मागील ब्लॉगमध्ये आपण कमला मार्कंडेय यांच्या ‘दी बॉम्बे टायगर’ या कादंबरीमधील कथासूत्रे आणि कथानक याचा परिचय करून घेतला.आजच्या ब्लॉगमध्ये या कादंबरीच्या कथनातील काही भागाचे विश्लेषण करत कादंबरीतील मर्मदृष्टी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया.सत्ता संपत्तीने मिळणारी असो की अन्य सामाजिक,राजकीय अधिकाराने मिळणारी असो..एखादी व्यक्ती सत्ता कशी प्राप्त करते आणि तिचा उपयोग कोणत्या हेतूसाठी करते याचा तात्विक विचार कमला मार्कंडेय त्यांच्या ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीत करताना दिसतात. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे तत्व जर सत्ताधारी अंगिकारत असतील तरच ते अखिल मानवजातीच्या भल्याचे ठरेल असे कमला मार्कंडेय यांना सुचवायचे आहे.

ब्लॉग श्राव्य स्वरूपात खाली दिलेल्या ऑडियो फाईलवर उपलब्ध आहे.

 कथनाची रचना आणि विश्लेषण

‘बॉम्बे टायगर’ ही कादंबरी ३२७ पृष्ठांची आहे. या कादंबरीचे कथानक ३८ प्रकरणांत लेखिकेने विभागले आहे.यातील सर्वाधिक प्रकरणे कादंबरीतील नायक गांगुली ज्याला ‘बॉम्बे टायगर’ अशी उपाधी मिळाली आहे त्याच्या आयुष्यातील घटना सांगणारी आहेत. गांगुली खालोखाल नरहरी राव आणि कुटुंबीयांच्या आयुष्यातील घटना कादंबरीच्या कथानकात येतात.डॉ.राजीव पांडे ही व्यक्तिरेखा कादंबरीत तुलनेने कमी अवकाश व्यापणारी असली तरी तीदेखील कथानकाच्या ओघात कादंबरीचा नायक म्हणावी एवढी महत्त्वाची ठरलेली दिसते.

लेखिकेने हेतूतः ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीच्या कथानकात परस्परविरोधी दृष्टिकोनाच्या, प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत. त्यामुळे कादंबरीत प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्षपणे एक प्रकारचा अंतर्विरोध जाणवत राहतो.उदा. गांगुली ही अत्यंत महत्वाकांक्षी, स्वार्थात आंधळी झालेली व्यक्तिरेखा आहे तर डॉ.राजीव पांडे ही निरपेक्षपणे काम करणारी,विवेकी व्यक्तिरेखा आहे.गांगुली या व्यक्तिरेखेत एक रोखठोकपणा आहे. लपवाछपवी, ढोंगीपणा नाही. तर नरहरी राव ही मात्र ढोंगी, मत्सरी  आणि वेगळ्याच अंतःस्थ हेतूंनी निर्णय घेणारी व्यक्तिरेखा आहे.

स्त्री व्यक्तिरेखांमध्ये गांगुलीची मुलगी लेखा ही स्वप्नाळू , भावनेत वाहून जाणारी आणि दुबळी व्यक्तिरेखा आहे. तर, चिंगारी ही लमाण तांड्यातील मनमुक्त नाचणारी,व्यवहारी आणि गांगुलीच्या आयुष्यात स्वेच्छेने येऊनही त्याच्या संपत्तीच्या लोभात वहावत न गेलेली कणखर व्यक्तिरेखा आहे.चिंगारीची वस्ती गांगुली त्याच्या कार्यालयासाठी जागा हस्तगत करताना बुलडोझरने तोडून टाकतो त्यावेळी चिंगारी त्याला शिव्या घालते.पण अखेरीस तीच गांगुलीच्या पडत्या काळात त्याचे एकाकीपण समजून घेऊन आपला मुलगा त्याला देऊन टाकते. तर लेखा मात्र सॅबेस्टियनच्या चित्रपटात काम मिळाल्याने भावनिकदृष्ट्या त्याच्या कह्यात जाते आणि शेवटी त्याला मुलाची जबाबदारी नको असल्याने आपल्या पोटात वाढणारा त्याचा गर्भ नष्ट करते.

