नेटफ्लिक्सवर ‘मॉन्क’ नावाच्या डिटेक्टीव्हची मालिका जर तुम्ही पाहिली असेल तर त्याचे शीर्षकगीत आठवून पहा. ‘देअर इज जंगल आऊट देअर’ हे त्यातील शब्द किती बोलके आहेत हे आपल्याला जगभरात चाललेले हिंसाचार पाहून नक्कीच पटेल. ‘दी नोव्हेअर मॅन’ या कादंबरीत कमला मार्कंडेय यांना माणसाच्या मनातील असहिष्णुतेबद्दल आणि हिंसकतेबद्दल भाष्य करायचे आहे.
मागील दोन ब्लॉग्जमध्ये आपण कमला मार्कंडेय यांच्या ‘ए सायलेन्स ऑफ डिझायर’ या कादंबरीचे कथानक व कथन या मुद्द्यावर चर्चा केली.आजच्या ब्लॉगमध्ये आपण कमला मार्कंडेय यांच्याच ‘दी नोव्हेअर मॅन’ या कादंबरीच्या कथानकाचा परिचय करून घेऊ.सोबत ज्यांना हा ब्लॉग वाचण्याऐवजी ऐकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ऑडियो फाईल जोडली आहे.
कथानकः
१९७३ मध्ये ‘दी नोव्हेअर मॅन’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीचे कथानक आज आपण लक्षात घेणार आहोत.या कथानकात सामावलेला कालखंड सुमारे पन्नास वर्षांचा आहे. हे कथानक एकरेषीय नाही तर ते काळाच्या अक्षावर मागेपुढे आंदोळत राहते. कथानक ज्या अवकाशात घडते तोही बदलत राहतो. त्यामुळे कथानक व्यामिश्र होत जाते.

या कथानकात साधारण पहिल्या जागतिक महायुद्धानंतर( १९१८) भारतातील दक्षिणेकडील एका नगरात घडणाऱ्या घटना आहेत आणि दुसरे महायुद्ध संपल्यानंतरचा (१९४५) लंडन शहरातील सुमारे वीस वर्षांचा काळही कथानकात सामावलेला आहे.
कथानकाच्या केंद्रस्थानी श्रीनिवास नावाचा सुविद्य दक्षिण भारतीय ब्राह्मण गृहस्थ आहे.ही म्हटलं तर श्रीनिवासची जीवनगाथाच आहे.श्रीनिवासच्या कुमार वयापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंतचा जीवनप्रवास कथानकात पुढेमागे हलणाऱ्या लंबकासारखा काळाच्या पातळीवर मागे-पुढे झोके घेत राहतो.कथानकाची सुरूवात लंडनस्थित वयस्क श्रीनिवासने त्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉ.रॅडक्लिफकडे जाण्याच्या प्रसंगापासून होते. तर शेवट श्रीनिवास मृत्यू पावला आहे असे डॉ.रॅडक्लिफने जाहीर करणे आणि त्याच्या मृत्यूला आपण सगळे जबाबदार आहोत अशी टिप्पणी करणे या घटनेने होतो.
पहिली घटना आणि शेवटची घटना यादरम्यान दोन-तीन वर्षांचा काळ गेला असावा. पण या दोन-तीन वर्षांतील घटनांचा पट मांडताता कथकाने श्रीनिवासच्या गतआयुष्यातील साधारण पन्नास वर्षांचा कालपट वाचकांसमोर उलगडला आहे.आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर श्रीनिवासने माणसांतील क्रौर्य अनुभवले आहे. सभोवती दिसणाऱ्या भयावह हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आपले स्थान काय ? असा प्रश्न श्रीनिवासला सतावतो. आपल्यासारख्या अहिंसक, कोणाच्याही अध्यातमध्यात नसणाऱ्या सहिष्णू माणसाला या क्रूर जगात कुठेही स्थान उरलेले नाही या श्रीनिवासला झालेल्या खोल अशा दुःखद जाणीवेच्या धक्क्यामुळे त्याचा झालेला मृत्यू वाचकांच्या मनाचा ठाव घेतो.
