‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्रे आपण मागील ब्लॉगमध्ये लक्षात घेतली.ती तुमच्या लक्षात असतीलच. आज आपण या कादंबरीच्या कथनाचे विश्लेषण करून नयनतारा सेहगल यांची या कादंबरीलेखनामागील अंतर्दृष्टी शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत.
‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ ही कादंबरी मराठीत भाषांतरीत झालेली आहे. आणि अश्विनी धोंगडे यांनी केलेले हे भाषांतर दिलिपराज प्रकाशनाने वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आहे.मी या भाषांतरीत कादंबरीच्या आधारेच कथनाचे विश्लेषण करणार आहे.ज्यांना हा ब्लॉग वाचण्यापेक्षा ऐकणे सोयीचे वाटते त्यांच्यासाठी सोबत ऑडियो फाईल जोडली आहे.
‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ ही कादंबरी तृतीय पुरूषी निवेदनात आहे.तृतीय पुरूषी निवेदकाला सर्वज्ञ निवेदक असेही म्हणतात. असा निवेदक कादंबरीतील व्यक्तिरेखांबद्दल सांगताना त्यांचे भूतकाळ तर कथन करतोच पण त्याबरोबर त्या व्यक्तिरेखांच्या मनात काय चालले आहे तेही कथक सांगतो.’दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीच्या कथनातही तसेच घडलेले दिसते. त्यामुळे त्या-त्या व्यक्तिरेखांच्या भूतकाळाचे संदर्भ आणि त्यांची जीवनदृष्टी कथनातून उलगडत जाते.
‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ कादंबरीच्या कथनात काहीवेळा कथनातून जे वर्णन केले आहे ते इतके सूक्ष्म केले आहे की ज्यामुळे तो प्रसंग वाचकांच्या डोळ्यांसमोर ठळकपणे उभा राहील.वाचकांच्या अंगावर येतील अशी ही वर्णने कथनात हेतूतः योजलेली आहेत.एखाद्या घटनेचा गडद परिणाम वाचकांच्या मनावर घडवण्याचे सामर्थ्य याप्रकारच्या कथनात आहे.उदा. प्रभू प्रभाकरच्या वडीलांचे बांधकाम मजूर म्हणून चालणारे काम आणि त्यांचा झालेला अपघाती मृत्यू याचे वर्णन कथक तपशीलवार करतो.कतरीना आणि तिच्या सहकारी ज्या मुस्लीम वस्तीत काम करत होत्या तेथील स्त्रियांवर आणि कतरीनावर झालेल्या अमानुष अत्याचारांचे वर्णनही कथनात बारकाव्यांसह केले आहे.तसेच मॉल रोडवरील महात्मा गांधींचा पुतळा तोडला जात असतानाचे वर्णन कथक खूप तपशीलवार करतो. कैफ या उपहारगृहातील रफिकची वस्ती तोडून टाकल्यावर त्यांना ज्या छावणीत ठेवण्यात आलेले असते तेथील दारिद्र्य आणि दुःखाचे वर्णनही कथक तपशीलवार करताना दिसतो. त्यामागे भांडवलदारी मनोवृत्तीच्या लोकांचा कामगारांबद्दलचा बेजबाबदारपणा तसेच तथाकथीत संस्कृतीरक्षक लोकांची अत्यंत संकुचीत आणि विध्वंसक वृत्ती वाचकांना ठळकपणे दाखवून देण्याचाच कथकाचा उद्देश आहे.

‘फेट ऑफ दी बटरफ्लाईज’च्या कथानकात काही गोष्टी लेखिका कथनातून सूचकपणे मांडताना दिसते. उदा. सर्गेईला शस्त्रास्त्र विक्रीसाठी भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणी करताना त्या खोलीतील भिंतीवर खंजिरी, कट्यार लावलेली पहायला मिळाली होती.भिंतीवरील कोणा पुरूषाची तसबीरही त्याला नवी दिसली होती. पूर्वी या गोष्टी भिंतीवर नव्हत्या आणि आता आहेत याचा संदर्भ सर्गेईने भारतात झालेल्या सत्ताबदलाशी जुळवला होता.भारतातील सत्ताबदल सर्गेईला अनपेक्षीत वाटला होता.भारतीय प्रजासत्ताकाच्या लोकशाहीचा पाया घालणाऱ्यालाच हाकलले गेले होते.कथनातील हे सूचक संदर्भ समकालीन राजकीय परिस्थितीची जाणीव वाचकांना करून देण्यासाठीच येतात.तसेच महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचा विध्वंस करताना त्यांचे पाय सर्वप्रथम तोडले गेले, मुस्लीम वस्तीतील स्त्रियांवर बलात्कार करताना त्यांच्या पायांवर पहिल्यांदा घाव घातले गेले आणि बॉंजो या प्रल्हाद-फ्रँकोजच्या उपहारगृहावर हल्ला करणाऱ्यांनी प्रल्हादच्या पायांवर प्रहार केले असे कथक लिहितो तेव्हा प्रतिगामी,सनातनी,हिंसक वृत्तीच्या माणसांना समतावादी, मानवतावादी तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चळवळ पुढे जायला नको आहे हे कथकाला सुचवायचे आहे.