कादंबरीतील या व्यक्तिरेखांपैकी गांगुली आणि डॉ.पांडे या व्यक्तिरेखांमधील संघर्ष तात्विक पातळीवरचा ,उघड संघर्ष आहे.नरहरी राव आणि गांगुलीमधील संघर्ष छुपा आहे आणि तो मूलतः नरहरी रावच्या मनात चालू असलेला दिसतो.गांगुलीला नरहरी रावचा मत्सरी स्वभाव माहीत आहे पण त्याला विरोध करण्याएवढाही  तो त्याला खिजगणतीत धरत नाही. लेखा आणि चिंगारी कधीच परस्परांसमोर आलेल्या  नाहीत. त्यांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती अगदी भिन्न आहे.ही भिन्नताच प्रामुख्याने त्यांच्या प्रवृत्तींत विरोधाभास निर्माण करते.

‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीत सामावलेला कालखंड १९८० च्या दशकातील आणि सुमारे आठ-दहा वर्षांचा असावा.कादंबरी क्वचितच भूतकाळात जाते आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले दशक रंगवते पण मूलतः कादंबरीला मुक्त अर्थव्यवस्था येण्यापूर्वीचा भारतातील कालखंड रंगवायचा आहे.पुढे येऊ घातलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेची चाहुल लागल्याने भारतातील उद्योजक नव्या स्पर्धेला सामोरे जायला सज्ज होण्याच्या प्रयत्नांत आहेत असे या कादंबरीतील वर्णनातून लक्षात येते.तसेच भारतातील उच्चशिक्षित युवकांना परदेशातील डॉलर्समध्ये पगार देणाऱ्या नोकऱ्या आणि पाश्चात्य राहणीमानाचे आकर्षण वाटू लागण्याचा हा काळ आहे. आपल्या देशात काही संधीच नाही म्हणून आपण स्थलांतर करतो आहोत असे हे भारतात उच्चशिक्षीत झालेले तरूण म्हणू लागले आहेत.या सगळ्या झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीमुळे भारतीय समाजातील विशेषतः उच्चमध्यमवर्गीय कुटुंबे, त्यातील नातेसंबंध, माणसांची जीवनमूल्ये हे सगळे बदलत जाण्याचा हा काळ आहे.

‘दी बॉम्बे टायगर’ या कादंबरीत ही सगळी बदलत्या भारताची पार्श्वभूमी प्रामुख्याने कथानकातील व्यक्तिरेखांच्या संवादांतून, त्यांच्या मनात चाललेल्या विचारांच्या, भावनांच्या आंदोलनांतून अप्रत्यक्षपणे जाणवते. आपण कादंबरीतील काही व्यक्तिरेखांचे संवाद लक्षात घेऊ आणि त्यातून कादंबरीची मध्यवर्ती मर्मदृष्टी समजून घेऊ.

कादंबरीतील एक व्यक्तिरेखा कोठारी. हे मुंबईतले सर्वात प्रख्यात विधिज्ञ आहेत. त्यांचे दोन मुलगे अमेरिकेत स्थलांतरीत झाले आहेत आणि आता मुलगी मंजुला हिलाही अमेरिकेतील अवकाशसंशोधन मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळण्याची शक्यता असल्याने तीही अमेरिकेला चालली आहे. तिचे परदेशात जाणे कोठारींना अधिक दुखावणारे वाटते आहे.याबद्दल कथक म्हणतो—

“तिचे(मंजुलाचे) जाणे इतरांच्या वियोगापेक्षा त्यांना अधिक प्रभावीत करून गेले होते.तिने पश्चिमेला प्रयाण करण्यापूर्वी त्यांच्या दोन मुलांनी तेच केले होते. शेतकऱ्यांच्या मुलांनी शहरांत यावे तसेच हे होते.त्यांचा मोठा अमेरिकेत तर धाकटा मुलगा जर्मनीत गेला होता.आता मुले ब्रिटनमध्ये जात नव्हती आणि रशियातही जात नव्हती.”

