मागील ब्लॉगमध्ये आपण कमला मार्कंडेय यांनी लिहिलेल्या ‘दी नोव्हेअर मॅन’(१९७३) या कादंबरीचे कथासूत्र आणि कथानक यांचा परिचय करून घेतला.त्या कथासूत्रात वर्णविद्वेष आणि विशेषतः स्थलांतरींबद्दलचा राग आणि त्यातून होणारी हिंसक कृत्ये हा विचार मध्यवर्ती होता हे आपण पाहिले. दुर्दैवाने गेल्या काही दिवसांपासून ब्रिटनमध्ये अती-उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून असे हिंसाचार केले जात आहेत.आणि जगभरात अशा घटना अलीकडे वारंवार घडताना दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर  आजच्या ब्लॉगमध्ये आपण ‘दी नोव्हेअर मॅन’ या कादंबरीची संरचना, कथन, व्यक्तिरेखा या अंगाने कादंबरीचे पूर्वावलोकन करणे औचित्यपूर्ण ठरेल.ज्यांना ब्लॉग वाचणे कठीण वाटत असेल त्यांच्यासाठी ब्लॉगमधील लेखनाची श्राव्य धारिका(ऑडियो) सोबत जोडली आहे…

कथानकाची रचना आणि विश्लेषण

‘दी नोव्हेअर मॅन’ या कादंबरीची पृष्ठसंख्या ३२२ एवढी आहे. कथानकाची मांडणी एकूण ४२ प्रकरणांत लेखिकेने केलेली दिसते.मानवी जीवनातील ‘घर’ ‘शेजार’, त्यातून होणारा व्यक्तीचा स्वीकार,त्याला मिळणारे प्रेम,आपुलकी आणि स्थैर्य या कादंबरीतील मध्यवर्ती कल्पना मानल्या तर कादंबरीचे तीन भाग दाखवता येतील.कादंबरी आधी श्रीनिवासच्या इंग्लंडमधील भूतकाळात जाते मग त्याहीपूर्वीच्या त्याच्या भारतातील भूतकाळात शिरते आणि शेवटी नजिकच्या भूतकाळात येऊन संपते.

  • पहिल्या भागात (प्रकरण तीन ते चौदा) श्रीनिवासने लंडनमधील आपली दरवर्षी भाड्याच्या घरात चाललेली भटकंती थांबवून घर (ऍशक्राफ्ट ऍव्हेन्यू) विकत घेणे,तिथे स्थिरावण्याचा प्रयत्न करणे आणि महायुद्धामुळे त्याच्या कुटुंबाचे स्थैर्य संपुष्टात येणे हा भाग प्रामुख्याने येतो.तसेच एकाकी पडलेल्या श्रीनिवासने मिसेस पिकरींगच्या भेटीनंतर तिच्यासोबत राहून पुनश्च घराची घडी बसवण्याचा, स्थैर्य मिळवण्याचा प्रयत्न करणे हाही भाग या पहिल्या भागात येतो.म्हणजे साधारण पस्तीस वर्षांचा कालखंड या भागात सामावलेला आहे असे म्हणता येईल.
  •  दुसऱ्या भागात (प्रकरण चौदा ते वीस) श्रीनिवास आपल्या भारतातल्या घराबद्दल (चंद्रप्रासाद),भारतातील माणसे,तेथील इंग्रजांबरोबरचा संघर्ष आणि नाइलाजाने त्याने ब्रिटनमध्ये स्थलांतर करणे या भूतकाळाबद्दल तापाच्या ग्लानीत मिसेस पिकरींगला कथन करतो.श्रीनिवासच्या कळत्या वयापासून ते त्याच्या वयाच्या वीस वर्षांपर्यंतचा हा कालखंड साधारण दहा वर्षांचा म्हणता येईल.
  • तिसऱ्या भागात (प्रकरण २१ ते ४२)  श्रीनिवासचे लंडनमधील घर आणि मध्यमवर्गीय रहाणी फ्रेडसारख्या असंतुष्ट ब्रिटीश तरूणांच्या डोळ्यांत खुपू लागल्याने श्रीनिवासला उपरे वाटू लागले आहे. अतिशय सहिष्णूपणे तो आपल्याबद्दलच्या फ्रेडच्या द्वेषपूर्ण कारवायांना तोंड देत राहतो पण अखेरीस आपण ना भारतातले राहिलो ना ब्रिटनमधले ही अधांतरी (Nowhere)असल्याची जाणीव त्याच्या सहनशीलतेपलीकडे जाते आणि तो मृत्यू पावतो. एक घर,एका माणसाचे अस्तित्वच जणू उखडून टाकले जाते.हा तिसरा भाग सर्वाधिक प्रकरणे आणि पृष्ठे व्यापणारा असला तरी या भागात केवळ पाच-सहा वर्षांचा कालखंड सामावलेला आहे.