नयनतारा सेहगल या व्यासंगी लेखिका आहेत. इंग्रजी पुस्तकांचे वाचन, इंग्रजी चित्रपट पाहणे,पाश्चात्य अभिजात संगीत ऐकणे या गोष्टी लेखिकेच्या नित्य नियमाच्या आहेत. त्यामुळे सेहगल यांच्या या व्यासंगाचा, बहुश्रुततेचा प्रत्यय ‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीच्या कथनात वेळोवेळी येत राहतो. उदा. कादंबरीच्या प्रारंभीच सर्गैई बॉंजो या उपहारगृहात न्याहारी करत असताना त्याच्या बाजूच्या टेबलावर काही परदेशी तरूण परस्परांशी व्यापाराची सामुराई योद्ध्यांप्रमाणे डावपेच लढवत चर्चा करताना दिसतात.स्वतः सर्गेईदेखील भारतात शस्त्रास्त्रांच्या व्यापाराच्या हेतूनेच आलेला आहे.व्यापार हा संपूर्ण जगाला व्यापणारा, सत्ताधाऱ्यांचे साधन कसा झाला आहे हे सांगताना कथक म्हणतो-
“जुन्या पंच मासिकात एक व्यंगचित्र होते. त्यात सेसिल ऱ्होडस विजयीवीराप्रमाणे आफ्रिकेत कैरोपासून केपपर्यंत पाय फाकवून खांद्यावर बंदूक धरून उभा होता. या चित्रानेच ही कथा दाखवली होती…”
सेसिल ऱ्होडसचा संदर्भ कादंबरीच्या अखेरीसही येतो. य़ाखेरीज पुस्तकाच्या पहिल्याच पानावर असलेल्या ‘फॉलो दी फ्लीट’ या सिनेमातील गाण्याच्या ओळी, लिसेट या व्यक्तिरेखेच्या तोंडी आलेल्या माय लव्ह परेड या सिनेमातील गाण्याच्या ओळी,फ्रँकोजच्या घरी पार्टीच्या वेळी गायले गेलेले अल-दि-ला हे इटालियन गाणे असे संदर्भही कथनात समर्पकपणे येतात तेव्हा नयनतारा सेहगल यांच्या रसिकतेचा, व्यासंगीपणाचा प्रत्यय येतो.
याखेरीज अनेक ऐतिहासिक,राजकीय संदर्भ ‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’च्या कथनात आहेत. ते त्या-त्या व्यक्तिरेखेच्या विचारप्रक्रियेच्या ओघात कथक सांगत जातो.उदा.सर्गेईच्याबद्दल कथन करताना रशियातील स्टॅलिनचा संदर्भ येतो,इंडोनेशियातील सुकार्तो या अध्यक्षाला पदच्युत करून सुहार्तोला त्या स्थानावर बसवणे हा संदर्भ येतो,आयसेनहॉवरची विधाने येतात.प्रभू प्रभाकरबद्दल कथन करताना नेपोलियन आणि त्याची प्रेयसी जोसेफाईन यांच्यात झालेल्या फारकतीचा संदर्भ येतो तसेच अमेरिकनांनी बेल्जियमच्या लुमुम्बा या अध्यक्षाला मारले हा संदर्भ किंवा त्यांनी आफ्रिकेतील रबर व हिरे मिळवण्यासाठी केलेल्या स्थानिकांच्या पिळवणूकीचा संदर्भ येतो, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा व मार्टिन ल्युथरने केलेली पदयात्रा हे संदर्भ येतात.फ्रँको आणि प्रल्हादच्या रेस्टॉरंटचे वर्णन करताना ‘ट्री ऑफ लाईफ’ या शहाजहानच्या काळातील चित्राचा संदर्भ तसेच प्रल्हादच्या मणीपुरी नृत्याच्या वेळी येणारे संदर्भ,सर्गेईच्या बायकोने तयार केलेल्या नाझींनी केलेल्या विध्वंवसाची कहाणी सांगणाऱ्या पुस्तकावरच्या मुखपृष्ठाचा संदर्भ,प्रभाकरने विद्यार्थ्यांना शिकवताना दिलेले हिटलरचे संदर्भ आणि त्याच्या कादंबरीत आलेले अशाच हुकुमशाही प्रवृत्तीच्या पद्धतशीरपणे लोकांची मानसिकता बदलण्याच्या प्रक्रियेचे संदर्भ कथनात येतात.त्यामुळे ‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ ही कादंबरी जागतिक इतिहास,कला,चित्रपट अशा अनेकानेक गोष्टींना स्पर्श करणारी होते.