पुढे कथक म्हणतो-

दोघे मुलगे देश सोडून गेले होते आणि बहुतेक तिथेच स्थाईक होणार होते.पश्चिमेकडील देशांतील उठावदार सौंदर्य,तिथे सहजी उपलब्ध माहिती, तिथली सहज वाटणारी जीवनपद्धती,सोपी नैतिक मूल्ये, मुक्तपणे उपलब्ध होणारा पैशाचा ओघ, नितिमत्तेची आजवर कधीच न चाखलेली प्रसन्न लवचिकता,सोपी लोकशाही आणि तिथे मिळणारे मोकळे विचार तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य. कोठारीला माहित होते की मुले परदेशात गेली याबद्दल त्यांची बायको त्यांना रोजच दोष देत असते.पण त्यांना याचीही जाणीव होती की आपल्या उच्चशिक्षित मुलांना आपल्यासोबतच ठेवणे आज तरी आपल्याला शक्य झाले नसते.आणि त्यांची मुले त्याबाबतीत खूपच स्पष्ट दूरदृष्टी असलेली आणि खूपच संवेदनशून्य ठरली होती.

इथे कथक कोठारीच्या मुलांचे म्हणणे ऐकवतो-

“कोणती संधी पप्पा,इथे कधी ?पैसा कुठे आहे ? आणि ते ज्ञान तरी कुठे आहे ?..आमचं तर आयुष्यच थांबेल..असा उपहास,अशी कीव.त्यांना प्रभावीत करू न शकणारा विकास.( खरं तर )हरीत क्रांती, तंत्रज्ञान शिकवणाऱ्या शैक्षणिक संस्था , उपग्रहामुळे निर्माण झालेल्या सेवाव्यवस्था—त्यांचा देश विकसनशील देशांतील अवकाशसंशोधन मोहीमा राबवणारा एकमेव देश होता. पण त्यांच्या मागण्या अधिक होत्या. जो देश वसाहतवादी सत्तेच्या जोखडातून मुक्त होऊन केवळ चार दशके झाली होती त्या देशाकडून त्यांना चंद्र हवा होता…त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी देश सोडून श्रीमंत पश्चिमी देशांत जाण्यापासून त्यांना रोखता येणार नव्हते.”

पण कोठारीची मुले परदेशात गेली असताना डॉ.राजीव पांडे मात्र परदेशातील उच्चशिक्षण घेऊन परत भारतात आला होता.(हा विरोधाभास लेखिकेने हेतूतः आणला आहे) फादर बेंजामिनच्या शिकवणुकीचा त्याच्यावर प्रभाव होता. आपल्या देशातच आपल्या वैद्यकशास्त्रातील ज्ञानाचा सर्वाधिक उपयोग होऊ शकतो असे त्याला वाटत होते.साधी राहणी आणि सेवाभावी वृत्ती हे राजीवचे स्वभाववैशिष्ट्य गांगुलीसारख्या उच्चभ्रू , श्रीमंत माणसाला चकीत करणारे होते.त्याला राजीव पांडेची जगण्याची रीत हा त्याचा एक अहंकार आहे असे वाटत होते. एके संध्याकाळी काही कामानिमित्त त्याला भेटायला आलेल्या डॉ.राजीव पांडेला आपल्या शाही स्नानगृहातून बाहेर पडत गांगुली म्हणाला—

“ह्याने ( शाही स्नानाने) फार छान वाटतं. तू एकदा नक्की प्रयत्न करून पहा. ..पण तुला स्वतःची कौतुकं करणं पटत नाही खरं ना ..मी जेव्हा आज संध्याकाळी तुझ्या घरी गेलो होतो तेव्हा मी पाहिले की तिथे फक्त दोन खुर्च्या, एक खाट आणि एक टेबल एवढेच सामान होते…हे कसलं रे तुझं जगणं”

“मला ते मानवतं”

“मानवतं !  तुझी समस्या काय आहे माहीत आहे का तुला राजीव ..तू असे राहण्यात एक आनंद किंवा कदाचित वृथा अभिमान शोधतोस ..असं साधं राहणं”

“पण त्यात काही गैर नाही. पांडेने सुचवलं.. आपली कितीतरी  माणसे तशीच राहतात.”