कादंबरीची ही रचना पाहता लेखिकेला सर्वाधिक महत्त्व तिसऱ्या भागाला दिले आहे हे लक्षात येते. श्रीनिवास आणि त्याच्यासारख्या स्थलांतरीतांच्या वाट्याला परदेशात येणारे उपरेपण, तिथल्या देशवासीयांच्या मनात या स्थलांतरीतांबद्दल निर्माण होणारी असूया आणि त्यातून त्यांनी निवडलेला असहिष्णूतेचा, हिंसेचा पर्याय याबद्दल प्रश्र्न लेखिकेला उपस्थित करायचा आहे हे स्पष्ट होते.आपण ‘दी नोव्हेअर मॅन’ मधील कथनाचा अधिक तपशीलवार शोध घेऊ.

पहिल्याच प्रकरणात प्रारंभिक कथनातूनच कथानकाचा काळ आणि अवकाश लेखिकेने स्पष्ट केला आहे. पहिल्या प्रकरणात डॉ.रॅडक्लिफ त्यांच्या दवाखान्यात एका ‘थंडगार इंग्लिश संध्याकाळी’ भारतीय पेशंटची तपासणी करत असताना त्याच्या आरोग्याचा पूर्वेतिहास त्यांच्याकडील दस्तऐवजांच्याआधारे समजून घेताना दिसतात.त्याचे वर्णन करताना कथक म्हणतो –

“डॉ.रॅडक्लिफ यांनी  हलकेच त्यांच्या हातातील पेन्सिल सर्जरी टेबलवर आपटली आणि ते परिचारीकेने त्यांच्यापुढे आणून ठेवलेल्या कागदांतून रूग्णाच्या आरोग्याचा इतिहास अभ्यासू लागले….त्यांच्यापुढील तक्त्यातील रकान्यात फारशा  नोंदी नव्हत्या……सर्व तीनही नोंदी डॉ.रॅडक्लिफ यांच्याच हस्ताक्षरात होत्या.पहिली नोंद १९५२ मधील दिसत होती तर शेवटची १९६५ ची होती म्हणजे तीन वर्षांपूर्वीची. १९६८ हे वर्षही जवळजवळ संपत आले होते.”

काळ आणि अवकाशाबद्दल स्पष्ट नोंदी प्रकरण १५ (पुढच्या वर्षात म्हणजे १९१७ साली), प्रकरण १६ (ते १९१८ साल होते),प्रकरण २२( १९६५च्या मध्याकडे सरकताना) च्या प्रारंभी कथनात येतात.भारतातील जालियनवाला बाग हत्याकांडाचा संदर्भ प्रकरण १६ मध्ये येतो.पहिले व दुसरे महायुद्ध,जर्मनीचा नॉर्मन डी वरील बॉंब हल्ला याचे संदर्भ देखील कथनात येतात.या काळाच्या नोंदींमुळे कथानकात सामावलेला कालखंड सुमारे पन्नास वर्षांचा आहे हे लक्षात येते.तसेच कथानक भारत आणि लंडनमध्ये घडते आहे हेही लक्षात येते.