असे असले तरी कथनाचे लक्ष्य वाचकांना संपूर्ण जगातील दोन विरोधी प्रवृती दाखवून देण्याचा आहे हेही वाचकांना उलगडत जाते. एक प्रवृत्ती अर्थातच साम्राज्यवादी, भांडवलवादी,संवेदनशून्य शोषकांची हिंसक प्रवृत्ती आहे.तर दुसरीकडे स्वाभाविकपणे मानवतावादी, संवेदनशील,कलावादी, अहिंसक प्रवृती आहे.’दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीला मानवतावादी, अहिंसक प्रवृत्तीच जगाला, संपूर्ण मानवजातीला वाचवू शकेल असे वाचकांपर्यंत पोहचवायचे आहे.त्यासाठीच कादंबरीत एका बाजूला दिमित्री,सर्गेई, मिरजकर यासारख्या युद्ध,हिंसा यांचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तिरेखा येतात तर दुसऱ्या बाजूला प्रभू प्रभाकर, कतरीना, लिसेट आणि रेहमानसारख्या शांतता,अहिंसा यांचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तिरेखा येतात.या दोन्ही प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखांच्या निमित्ताने ‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीचे कथन कसे पुढे सरकते ते आपण पाहू.
दिमित्री आणि सर्गेई या पिता-पुत्राच्या व्यक्तिरेखांच्या संवादांच्या माध्यमातून कथक वाचकांना व्यापार आणि सत्तासंघर्ष याचा संबंध दाखवू इच्छितो.व्यापार आणि सत्ता यांचा हा संबंध सर्गेईला त्याच्या वडिलांनी तो तरूण असतानाच समजावून सांगितला आहे.
सर्गेईला त्याच्या वडिलांनी म्हणजे दिमित्रीने केलेले विधान आठवते. “राजकारणातील संधीचा आम्ही फक्त फायदा उठवतो” असे हे विधान आहे. “नेहमीच काहीजण गोळ्या घालणारे असतात आणि काही गोळ्या खाणारे ! त्याच्याशी आपल्याला देणंघेणं नाही.” असंही दिमित्रीने आपल्या मुलाला सर्गेईला सांगितलेले दिसते.व्यापारी राजकारणातील उलथापालथीचा व्यापारासाठी कसा फायदा करून घेत असतात हे त्याला सर्गैईला सांगायचे आहे.
कथक सांगतो की दिमित्रीने शस्त्रास्त्राचा व्यापार करणारी कंपनी सुरू केली आणि सर्गेईने तीच पुढे सुरू ठेवली आहे. सर्गेईचा मुलगा इव्हानदेखील याच कंपनीचे काम अमेरिकेत राहून करत आहे. साम्राज्यवाढीच्या हव्यासामुळे युरोपियनांनी आणि नंतर अमेरिकनांनी आफ्रिकेतील लोकांना कसे गुलाम केले,त्यांच्या भूमीतील हिरे शोधून काढण्यासाठी त्यांना कसे अहोरात्र राबवले,मारले हे सर्गेईला माहित आहे.ऊस काढण्यासाठी, रबर मिळवण्यासाठी आफ्रिकन गुलाम अमेरिकेने कसे वापरले तेही त्याला माहीत आहे.त्याला ही विसंगतीही माहित आहे की ज्याच्या नावे शांततेचा पुरस्कार दिला जातो त्या अल्फ्रेड नोबेल याने विस्फोटकांचा शोध लावला होता ! सर्गेईला बिकिनी या बेटावर अमेरिकेने केलेला हायड्रोजन बॉंबचा स्फोट माहीत आहे आणि अमेरिकेनेच बेल्जियमच्या राजकारणात ढवळाढवळ करून त्यांच्या स्वार्थाच्या आड येऊ शकणाऱ्या लुमुम्बा या अध्यक्षाला कसे मारून टाकले हेही सेर्गेईला आठवते आहे.पण तरीही त्याने शस्त्रास्त्रांचा व्यापार सुरूच ठेवला आहे.
‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीतील दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे प्रभू प्रभाकर. त्याच्या भूतकाळाबद्दल वाचकांना कथनातून कळते.त्याचबरोबर त्याच्या मनातील अनेक गोष्टींबद्दलची मतेही कथनातून सामोरी येतात. ती आपण पाहू.
प्रभू प्रभाकर एका असंघटीत अशा स्थलांतर करणाऱ्या बांधकाम मजुराचा मुलगा आहे. दुर्दैवाने कामावरील अपघातात त्याने आई-वडील दोघांनाही गमावले आहे. आपल्या वडिलांचे आणि त्यांच्यासारख्या अनेक बांधकाम मजुरांचे कौशल्य प्रभू प्रभाकरने पाहिले आहे.प्रतिकूल परिस्थितीत ,कोणतेही शिक्षण नसतानाही ही माणसे केवळ अनुभवाच्या आधारे, स्वतःचा जीव धोक्यात घालून जी कामे करतात त्याबद्दल प्रभूला नेहमीच आदर वाटला आहे. दिल्लीत त्याने एका गर्दीच्या वस्तीतील कैफ हे उपहारगृह आणि त्यातील रफिकच्या हातचा मोगलाई खाना खाल्ला तेव्हाही प्रभाकरला प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या रफिकच्या पाककौशल्याची कमाल वाटली होती. या अशा कुशल कामगारांच्या कौशल्याची भारतात कदर होत नाही अशी खंत कथनातून व्यक्त होते.
“ प्रभाकर विचार करत होता.हे कौशल्य आपलं आपण शिकावं लागतं. कुणी शिकवून ,ट्रेनिंग घेऊन येत नाही.कामावर असतानाच ते हे अवघड काम शिकत जातात. तुमच्या पाठीवर किती विटा ठेवायच्या मोजमाप नाही, किंवा न फोडता किती विटा तुमची पाठ वाहून नेऊ शकते याचा काही विचार नाही. ….त्यांच्या नशिबाने मजूर मेले काय आणि जगले काय अशा परिस्थितीत काम करणे कसं असेल ?कुठले अंतर्गत मनोधैर्य त्यांना हे करण्याची हिंमत देत असेल?…”
प्रभाकर हा राज्यशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्याच्या संशोधनात त्याने बदलत जाणाऱ्या कपड्यांच्या फॅशन्सचाही शोध घेतला आहे.त्याच्या निरीक्षणाचा वापर कथनात अधून मधून लेखिकेने केलेला दिसतो. कथन म्हणते –
“प्रभाकरने वाचले की फ्रेंच राज्यक्रांतीनंतर स्त्रियांच्या कपड्यात आमूलाग्र बदल झाले.कमरेभोवती आवळून बांधलेला पट्टा आणि एकावर एक आवरण असलेले फुगीर पेटीकोट या बंदिस्त कपड्यांतून त्यांची सुटका झाली.फॅशन बदल घडवून आणते. पण अंतर्बाह्य नाट्यमय बदल कशानं घडवून आणला असेल ?या काळाचा अभ्यास रताना तो अशा निर्णयापर्यंत आला की फॅशनमधील क्रांतीचा राज्यक्रांती स्वातंत्र्य,समता किंवा लोकशाही यांच्याशी काहीही संबंध नाही. अमेरिकेतील सुती कापड आणि खरं तर भारतात बनवलं गेलेले इंग्लिश कापड यांनी फ्रान्सचा बाजार भरलेला होता….”
प्रभाकर पुढे विचार करतो-
“ आणि म्हणूनच पुढचा प्रश्न ,फ्रान्सची बाजारपेठ परदेशी सुती मालानं नुसती ओतप्रोत भरलेली आहे, आणि फ्रेंच बायका इतक्या मोहक झग्यांनी सजलेल्या आहेत, हे सगळं अमेरिकेतील गुलामांच्या आणि इंग्लंडने निर्लज्जपणे नागवून घेतलेल्या भारताच्या जीवावरच ना ?”