“तू एक मूर्ख आहेस राज.इतर अनेकांसारखा.त्यांना श्रीमंतीत  काहीतरी दोष दिसतो.श्रीमंतीत त्यांना अपराधीपणा वाटतो. कशाला .. प्लॅटचं(परदेशी गुंतवणूकदार) पहा ना तो श्रीमंत आहे, अक्षरशः लोळतोय श्रीमंतीत..त्याला अपराधी वाटतंय का ?..तू का नाही प्लॅटसारखा होत ..आता तो समजुतदार माणूस आहे…गांगुलीने त्याच्याकडच्या टॉवेलवरील ब्रॅंडचे लेबल पांडेला दाखवत म्हटले..तू वाचू शकतो आहेस ..’अहमदाबाद मिल्स’- इथूनच प्लॅटने आणि त्याच्या माणसांनी कापडात त्यांचे भविष्य घडवले.म्हणून तो नाक वर करून फिरतोय.हे त्यांचे  खुंटे ठोकायचे जुने मैदान आहे.त्यामुळे ते सगळे मधाच्या शोधात येणाऱ्या मधमाशांसारखे थव्याने येणार.मॅथेसन्स आणि प्लॅटस,ओपनहायमर आणि जार्डिन्स. ती माणसे तीन खंड लुटून श्रीमंत झाली आहेत.हा इतिहास आहे राज..तुझ्या स्वतःच्या वडिलांनी आम्हाला शिकवलेला.त्यानंतर त्यांनी मला मूर्ख बनू नकोस असे शिकविले.. तू त्याबद्दल (इतिहासाबद्दल) संशयग्रस्त कल्पना कुठून उचलल्यास?”

पांडेने ऐकून घेतले. त्या प्रचंड,अश्लील वाटणाऱ्या माणसाकडे इतिहासाचे तुकडे तोडून त्याचे विपरीत अर्थ लावण्याची,विसंगत विधाने करण्याची ताकद होती.

“तुम्ही ज्यांचे उल्लेख केलेत गांगुली साहेब .. त्यांनी अफूच्या व्यापारातून गुलामगिरी लादली,वंशविद्वेष व्यवस्था निर्माण केली,सायॉक्स आदिवासींना संपवले, वाघ  आणि चित्त्यांची क्रूर कत्तल केली.त्यांच्या चर्चेसनी त्यांचे हे धंदे पवित्र मानले आणि त्यांना मुक्ती दिली.या सगळ्याचे अनुकरण करायचे आहे तुम्हाला ?”

गांगुली परत आक्रमक झाला.-

“ अनुकरण ..अनुकरण त्याच्याबद्दल बोलण्यात हशील नाही. त्यामध्ये आता काही फायदा राहिलेला नाही बाबा..आजच्या काळात तरी नाही. हे नवे जग आहे ..सहस्त्रक संपणार आहे पुढील दहा-पंधरा वर्षांत.आता गुलाम आणि लष्कर नाही.पण व्यापारी –हां,त्याना संधी आहे. आणि आपण त्यांच्यासाठी दरवाजे उघडायला सुरूवात केली आहे. हे दरवाजे आणखीन खुले होतील विश्वास ठेव माझ्यावर .. आणि तेव्हा तुम्ही काय करणार ? तुम्ही गांधीवादी विचारसरणी असणारे .. निरपेक्ष-तुम्ही सगळे प्लॅटसारख्यांसाठी आणि जगासाठी सगळे ठेवणार ..जे काही आहे आपल्याकडे ते त्यांना भेट म्हणून देऊन जंगलाकडे प्रयाण करणार ?”