दुसऱ्या प्रकरणात श्रीनिवासचा उल्लेखही न करता कथक डॉ.रॅडक्लिफ यांची पत्नी मार्जोरी हिच्याबद्दल आणि तिच्या डॉ.रॅडक्लिफबद्दल असणाऱ्या आक्षेपांबद्दल सांगत राहतो. डॉ.रॅडक्लिफ यांना वैद्यकीय व्यवसायाखेरीज अन्य कशातच स्वारस्य नाही हा मार्जोरीचा आक्षेप आहे. विशेषतः ते सामाजिक समारंभात सहभागी होत नाहीत याबद्दल मार्जोरीची तक्रार आहे. तिचे परिचित मेटलॅंड कुटुंबीय भराभर संपन्न होत आहेत आणि त्यांनी स्पेनमध्ये व्हिला विकत घेऊन तिथे देखभालीसाठी एक मोलकरीणही ठेवली आहे पण आपल्या नवऱ्याला ते माहीतही नाही याचा मार्जोरीला राग येतो.डॉ.रॅडक्लिफ यांच्या सहकाऱ्याच्या पत्नीला ब्रिटनच्या राणीच्या राजवाड्यात जेवणाचं आमंत्रण मिळालं आहे पण आपला नवरा अशा संधींसाठी प्रयत्न करत नाही याचे मार्जोरीला दुःख आहे. आपणच सगळे घर सांभाळतो, सगळे निर्णय घेतो असे अहंकाराने  मार्जोरी फोनवरील संभाषणातून आपल्या मैत्रीणीला सांगते. डॉ.रॅडक्लिफ यांच्या पत्नीची व्यक्तिरेखा कथक इतक्या तपशीलात जाऊन का कथन करतो आहे असा प्रश्न वाचकाला पडतो. पुढे हळूहळू त्याचे उत्तर मिळते.मार्जोरी असेल किंवा श्रीनिवासच्या शेजारी राहणारी मिसेस ग्लास असेल या स्त्रियांना श्रीमंती, भौतिक साधनसंपत्ती यांचा हव्यास आहे.याउलट श्रीनिवासची पत्नी वसंता आणि नंतर त्याची सहचर झालेली मिसेस पिकरींग या स्त्रिया मात्र साधे,सत्शील,समाधानी आयुष्य जगू इच्छिणाऱ्या आहेत हा विरोधाभास लेखिकेला दाखवायचा आहे.

तिसऱ्या प्रकरणात श्रीनिवास डॉ.रॅडक्लिफ यांच्याकडून त्याच्या निवासस्थानी गेला आहे. माळ्यावरील आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलताना तो पायातील पादत्राणेही काढून टाकतो. अनवाणी पावलांना होणारा लाकडी जमिनीचा स्पर्श त्याला कित्येक वर्षांपूर्वी मागे सोडलेल्या देशातील लाकडी घराची आठवण करून देतो. आपल्या भारतातून आणलेल्या पलंगावर पडून आयुष्याबद्दल चिंतन करत असताना त्याला त्याची पत्नी वसंता ही त्याच्या जगण्यातील चैतन्य कशी होती हे आठवते आहे असे कथक सांगतो.वसंतामुळेच त्याने दक्षिण लंडनमध्ये स्वतःचे घर विकत घेतले होते. तत्पूर्वी त्यांचे कुटुंब भाड्याच्या घरात रहात असे आणि अशी कितीतरी घरे त्यांनी बदलली होती. पण आपले स्वतःचे घर असावे अशी वसंताची इच्छा असल्याने शेवटी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात श्रीनिवासने एक जुने दुमजली घर स्वस्तात विकत घेतले होते.घर घेतल्यावर वसंताला खूप अभिमान वाटला होता, ती उत्कंठीत झाली होती.परंतु श्रीनिवाला तसे वाटले नव्हते.त्याबद्दल कथक लिहितो –