प्रभाकरने त्याच्या दैनंदिन शिकवण्याच्या कामातून येणारा कंटाळा घालवण्यासाठी एक काल्पनिक कादंबरी लिहिली होती आणि ती राज्यकर्त्यांच्या धोरणकर्त्यांना आवडली होती. कारण त्यात प्रभाकरने माणसांच्या मनांवर कसा पद्धतशीरपणे ताबा मिळविता येतो हे काल्पनिक गोष्टीतून दाखवले होते. त्यामुळे प्रभाकर त्यांना त्यांच्या कामासाठी योग्य माणूस वाटत होता. खरं तर, प्रभाकरला लोकांना असे मानसिक गुलाम बनवणे अजिबात मान्य नव्हते. पण सत्ताधाऱ्यांना प्रभाकरचे लेखन नेमका तोच अर्थ व्यक्त करणारे वाटत होते. आपल्या कादंबरीतून आपल्याला काय सांगायचे आहे हे सांगताना प्रभाकर जे स्पष्टीकरण देतो ते कथनात येते. कथक म्हणतो-
“तो म्हणाला,त्याचे पुस्तक म्हणजे कल्पनेची भरारी आहे.तो ज्याचे समर्थन करतो तो बदल नाही. त्याच्या बुद्धीतून सुचलेला हा त्याचा स्वतःचा शोध आहे….समाजाच्या विचारसरणीच्या अगदी विरोधात विचार केला तर त्याचा काय परिणाम होईल, असा विचार करताना हे त्याला सुचलं.अर्थातच त्याच्या स्वतःच्या समाजाचा विचार करताना !आणि मग असं लक्षात आलं की ज्या कल्पनांचा आणि प्रतिमांचा आदर आणि सन्मान करायला समाजाला शिकवलं आहे, त्याच्या अगदी विरोधातल्या कल्पनांची कारणे शोधावी लागतील. उदाहरणार्थ ,ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाची मूर्ती,शांतीआणि सदाचाराची शिकवण देणाऱ्या अशोकाचा उपदेश ,जी लोकांच्या मनातून अहिंसेपासून वेगळी काढता येणार नाही अशी आपल्या काळातील परिचित अशी गांधींची प्रतिमा हे सर्व संपवता येईल,पुसून टाकता येईल…त्याग, पश्चात्ताप,दया वगैरे ज्या सद्गुणांचे हे प्रतीक आहेत,ती सर्व मूल्ये विसरली जातील.आपल्या शब्दसंग्रहातून हे सर्व शब्द गायब होतील,आणि उरलेल्या त्यांच्यासारख्या शब्दांच्या चिंध्यांचा नामर्द आणि भ्रष्ट म्हणून तिरस्कार केला जाईल…”
आणि मॉल रोडवरचा महात्मा गांधींचा पुतळा तोडला जात असताना प्रभाकरने पाहिला होता. तो दांडी यात्रेत चालणाऱ्या गांधींजींचा पुतळा होता. त्यावेळी त्याला आपल्या विद्यार्थ्यांना त्याने दांडी यात्रेबद्दल काय सांगितले ते आठवले होते. कथनातून प्रभाकरचे हे विचार लेखिका वाचकांसमोर आणते. कथक म्हणतो –
“प्रभाकरने आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले होते की दांडी मार्च हा राजकारणातला एकमेवाद्वितीय प्रसंग आहे. मिठाचा कायदा मोडण्यासाठी त्यांच्यात सामील व्हायला गांधींनी कोणाला हाक घातली नव्हती.पण मागोमाग येणाऱ्या एका छोट्या गटापासून वाटेवर ठिकठिकाणी हजारो माणसे त्यांना समील झाली.सबंध देशभर जिथे शक्य होतं तिथे मीठ बनवू लागली…..१९३० नंतर पस्तीस वर्षांनी मार्टिन ल्युथर किंग आणि त्याचे सहाशे अनुयायी सेल्मापासून अलाबामातील मॉंटेगोमेरीपर्यंत वंशभेदापुढे झुकायला नकार देण्यासाठी चोपन्न मैल चालत गेले.एक महिन्यानंतर दोन हजार काळे आणि गोरे लोक दिवसभर चालत आणि रात्री शेतात झोपत पुन्हा चालत मॉंटोगोमेरीला गेले.प्रभाकरने वर्गातल्या मुलांना सांगितलं होतं की रक्तापेक्षा बळकट असे बंध असतात.रक्ताच्या पलीकडे, सीमांच्या पलीकडे, धर्माच्या , वंशाच्या पलीकडे असे बंध असतात”
प्रभाकरला मानवतेचे बंध सुचवायचे आहेत. तेच संपूर्ण मानवजातील अन्यायाविरूद्ध एकत्र येऊन लढायचे बळ देतात असे त्याला म्हणायचे आहे. पण प्रत्यक्षात त्याला दिसते आहे की अशा मानवतावादी, अहिंसक चळवळींचे नेतृत्व करणाऱ्या महात्मा गांधीचा पुतळाच तोडून टाकला जातो आहे.म्हणूनच त्याला वाटते की माणसांच्या मनात खोलवर रूजलेल्या प्रतिमा बदलता येऊ शकतात.तेच सभोवती घडते आहे, घडवले जाते आहे असे त्याला वाटते.
‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीच्या सुरूवातीलाच प्रभाकर एका मित्राच्या घराच्या शोधात असतो.ते घर त्याला मिळते पण मित्र तिथे रहात नसतो. त्या घरात काही तरूण पालकांनी लहान मुलांसाठी सुरू केलेली शाळा प्रभाकरला दिसते. तिथे एक निरागस मुलगा आपल्या मुठीत फुलपाखरू पकडून शिक्षिकेला दाखवतो तेव्हा ती त्याला ते सोडून द्यायला सांगते. प्रभाकरशी बोलताना ती अन्य शाळेत शिक्षक मुलांना फुलपाखरांना पकडून ,त्यांना टाचणी टोचून बोर्डावर टोचून ठेवायला शिकवतात याबद्दल खंत व्यक्त करते. हा सगळा प्रसंग सूचक आहे. कथक शिक्षिकेचे शिक्षणाबद्दलचे विचार व्यक्त करताना म्हणतो-
“अगदी सुरूवातीपासून मुलांच्या शिक्षणाशी पालक जोडले गेले पाहिजेत असं आम्हाला वाटतं. ती अगदी मनापासून सांगत होती.म्हणून या लहान वयात आम्ही मुलांना शिकवायला शिक्षक ठेवले नाहीत. मुलांनी काय करावं, काय पाठ करावं, हे त्यांना सांगण्यावर आमचा विश्वास नाही. त्यांनी स्वतःच डोकं चालवावं आणि प्रयोग करावेत असं आम्हाला वाटतं. तुम्हाला नाही वाटत की कला आणि हस्तकला या दोन्ही गोष्टींनी सुरूवात करणं चांगलं आहे? पुढे ती काळजी करत म्हणाली ,जिवंत गोष्टींचा त्यांनी मान ठेवावा आणि सभोवतालाबद्दल संवेदनशील असावं असं आम्हाला वाटतं. ते मोठेपणी काळजी घेणारे, दयाळू आणि … पुढे तिला योग्य शब्द सुचेना.शेवटी ती म्हणाली ,चांगली, सज्जन, दयाशील माणसं व्हावीत.”
प्रभाकरला या बालवाडी शाळेतून घरी येतानाच हमरस्त्यावर एक डोक्यावर गोल घट्ट टोपी घातलेला नागवा मृत देह आणि त्याच्या बाजूला धमकीचा संदेश लिहून ठेवलेली कुऱ्हाड दिसली होती. ती निघृण हत्या आणि त्यामागची संवेदनशून्य उद्दाम वृत्ती प्रभाकरला हादरवून गेली होती.
‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ ही कादंबरी भविष्यसूचन करणारी आहे. त्यादृष्टीने कथनात काही प्रसंग येतात.’कैफ’ या उपहारगृहातील प्रभाकरचा आवडता मुघलाई खाना बनवणारा रफिक जेव्हा गायब होतो आणि कैफ मध्ये मटणाचे पदार्थ मिळणार नाहीत असे त्याला सांगितले जाते तेव्हा प्रभाकरला एक स्वप्न पडते.त्याला दिसते की झुंड त्याच्या घरात शिरली आहे आणि त्याच्या फ्रिजमध्ये गायीचे मांस आहे असे म्हणत त्याच्यावर तुटून पडली आहे.प्रभाकरची ही भयशंकीत अवस्था भविष्याचे सूचन करणारी आहे. तसेच महात्मा गांधींच्या सहवासात राहून त्यांच्या दैनंदिन जगण्याबद्दल लिहू इच्छिणाऱ्या शीअनने जेव्हा गांधीजींची हत्या प्रत्यक्ष पाहिली तेव्हा अचानक त्याच्या हाताच्या बोटांवर दोन जळजळणारे फोड टरारून उठले होते. त्याने पाहिलेल्या हिंसेचा त्याच्यावर झालेला तो मनोकायिक परिणाम होता असे कथक म्हणतो. म्हणजे हिंसा प्रत्यक्ष आपल्या वाट्याला आली नाही तरी या हिसेंच्या सावटात राहणे देखील संवेदनशील माणसाला मानसिकदृष्ट्या किती त्रासदायक होणार आहे हे कथकाला सुचवायचे आहे.
‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीच्या अखेरच्या भागात प्रभाकरला अमेरिकेतील हिंदू लोकांच्या एका संघटनेच्या सभेला आमंत्रण येते.तिथे संघटनेची प्रमुख असलेली स्त्री सांगत असते की लौकरच भारतीय हिंदूना युरोपियनांप्रमाणेच गौर ठरवून थेट व्हिसा व नागरिकत्व मिळवण्याची मागणी त्यांनी अमेरिकन सिनेटमध्ये लावून धरली आहे.ती हे बोलत असताना प्रभाकर सभागृहाच्या मागील बाजूस सोनेरी रंगात चमकणारा भारताचा नकाशा पाहतो आणि त्याला धक्काच बसतो कारण त्या नकाशात पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान हेदेखील भारताचाच भाग दाखवलेले असतात.भविष्यात आक्रमकपणे अन्य देश संपवून नकाशा बदलण्याचा संघटनेचे ध्येय आहे हे यातून सूचीत होते.
‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’च्या कादंबरीच्या अखेरीस सर्गेई आपल्या आयुष्याचे पुनरावलोकन करताना दिसतो. आपल्या जीवनातील अनुभवांवर पुस्तक लिहायचे त्याने ठरवले आहे. या पुस्तकाचे नाव आणि त्यातील भूमिका याबद्दल सेर्गेईच्या मनात चाललेल्या आंदोलनाबद्दल कथक लिहितो-
“‘वेषांतरित सैतान’ हा ऱ्होडसनंतरच्या साम्राज्यानंतरच्या जगाचा यथायोग्य सारांश वाटतो.हे जग अजूननही शस्त्रांत्रांच्या शक्तीखाली दबलेले आहे, म्हणून पुस्तकाला हे नाव योग्य होईल.या दिवसांत आणि काळात ही एक उत्सुकता वाठवणारी परिस्थिती होती, पण ती खरी असेल तर सर्गेईने असे अनुमान काढायचे का की केवळ आपले काम करण्याने , जसे तो करत आला किंवा न्युरेनबर्गच्या आरोपींनी नाझींच्या आज्ञा पाळल्या तशा आपण आज्ञा पाळल्याने आपणही या गुन्ह्यात सामील होतो , हे सोडून द्यायचे का ?या तरकाप्रमाणे जे अनोळखी लाखो लोक मारले गेले त्यात तो सहभागी होता का ?….”
सर्गेई आपल्या पुस्तकाचा विचार करत असताना त्याची मुलगी इरीना जी युद्धविरोधी चळवळीत सक्रीय आहे तिने त्याच्या टेबलावर ठेवलेले अमेरिकन युद्धाचा सेनापती आयसेनहॉवर याचे भाषण त्याला मिळते.कथनात या भाषणाचे संदर्भ येतात.