गांगुलीच्या मनात त्याचा परदेशी गुंतवणूकदार प्लॅट याच्या मदतीने रेफ्रिजरेटर्सचे उत्पादन करण्याचा एक मोठा कारखाना सुरू करण्याची योजना होती.आपण घरोघरी परवडणारा फ्रिज पोहचवणार असे अहंकाराने सांगत आपल्या योजनेला तो समाजकल्याणाचा मुलामा देण्याचा प्रयत्न करत होता.आपली योजना डॉ.राजीव पांडेला पटवून देण्याचा त्याचा प्रयत्न होता.तो सांगू लागला-

“फ्रिज- सर्वांसाठी फ्रिज राज. पुरूष,स्त्रिया आणि मुले या भूभागातील सर्व कुटुंब …ज्यांना ज्यांना परवडेल अशा सर्व मध्यमवर्गीयांसाठी. अगदी कमीत कमी काळात..१९९०-९२ पर्यंत ..शक्य नाही होणार? पण ९५ पर्यंत किंवा २००० पर्यंत तर नक्कीच हे होईल. आणि का करू नये? सगळी माणसे फ्रिज घेण्यासाठी लायक आहेत.डॉक्टर साहेब फ्रिज ही काही चैनीची गोष्ट नाही आपल्यासारख्या हवामानात नाही का ?”

“मला तर ती गरजेची गोष्ट वाटते” डॉ.पांडे संवेदनशीलतेने म्हणाला.

परदेशात ब्रुनेल,फोर्ड या  उद्योजकांनी दूरदृष्टीने असे उद्योग कसे सुरू केले आणि आपल्या उद्योगांची वाढ कशी झाली हे दाखवणारी वस्तुसंग्रहालये देखील त्यांनी कशी सुरू केली आहेत हे गांगुली डॉ.पांडेला सांगत राहिला.जर्मनीने सर्वसामान्य माणसांसाठी फोक्सवॅगन ही गाडी आणली तसे मला सर्वसामान्यांसाठी फ्रिज आणायचे आहेत असे समर्थन गांगुली करू लागला.तेव्हा डॉ.पांडेने फक्त एकच प्रश्न त्याला विचारला की हे फ्रिज कोणत्या तंत्रज्ञानाच्याआधारे बनणार आहेत ..जुन्या की नव्या ? तेव्हा गांगुली गडबडत म्हणाला-

“तेच (जुने)..म्हणजे सुरूवातीला तरी तेच तंत्रज्ञान वापरणार कारण ते सिद्ध झालेले आहे.मात्र  कर्ज मिळाले पाहिजे..प्लॅट तर म्हणतोय की कर्ज तयारच आहे बॅगेत..तुला माहीत आहे भाई एकदा मानवी मूल्यांच्या बोगीची काळजी घेतली की अनुदानासारखे असते ते ..कर्जाचा ओघ सुरू होतो.विशेषतः तुम्ही मानवी मूल्यांसाठी काही तरी करताय हे एकदा दिसले की मग त्यांना त्यांचे व्यावसायिक हेतू साध्य करता येतात.आपला समाजकल्याण उपक्रम निषकलंक आहे .. ..बरोबर ना राजीव?”

“तुम्ही क्लिनीकबद्दल बोलताय ?” पांडेचा मनात अचानक धोक्याचा सायरन वाजला आणि दगडासारखी शांतता दोघांत पसरली.

गांगुलीचे तोंड बेचव झाले आणि तो म्हणाला ..

“ दवाखाना,पाळणाघर,लोकशाही,समाजकल्याण,न्याय.हे सगळे शब्द !” एखाद्या गुन्हेगारावर आरोप केल्यासारखे त्याने ते शब्द उच्चारले.

“हे फक्त शब्दच आहेत तर मग.” पांडे स्वतःला सावरत म्हणाला “तेवढेच का..”

“अर्थातच हा फक्त दिखावाच असतो बाबा.गांगुलीचे त्याच्या नेहमीच्या उद्धट माणसात रूपांतर झाले.त्यांना माहीत आहे ,आम्हाला माहीत आहे, आम्हाला माहीत आहे त्यांना माहीत आहे. हे फक्त अंजीराच्या झाडाचे पान आहे”

“काय लपवायला?”