“श्रीनिवासला अशा कुठल्याच भावना जाणवल्या नव्हत्या. आपण या घराचे संस्थापक आहोत असे त्याला वाटले नव्हते.त्याला वाटले होते की त्यांनी विटा आणि सिमेंट-कॉन्क्रीटशी स्वतःला जखडून घेतले होते.आणि त्यामुळे त्याला साशंक वाटत होते. जोपर्यंत ते सतत घरे बदलत होते तोपर्यंत त्याला आपण कधीतरी भारतात परतणार आहोत अशा विश्वासावर जगायला आवडत होते. काही घटना आणि व्यक्तींमुळे त्याला भारतातून निघून यावे लागले होते.पण परतीचा  पर्याय खुला होता.परंतु परदेशात जसजशी वर्षे पुढे सरकत होती तसतसे श्रीनिवासने मनोमन हे स्वीकारले होते की परत जाणे होणार नव्हते.प्रत्येक वर्ष त्याच्या मुलांवर एखाद्या झाडाच्या खोडावरील वेलीसारखा अदृष्य वळसा देत चालले होते.त्यांना वेगळ्या देशातील हवामानामध्ये जगणे अधिकाधिक कठीण होत जाणार होते.आणि काळ जसजसा पुढे सरकत होता तसा तो अटळपणे अनेकांना गिळून टाकत होता. त्याच्या भारतातील कुटुंबातील अशा व्यक्ती की ज्यांच्यावर नात्यांचे वेल पुन्हा वेढे घालू शकतील  कमीकमी होत चालल्या होत्या. पण सत्य मानणे ही वेगळी गोष्ट होती.प्रत्येक माणसाला एखाद-दुसऱ्या भ्रमात जगण्याची संमती असावी हे श्रीनिवासने मनोमन स्वीकारले होते.सत्य हे की  घर आता जवळ जवळ उध्वस्थ होण्याच्या मार्गावर होते आणि त्यामागचे सत्य आणि निराशा त्याला अपरिचत नव्हती.  साखळ्या – श्रीनिवास म्हणाला..चहाचे खोके आणि बांधलेल्या पेट्या यांच्यामध्ये उदास वाटणाऱ्या श्रीनिवासला असे वाटत होते की आपण चार भिंती आणि छपराला साखळ्यांनी बांधून घेतले आहे. पण हे निर्बंध काहीच नव्हते कारण अदृष्य भविष्यकाळ तुलनेने अधिक गुंतागुंतीची उध्वस्थता त्यांच्या वाट्याला आणणार होता.”

संपूर्ण कादंबरीत घर आणि त्याचे भक्कमपण हे माणसांचे स्थैर्य दर्शवणारे प्रतीक म्हणून वापरलेले दिसते.श्रीनिवासच्या आजोबांनी त्यांच्या स्वतःच्या रानातील सागवानी लाकडातून बांधलेले भक्कम आणि तरीही नाजुक कलाकुसर असलेले घर ‘चंद्रप्रसाद’.(चौदाव्या प्रकरणात या घराबद्दल तपशीलवार वर्णन येते)  ज्याच्या कायम गृहीत धरलेल्या सुरक्षित कवचातून श्रीनिवासला नाइलाजाने बाहेर पडावे लागले होते. लंडनमध्ये त्याने विकत घेतलेले ‘ऍशक्रॉफ्ट ऍव्हेन्यू’ हे घर ओक लाकडापासून बनलेले  होते.पण त्याला अनेक वर्षे आजुबाजूचे लोक ‘नंबर पाच’ असेच म्हणत राहिले होते.युद्धकाळात सततच्या असुरक्षिततेमुळे आणि श्रीनिवास कुटुंबाने दाखवलेल्या माणुसकीमुळे असेल शेजारचे लोक जवळीक दाखवू लागले होते. युद्धानंतर  काहींनी ‘श्रीनिवासांचे घर’ असे या घराला धीटपणे म्हणायला सुरवात केली होती.  

