________________________________________________________________________________

2 प्रतिसाद

  1. सर्व कादंबरीच्या परिचयावरून शेवटास असे लक्षात येते की, बदलता न येणार्या परिस्थितींना स्वीकारून नदीसारखेे प्रवाही पण उदारतेने वागावे, जवळच्या माणसांबद्दल झालेला त्रास विसरून त्यांना माफ करावे…आणि समाधानाने जगावे.

    Like

    1. बरोबर आहे तुझे आकलन चैतन्या !

      Like

यावर आपले मत नोंदवा