“काय माहीत? त्यांची मने म्हणजे एक रहस्यच आहे.”

“पण तुम्ही तरी काही धुतल्या तांदळासारखे पवित्र नाही आहात गांगुली साहेब.” पांडे अंतर्मनातल्या धैर्याने ओरखडा काढत म्हणाला.

“तुम्हाला जगात काय चालले आहे हे माहीत आहे.तुम्हाला कुठेतरी कल्पना असणार की या अंजीराच्या पानामागे ते काय लपवत आहेत?”

“….हाच व्यवसाय असतो,हेच युद्ध असते हेच वास्तव असते.” गांगुली राजीवला म्हणाला.

इथे कथक निवेदन करतो –

“तर, तो पांडे. एका पंडिताचा मुलगा, वैद्यकशास्त्रातला निपुण,समाजाचा एक प्रतिष्ठीत ताठ खांब अशा एका माणसासमोर उभा होता की जो आपल्या वाईट हेतूंसाठी कर्ज मिळवायला.. सर्वांना फ्रिज पुरविण्याचा गोंडस हेतू दाखवून एक प्रचंड कारखाना उभारण्यासाठी कर्ज मिळवून अगणित फ्रिज बनवणार होता. असे तंत्रज्ञान वापरून की जे पाश्चिमात्यांनी वातावरणातील ओझोन थराला छिद्र पाडणारे  फ्लुरोकार्बन उत्सर्जीत करते म्हणून त्यांच्या देशांत बाद केले होते.असे तंत्रज्ञान की जे पहिल्या जगाला हानीकारक होते आणि तिसऱ्या जगासाठी ठीकच होते.”

आपल्याकडून जो दवाखाना गांगुलीने उभारून घेतला आहे तो केवळ त्याच्या स्वार्थी हेतूसाठी आहे हे कटू सत्य डॉ.राजीव पांडेला अस्वस्थ करत होते.तो गांगुलीच्या घरातून दिसणाऱ्या समुद्राकडे बघत उभा होता.त्याने गांगुलीला तो देखावा पाहायला बोलावले.-

“काय पाहू ?”-गांगुली

“समुद्र,आभाळ ,संपूर्ण पृथ्वी” ..पांडे म्हणाला.

“नाही – तसं नाही. आधी माणसांचा विचार करा. तुम्ही कधी विचार केलाय का तुमचा स्वप्नातला कारखाना जेव्हा पृथ्वीवरील  ओझोन थराला छिद्रे पाडेल तेव्हा माणसांचे काय होईल  त्याचा ..”

गांगुलीच्या मते डॉ.पांडे उगाचच फार पुढचा विचार करत होता.पर्यावरण रक्षणासाठीचा व्हिएन्ना करार तर नुकताच झाला होता. आणि गांगुलीच्या मते तर तो केवळ एक कागद होता.आणि आपण नाही ओझोन थर संपवला.तो संपवण्याला जबाबदार तर स्टुटगार्ड, न्यूयॉर्क,म्युनिच,लंडन मधील उद्योग  आहेत असे गांगुलीचे म्हणणे होते.ते आज पृथ्वीवरील वातावरण प्रदूषित करत आहेत आपण तर अजून सुरूवातच केलेली नाही. दहा-वीस वर्षांनी आपण त्या प्रदूषणाला जबाबदार असू असे गांगुलीचे स्वतःचे तर्कशास्त्र होते.ते ऐकून पांडे त्याला फटकारत म्हणाला –

“आपण किती वर्षांनी पृथ्वी प्रदूषित करणार याने फरक पडतो का ? तुम्हाला झालेय तरी काय गांगुली साहेब ? तुम्ही संपूर्ण मानवजातीवर तुमचे लक्ष एकाग्र करू शकत नाही ?तुम्ही ओझोन थराचे सुरक्षा कवच काढाल तेव्हा माणसांच्या त्वचेचे,मांसाचे काय होईल याचा विचार केलाय ..मी एक डॉक्टर आहे म्हणून ते पाहू शकतो. माझ्याकडून या माणसांवर इलाज करण्याची अपेक्षा असेल.माणसांना मोतीबिंदू होतील,त्यांची त्वचा जळेल, त्यांना कॅन्सर होईल, ते वेदनेने तडफडतील. असह्य वेदनेने ते मरतील. मला वाटतं ही सरळ भाषा तुम्हाला कळत असेल. हाही तुमच्या मूर्ख महत्वाकांक्षेचाच भाग म्हणायचा का ?”