डॉ.रॅडक्लिफ यांची पत्नी मार्जोरी हिला स्पेनमध्ये ‘घर’ हवे आहे ते एक श्रीमंतीचे प्रतीक (status symbol) म्हणून तर श्रीनिवास आणि विशेषतः वसंताला ‘घर’ हवे आहे ते सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी.हा फरक व्यक्तींच्या मानसिकतेतला आहे आणि परिस्थितीही त्याला कारण आहे. वसंताला घर हवं आहे ते आपले मुलगे आणि त्यांची पुढे वाढतील ती कुटुंबे एकत्र रहावीत, आपल्यासोबत रहावीत यासाठी. भारतातील एकत्र कुटुंब तिच्या मनात खोल सुरक्षिततेची भावना रूजवते. तिला आठवते की भारतात इंग्रजांशी संघर्ष करताना तिची आजी सगळ्या कुटुंबाला स्वयंपाकघरात एकत्र आणत असे तेव्हा भीती पळून जाई. दुसऱ्या महायुद्धात बॉंबहल्ला होई तेव्हा आजूबाजूच्या बंगल्यातील कुटुंबे श्रीनिवासांच्या घरात तळघरात आसरा घेण्यासाठी येत. वसंताला ते आपले एकत्र कुटुंबच वाटे आणि तेव्हाही तिचे भय पळून जाई.

घर आणि भौतिक साधनांचा वसंताला हव्यास नव्हता म्हणूनच तर आपण अनेक वर्ष त्याच जुन्या घरात राहिलो असे श्रीनिवास सांगतो. त्याबद्दल कथक लिहितो..

“जर वसंताची मानसिक जडणघडण वेगळी असती तर श्रीनिवासने आपला व्यवसाय विस्तारला असता. त्याला स्वतःला त्यातून काही मोठेपण सिद्ध करायचे नव्हते पण संधी मिळाली असती तर त्याने चांगल्या व्यवस्थापनाने व्यवसायात भरारी घेतलीही असती. पण वसंताने हेतूतः आपले रहाणीमान सामान्य ठेवले होते.थाटात राहणाऱ्या मूठभरांमुळे बहुसंख्य गरीबीत लोटले जातात ही आपल्या देशवासीयांप्रमाणे  वसंताचीही पक्की धारणा होती.स्वस्तात विकत घेऊन महागात विकणे हा आपल्या संपन्नतेचा  पाया आहे ती आपल्या नवऱ्याला सांगत असे. आणि माणसं –त्यांचा वर्ण कोणता का असेना –ते महत्त्वाचे नाही –अशाच देवाणघेवाणीत गुंतलेली असतात.जर आपण श्रीमंतीत राहिलो तर आपल्याला आवडो किंवा न आवडो ती दुसऱ्यांची पिळवणूक करूनच आपण मिळवलेली असेल.”(पृ.४७)

श्रीनिवासचा मित्र अब्दुल झांजिबारीने  आपला व्यवसाय वाढवत नेला होता.त्यामागे त्याच्या मनातला इंग्रजांबद्दलचा संताप आणि त्यातून निर्माण झालेली ईर्षा हेही कारण होते. पण श्रीनिवासच्या मनात  इंग्रजांनी भारतात केलेल्या पिळवणुकीची  चीड नंतर उरली नव्हती.आपण इंग्लंडचे नागरिक झालो आहोत असे त्याने मनोमन स्वीकारले होते.आपल्या मध्यमवर्गीय असण्याबद्दल त्याला खंत नव्हती. वसंता असो की मिसेस पिकरींग दोघी त्याच्या आयुष्यातील स्त्रियांनी  श्रीमंती थाटाची अपेक्षा त्याच्याकडून कधीच ठेवली नव्हती. वसंताच्या मृत्यूनंतर तर श्रीनिवासने व्यवसायचा वेग अगदी कमी केला होता. कधीतरी त्याला भेटायला आलेला लक्ष्मण (त्याचा थोरला मुलगा) जेव्हा श्रीनिवासला व्यवसायाबद्दल विचारे तेव्हा तो व्यवसायाची गती  ‘जॉगींग’ अशा शब्दांत वर्णन करे. लक्ष्मणची अपेक्षा असे की त्याने ‘रनिंग’ म्हणावे पण श्रीनिवास आहे त्यात समाधानी होता.