“ यावेळी शीतयुद्धाच्या व सर्व युद्धांविरोधात केलेले ते एक भाषण होते.आश्चर्यचकित होत त्याने ते वाचले.त्याने अपेक्षा केली होती त्याप्रमाणे ते एखाद्या शांततावादी किंवा अराजकवादी वक्त्याचे नेहमीच्या पठडीतले भावनिक भाषण नव्हते किंवा एकाद्या आदर्शवाद्याचे उत्तेजित करणारे नेहमीसारखे अस्सखलित भाषण नव्हते.जोअमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला अशा एका पंचतारांकित सेनापतीचे ते शब्द होते.हे त्याने व्हाईट हाऊसमध्ये दिलेले औपचारीक भाषण होते.राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी दिलेला गंभीर इषारा त्याने वाचला.’सैन्य आणि उद्योग’यांच्या एकत्रीकरणाला त्यांनी लोकशाहीला असलेला भयंकर धोका म्हटले होते.त्यांचे शब्द न्याय्य आणि मानवी समाजाला सुचवत होते “ तयार झालेली प्रत्येक बंदूक, हल्ल्यासाठी सज्ज अशी प्रत्येक युद्धनौका,प्रज्वलित प्रत्येक रॉकेट यांचा अंतिमतः अर्थ जे भुकेले आणि अन्नाविना आहेत, ज्यांना कपडे नाहीत म्हणून जे थंडीने काकडताहेत ,त्यांच्याकडून केलेली चोरी असा होतो.हे शस्त्रास्त्रांचे जग फक्त पैसाच खर्च करत नाही तर ते श्रमिकांचा घाम, शास्त्रज्ञांची बुद्धी, मुलांच्या अपेक्षा धमकावणाऱ्या युद्धांच्या सावलीखाली खर्च करत आहे.लोखंडाच्या क्रूसावर ही मानवता टांगलेली आहे.”
सर्गेई आयसेनहॉवरचे हे शब्द वाचून अस्वस्थ झाला होता, त्याच्या मनात आपल्या पुस्तकाबद्दल चाललेले विचार कथनात पुढे येतात. कथक म्हणतो-
“….त्याच्या स्वतःच्या काळातील झालेल्या युद्धांना मदत करण्यासाठी शांतता काळात अंतिमतः झालेला शांतता करार त्याला आठवले.हे काय होते ,खूप काळानंतर अविचाराची मोजावी लागलेली किंमत ? केलेल्या गुन्ह्याबद्दल वाटणारी अपराधी भावना कमी करण्यासाठी दिलेला कबुलीजबाब? कबुलीजबाबासारखा मुक्तीसाठी मांडलेला लिलाव ? सर्गेईच्या मनाचा कल काही सनसनाटी नव्हता. त्याने लिखाण करताना कथेचा कसा विकास होईल याची कल्पना नव्हती.आयसेनहॉवरने दिलेल्या दुर्लक्षित धोक्याच्या प्रकाशात फक्त तो धोका पुनरूज्जीवित करण्यासाठी गरज होती.”

अशाप्रकारे ‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ या कादंबरीचे कथन कधी खूप तपशीलवार वर्णनांतून वाचकांच्या मनावर हिंसा, विध्वंसक वृत्ती,संवेदनशून्यता याचे परिणाम ठसवते तर कधी सूचकतेने पुढील भविष्याचे कल्पनाचित्र रेखाटते.व्यापारी आणि सत्तांधांचे संगनमत, जिंकलेल्यांना गुलाम बनवणारे, त्यांची पिळवणूक करणारे ठरते हा इतिहास कथनातून वाचकांपुढे ठेवला गेला आहे. असंघटीत कामगारांचे प्रश्न आणि त्यांच्या कौशल्याला किंमत नसणे याबद्दलही कथक भाष्य करतो आहे. कथनाच्या केंद्रस्थानी हिंसक, आक्रमक, माणसांना गुलाम करणारी, त्यांची पिळवणूक करणारी साम्राज्यवादी, हुकूमशाही,संस्कृतीरक्षकांची प्रवृत्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्य,समता,बंधुता,अहिंसा या मानवतावादी मुल्यांचा पुरस्कार करणारी संपूर्ण जगातील निरागसता जपू पाहणारी, शांततेसाठी प्रयत्न करणारी प्रवृत्ती आहे.’दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ ही कादंबरी हिंसक,हुकूमशाही प्रवृत्तीचा पद्धतशीरपणे केला जाणारा प्रचार प्रसार यामुळे जगाची काय स्थिती होईल याचे एक भयकारी कल्पनाचित्र वाचकांसमोर ठेवते आहे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करते आहे असे म्हणता येईल.
वाचकांनी ‘दी फेट ऑफ बटरफ्लाईज’ ही कादंबरी मूळातून किंवा भाषांतरीत स्वरूपात जरूर वाचावी आणि सभोवतीच्या परिस्थितीचा विचार करावा ही अपेक्षा आहे !सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा …ही दीपावली लहान मुलांची निरागसता जपणारी,त्यांना भविष्यात शांत,सुरक्षित,सुंदर जग मिळेल अशी आश्वस्तता देणारी ठरो !
-गीता मांजरेकर
_________________________________________________________________________________________________________________

यावर आपले मत नोंदवा