“तो काही आपला प्रश्न नाही” गांगुली त्याच्यापासून दूर जात म्हणाला.

“तू एक चांगला माणूस आहेस राज ! पण तू शहाणा आहेस का ? आपली त्वचा तपकिरी आहे. सगळ्या प्रकारच्या तपकीरी रंगाच्या छटा आहेत आपल्याकडच्या त्वचेत.गडद,सौम्य,चॉकलेटी आणि तुझ्यासारखा गोरा माणूसही मूळात तपकीरी रंगातच गणला जातो.या वर्णाच्या माणसावर तीव्र सूर्यकिरणांचा प्रभाव पडणार नाही.फक्त गुलाबी आणि शुभ्र रंगाचे लोकच प्रभावीत होतील “

त्या संध्याकाळी दुसऱ्यांदा पांडे या माणसाच्या नैतिकतेच्या कल्पनांनी उद्वस्थ झाला होता.

“देवासाठी तरी दया करा गांगुली साहेब.. अहो त्यांनाही संवेदना आहेत..नाहीत का? तुम्ही एवढा विचारही करू शकत नाही का? ते गुलाबी असोत की गोरे त्यांच्या त्वचाही फाटतील, त्यांना जखमा होतील,त्यातून रक्त येईल, त्यांनाही वेदना होतील. त्यांचे पुरूष, स्त्रिया, माता, लहान मुले इतर सर्वांप्रमाणेच आहेत.या मूलभूत माणूसकीच्या गोष्टीही तुम्हाला समजणार नाहीत का ?”

गांगुलीच्या डोक्याकडून कपाळावर खाली सापासारखी येणारी  शिर फुगली होती.जणू ती ताडताड उडत होती.

“तू कोणाशी बोलतोयंस ? शाळामास्तर साहेब, आम्हाला तुझ्या शिकवणीची गरज आहे का? ‘ते’ लोक आहेत की ज्यांनी तपकिरी त्वचेच्या माणसांना काही संवेदना आहेत हे कधी लक्षात घेतले नाही.त्यांना वाटले की आमची त्वचा कधी फाटत नाही, आम्हाला कधी जखमा होत नाहीत आणि वेदनेने आम्ही विव्हळत नाही. ‘ते’ आहेत की ज्यांनी आफ्रिकेतली काळ्या कातडीची किंमत स्वस्त केली आणि आशियातील तपकिरी कातडीची माणसे बुलडोझर फिरवण्यासाठी लायक मानली. काय वेगळा विचार केलाय त्यांनी. सांग ना .. त्यांनी जेव्हा व्हिएतनाममध्ये त्यांचे लष्कर पाठवले, त्यांची जमिन रणगाड्यांनी खणून काढली , त्यांना विमानातून अग्नीवर्षाव करून जाळून टाकले तेव्हा .. फार जुना काळ नाही तो..आणि दक्षिण आफ्रिकेतल्या वाघांचा व्यापार कोणी केला सांग ना.. तुला माहीत नाही –फार उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे त्यांचे असे कृष्णा म्हणतो. तुम्हाला काय वाटते डॉक्टर साहेब सांगा ना”

इथे कथक डॉ.पांडेच्या मनातील चिंतन ऐकवतो.