मिसेस पिकरींग श्रीनिवासच्या आयुष्यात आल्यावर तिचा मांसाहार,तिचा ख्रिसमस या गोष्टी श्रीनिवासने स्वीकारल्या होत्या. घरात दोन्ही मजल्यांवर आलेली भाडेकरू ब्रिटीश कुटुंबे आणि घराच्या तळघरात आश्रय घ्यायला आलेला कृष्णवर्णीय या सगळ्यांशी श्रीनिवासचे नाते सौहार्दाचे होते.वसंताच्या मृत्यूनंतर तिच्या अस्थी थेम्स नदीत सोडायला गेलेला श्रीनिवास जेवढा संवेदनशील आहे तेवढाच फ्रेडने त्याच्या घराच्या पायरीवर आणून टाकलेल्या मेलेल्या उंदराचेही अंत्यसंस्कार करणारा श्रीनिवास भावनाशील आहे.फ्रेडने अंगावर डांबर टाकले तरी त्याला त्याची आई व पोलिसांसमोर गुन्हेगार न ठरवणारा श्रीनिवास हा उदारमनस्क आहे.

पण शेवटी सहिष्णूपणाची एक मर्यादा असतेच.एका क्षणी श्रीनिवासही फ्रेडच्या कारवायांनी चिडतो. आपल्याला झालेला कुष्ठरोग हे आपल्याबद्दलच्या घृणेचे एक निमित्त आहे.मूळ कारण आहे आपल्याबद्दलचा द्वेष.  आपला शांतपणे जगण्याचा हक्क नाकारला जातो आहे हे  त्याला सहन होत नाही.मिसेस पिकरींग त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते पण तिच्या लक्षात येते की ते आता शक्य नाही.

इथे कथक परिस्थितीचा ताण कथन करतो –

“तो आता तिच्या खेचून घेण्यापलीकडे गेला होता. त्याला पुढे ढकलले जात होते किंवा कदाचित तो आपल्या अंतःस्फूर्तीने  मुकाबल्याकडे ओढला जात होता.जेव्हा तो तिथे पोहचला तेव्हा तो एकटा होता जसा त्याने अंदाज केला होता.लांबून त्याला वाटले होते की आपण एकटे नसावे.तिच्या सहवासाच्या उबेमुळे त्याला तसे वाटले होते.पण त्याचे या सगळ्या प्रकरणात गुंतणे इतके अटळ होते की तिचे असणे खिजगणतीत राहिले नव्हते.

हा त्याचा निर्णय आहे,मिसेस पिकरींगने स्वतःशी म्हटले.मी त्याला थांबवू शकत नाही.मला जर माहीत असते की त्याचा हेतू काय आहे.. आणि मला तो माहीत नाही.ती थांबली,तिच्या हातातील नॅपकीनच्या कडा चाचपडत राहिली..ती कड उसवली आहे हे जाणवेपर्यंत.शेवटी तिने वैतागून श्रीनिवासला विचारले ..काय करणार आहेस ..(स्वतःला) धोका देणार आहे.जे सत्य आजवर मी नाकारत होतो ते स्वीकारणार आहे…”(पृ.२४५)

मिसेस पिकरींगला आपल्याच देशवासीयांच्या मनात श्रीनिवासबद्दल असलेला द्वेष स्वीकारणे अवघड होते. पण शेवटी तिलाही तो स्पष्ट दिसत होता. या द्वेषाच्या आगीत द्वेष करणारे स्वतःच संपून जातील हे श्रीनिवासचे म्हणणेही शेवटी तिला पटले होते.

श्रीनिवासच्या ‘ऍशक्रॉफ्ट ऍव्हेन्यू’ पासून थोडेसे पुढे गेले की एक रिकामा भूभाग होता.तिथे एकेकाळी बेशिस्तपणे वाढलेले रान होते जे श्रीनिवासला फार आवडे. तिथे गेले की त्याला आपल्या खेड्यातील मुक्त निसर्ग आठवे.महायुद्धानंतर तिथे हळूहळू  स्थलांतरीत झालेल्या विस्थापितांचे बेकायदेशीर धंदे तिथे सुरू झालेले श्रीनिवास पाही तेव्हा त्याला आपली मुलेही या स्थलांतरीतांसारखी होऊ शकली असती अशी भयशंका मनाला चाटून जाई. प्रत्यक्षात लक्ष्मणने स्थलांतरीत ही ओळख कायमची पुसून टाकण्यासाठीच की काय ब्रिटीश मुलीशी विवाह केला होता. आपली मुलेही आपल्यासारखी सावळी होऊ नयेत तर आपल्या बायकोसारखी गोरीपान असावीत असे त्याला वाटत होते. शेषू तर या परक्या देशाने पुकारलेल्या युद्धात हकनाक बळी गेला होता.

त्या मोकळ्या भूभागावर बारा मजल्याची इमारत बांधण्याचे काम सुरू झाले तेव्हा श्रीनिवास अस्वस्थ झाला होता. त्याचा भारतातील भूतकाळ आणि तो बेशिस्त रान वाढलेलो मोकळा भूभाग यांचा असलेला त्याच्या मनातील सांधाच निखळून पडला होता.आणि पुढे फ्रेडच्या दुष्ट कारवायांपुढे हळूहळू श्रीनिवास हतबल होत गेला.

खरं तर, फ्रेड स्वतःच नोकरीसाठी ऑस्ट्रेलियात स्थलांतरीत होऊन तिथले रस्त्यावर डांबर घालण्याचे काम न आवडल्याने परत आला आहे. कमी शिक्षण, कौशल्य नसणे,आळस, कष्ट करत चिकाटीने राहण्याची तयारी नसणे हे फ्रेडच्या बेकारीचे खरे कारण आहे .त्याची आई त्याला त्याबद्दल सतत टोचून बोले म्हणून तो घराबाहेर वेळ काढत राही. अशातच त्याला त्याच्यासारख्याच बेकार मित्राच्या समुपदेशकाने अपयशाचे खापर फोडण्यासाठी आयतेच कारण दिले.स्थलांतरीतांमुळे आपल्याला आपल्या देशात नोकरी मिळत नाही हे कारण फ्रेडच्या मनात खोल ठसले. गल्लीत कचरा काढणारा कृष्णवर्णीय त्याच्या रागाचा पहिला बळी ठरला.वस्तुतः तो कृष्णवर्णीय पदवीधर असूनही सफाई कामगाराचे काम करत होता पण हा सारासार विवेक करण्याची फ्रेडची मनःस्थितीच नव्हती. त्यामुळे शेजारच्याच घरातील  श्रीनिवास वयोवृद्ध असला तरी  स्थलांतरीत असल्याने त्याला डोळ्यात खुपू लागला. फ्रेडच्या मनातील अपल्याबद्दलची असूया आणि त्याच्या दुष्ट वागण्याकडे सहिष्णूतेने पाहण्याचे श्रीनिवासचे धोरण आहे. पण फ्रेडशी शांतपणे मुकाबला करताना श्रीनिवास हळूहळ ढेपाळत गेला आहे.आपली काहीही चूक नसताना आपला शांतपणे जगण्याचा हक्क नाकारला जातो आहे ही जाणीव श्रीनिवासला हतबल करत गेली. त्याच्या मनःस्थितीचे वर्णन करताना कथक म्हणतो-

“मी परका आहे. माझे रूपांतर परक्यामध्ये झाले आहे.माझ्या हातावरचे व्रण हे केवळ निमित्त आहे.या सरत्या आयुष्याचा शेवट कुठे होणार? श्रीनिवासचे स्वतःला विचारले आणि तो त्याच्या सागवानी पलंगावरून उठून  खिडकीबाहेरच्या त्याला नाकारणाऱ्या जमावाकडे पाहू लागला.उपरा- त्याने स्वतःलाच उत्तर दिले. जणू जमाव त्याच्याकडे पाहून याच घोषणा करत होता असे त्याला भासले.उपरा,उपरा – ज्याच्या रीती, उच्चार, आवाज, बोलण्याचे संदर्भ, त्याची हाडे, त्याचा बांधा, त्याची जीवनपद्धती -त्याचं सगळंच उपरं –तो किंचाळला ‘उपरा’!”