“ पांडेला गांगुलीला उत्तर द्यावेसे वाटले नाही.तो गांगुलीपासून दूर गेला आणि समुद्राकडे पाहू लागला. तो देखावा त्याच्या मनावर गारूड घालू लागला.समुद्रकिनाऱ्याचे निखळ सौंदर्य ,सुंदर बाकदार किनारा असलेला हा चमचमता समुद्र आणि त्याच्यावर जणू हिऱ्यांचा पडदा सरकवणारा माणूस.निरागस निसर्ग आणि नाचणारे,धुरकट ..जणू चमकदार ठिणग्या टाकणारे दिवे .समुद्राला जणू हुशारीने आपल्या जाळ्यात पकडणारे हे दिवे. मुंबईकर या दिव्यांच्या हारला प्रेमाने ‘राणीचा हार’ म्हणतात. हा हार तुम्हाला दोन भागात विभाजीत करतो… निखळ सौंदर्य किंवा सत्य.एका जुन्या विचारवंताच्या मते सौंदर्य हेच सत्य आहे की सत्य हेच सौंदर्य ..याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न त्याने आजवर कधी केला नव्हता आणि त्यातील भंगूरताही त्याला कधी जाणवली नव्हती.”

 ‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीतील कथन वाचकांच्या मनात अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण करते. निसर्गाचे बंधमुक्त सौंदर्य हे सत्य की त्या निसर्गाला आपल्या स्वार्थासाठी बांधण्याचे प्रयत्न करणारा माणूस हे सत्य ? ‘मी’ आणि ‘माझा स्वार्थ’ या संकुचित मनोवृत्तीपलीकडे जाऊन जर  माणूस अखिल मानवजातीच्या हिताचा व्यापक विचार करू शकणार नसेल तर त्याने केलेला तथाकथित विकास ही विकृती ठरेल की  संस्कृती ? असा प्रश्न जणू ‘बॉम्बे टायगर’  कादंबरीतील डॉ.राजीव पांडे वाचकांना विचारतो आहे.बौद्ध धर्मातील ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या मार्गावरून चालणारे सत्ताधारीच यापुढे जगात शांतता निर्माण करू शकतील असे या कादंबरीतून सूचीत होते आहे.

‘बॉम्बे टायगर’ कादंबरीत अखेरीस डॉ.राजीव पांडेचा अपघाती मृत्यू होत असला तरी त्याने गांगुलीशी तात्विक संघर्ष करताना ज्या मानवतावादी मूल्यांचा आग्रह धरलेला असतो ती मात्र संपत नाहीत.एवढेच नाही तर गांगुलीच्या वाट्याला आलेले लेखाच्या मृत्यूचे दुःख, एकाकीपण आणि नकळत घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून भोगाव्या लागलेल्या तुरूंगवासाने त्याला आलेले नैराश्य यामुळे तो अंतर्मुख होतो.कादंबरीची अखेर गांगुलीच्या दृष्टिकोनात झालेला सकारात्मक बदल दाखवून होते. हा आशावादी शेवट कादंबरीला सुखात्म ठरवतो.

‘बॉम्बे टायगर’ या कादंबरीमधील प्रश्न समकालीन आहेत आणि आजही विचारवंतांनी या प्रश्नांच्या शोधलेल्या उत्तरांचा गांभिर्याने अवलंब करण्यात आपण यशस्वी झालेलो नाही हे  तुम्हाला जाणवते आहे का ?.तुम्ही जरूर ही कादंबरी मूळातून वाचा आणि विचार करा.

कमला मार्कंडेय यांच्या तीन कादंबऱ्यांचा सविस्तर परिचय आपण मागील सहा ब्लॉगजमधून क्रमशः करून घेतला. यापुढील ब्लॉगमध्ये आणखीन एक स्वातंत्र्यपूर्वकालीन भारतीय इंग्रजी लेखिका- नयनतारा सहगल यांच्या साहित्याचा धावता आढावा आपण घेणार आहोत.आणि त्यानंतर क्रमशः आपण त्यांच्या तीन अभिजात कादंबऱ्यांचा सखोल परिचय करून घेणार आहोत.

                                                                                  -गीता मांजरेकर

**************************************************************************************

यावर आपले मत नोंदवा