वस्तुतः, श्रीनिवास, वसंता ही स्थलांतरीत असली तरी मूळातच पापभिरू माणसे.त्यांना भौतिक साधनसंपत्तीचा हव्यास नाही. एक स्थिर, शांत-समाधानी आयुष्य जगता यावे एवढीच त्यांची अपेक्षा आहे.त्यांना कोणाशीही वैर,स्पर्धा नको आहे.कुणावरही सूड उगवण्याची त्यांची वृत्ती नाही.ती प्रत्येकाचा जगण्याचा हक्क मानणारी स्वीकारशील  माणसे आहेत. ‘लोका समस्तः सुखिनौ भवन्तु’ अशी त्यांची जीवनपद्धती आहे.असे असूनही  भारतात इंग्रजांच्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेपुढे त्यांना आपली सागाची झाडे वाचवता आलेली नाहीत, घर,माणसे वाचवता आली नाहीत. केवळ नाइलाजाने, जीव जगवण्यासाठी त्यांनी स्थलांतर केले आहे. इंग्लंड त्यांचा देश नसूनही त्यांनी तो मनोमन स्वीकारला आहे. तिथे घर वसवल्यावर त्यांना स्थैर्य आल्यासारखे वाटले आहे. आता आयुष्य स्वस्थ-शांत होईल ,भारतातल्यासारखे एकत्र कुटुंब पुन्हा होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.पण घडले वेगळेच आहे.इंग्लंडने सुरू केलेल्या युद्धात त्यांच्या मुलांना लढणे भाग पडले आहे.शेषू त्यांचा मुलगा इंग्लंडमध्ये जन्मलेला तरी तोही पापभिरू आहे. म्हणून तर युद्धातही निरागसांवर बॉंम्ब हल्ला करण्यास त्याचे मन तयार नसे. भित्रा म्हणून त्याची हवाईदलातून हकालपट्टी झाली आहे.त्याची आवडती कविता श्रीनिवासला नेहमी आठवते–

“Ladybird, ladybird, fly away home

Your house is on fire, your children alone”

‘दी नोव्हेअर मॅन’ या कादंबरीच्या एका आवृत्तीच्या मुखपृष्ठावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या घराची खिडकी फोडून त्यावरील लेडीबर्ड किटकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणारा श्रीनिवास दिसतो. आग श्रीनिवासला स्पर्शही करत नाही पण मनातील उपरेपणाचं ओझं घेऊन तो जगू शकत नाही.

आक्रमकता,हव्यास,आत्मकेंद्रीतता या मानवी प्रवृत्ती विरूद्ध सहिष्णूता,संतुष्टता,परोपकार या मानवी प्रवृत्ती यांच्यातील संघर्ष या कादंबरीतील कथन फार संयत भाषेत वाचकांपुढे ठेवते. श्रीनिवासच्या आयुष्यातील अत्यंत शोकाच्या,रागाच्या प्रसंगातही हे कथन भडक, शब्दबंबाळ किंवा अती भावनाशील झालेले नाही. वस्तुनिष्ठपणे परिस्थिती कथन करण्याची लेखिकेची शैली वैशिष्ट्यपूर्ण आहे.

‘दी नोव्हेअर मॅन’ या कमला मार्कंडेय यांच्या कादंबरीचे हे बरेच दीर्घ झालेले पूर्वावलोकन तुम्हाला आवडले का ? ते तुम्हाला मूळ इंग्रजी कादंबरी वाचण्याची प्रेरणा देवो. पुढील ब्लॉगमध्ये आपण कमला मार्कंडेय यांच्या ‘बॉंबे टायगर’ या कादंबरीचे कथानक समजून घेणार आहोत.

-गीता मांजरेकर

*********************************************************************************

यावर आपले मत नोंदवा