श्रीनिवासचा जन्म दक्षिण भारतातील एका नगरात ब्राह्मण कुटुंबात झाला आहे. त्याच्या आजोबांनी अतीशय कष्टाने नगराबाहेरील एका टेकडीवर सागाची अनेक झाडे लावली आहेत, जोपासली आहेत.अत्यंत स्वाभिमानाने जगणारा हा ब्राह्मण ब्रिटीशांच्या राजवटीत रस्ता बांधण्यासाठी त्याच्या सागवान वृक्षांची ब्रिटीश अधिकाऱ्यांनी निर्दयपणे केलेली कत्तल पाहतो,श्रीनिवासही तेव्हा आजोबांबरोबर असतो. आपण आजवर प्रेमाने जोपासलेल्या झाडांची हत्या सहन न झाल्याने श्रीनिवासचे आजोबा मरण पावतात. त्यांचा पुत्र नारायण म्हणजे श्रीनावासचे वडील कुटुंबातील कर्ता पुरूष होतात.ते उच्चशिक्षित आहेत.ब्रिटीशांनी नगरात स्थापन केलेल्या महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. त्यांना त्यांच्या ब्रिटीश वरिष्ठांकडून सतत मानहानी सहन करावी लागते. त्यांची योग्यता असतानाही त्यांना महाविद्यालयातील अधिकारपदी बढती दिली जात नाही. स्वातंत्र्य चळवळ सुरू झालेली असूनही ब्रिटीश सरकारच्या नोकरीत असल्याने नारायणला ब्रिटीशांविरूद्ध चीड व्यक्त करण्याची हिंमत दाखवता येत नाही. त्यांच्याच शेजारी राहणारे कुटुंब मात्र स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभागी होते. त्या कुटुंबातील कर्ता पुरूष चळवळीत भाग घेतल्याने तुरूंगात जातो तर श्रीनिवासच्याच वयाचा वासुदेव भूमीगत राहून चळवळीला मदत करत असताना मारला जातो. वासुदेवचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ श्रीनिवासवर येते.त्यामुळे श्रीनिवास मूळापासून हादरतो. तोपर्यंत शांतपणे अभ्यास करणाऱ्या व उच्चशिक्षण घेऊन वडीलांप्रमाणेच प्राध्यापक आणि नंतर विद्यापीठाचा कुलगुरू होण्याची स्वप्ने पाहणारा श्रीनिवास बदलत्या परिस्थितीने अस्वस्थ होतो. ब्रिटीश सरकारकडून परीक्षेतील यशाबद्दल त्याला मिळालेले सुवर्ण पदक तो परत करतो. त्याचे वडील नारायण देखील हिंमत करून खादीचे कपडे वापरू लागतात.वासुदेवची बहीण वसंता हिच्याशी श्रीनिवासचे लग्न ठरलेले असते. ब्रिटीश अधिकारी श्रीनिवासच्या घरात घुसून वसंताचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा श्रीनिवास त्यांच्यावर तुटून पडतो. त्याची शिक्षा म्हणून त्याला काही काळ तुरूंगवास होतो. त्याच्या वडिलांनी महाविद्यालयाच्या पदवीदानसमारंभात ब्रिटनचे राष्ट्रगीत सुरू असताना भारतीय भाषेत मंत्र म्हटल्याने त्यांना वेड लागले आहे असे जाहीर करून ब्रिटीश अधिकारी त्यांना वेड्यांच्या इस्पितळात ठेवतात.
या सगळ्या घटना घडत असताना श्रीनिवासचे उच्चशिक्षणच नव्हे तर त्याचे शांतपणे जगणेही हळहळू कठीण होत जाणार आहे याचे भान येऊन श्रीनिवासचे वडील श्रीनिवासला भारत सोडून परदेशात जाण्याचा सल्ला देतात. वडिलांचा महाविद्यालयातील हक्क डावलणारा ब्रिटीश अधिकारीच श्रीनिवासला ब्रिटनला जाण्यासाठी मदत करतो. जाण्यापूर्वी श्रीनिवासचे वसंताशी लग्न लावून दिले जाते.
श्रीनिवास लंडनमध्ये स्वतःचे मसाल्याचे दुकान सुरू करतो. भारतीय मसाले तो लंडनमध्ये विकू लागतो. त्याचा जम बसल्यावर तो वसंताला लंडनमध्ये आणतो. त्यांना लक्ष्मण आणि शेषू असे दोन मुलगे होतात. जे स्वाभाविकच लंडनमधील शाळा-महाविद्यालयांत शिकतात. वसंता भाड्याच्या घरापेक्षा स्वतःचे घर घेण्याचा आग्रह धरते आणि श्रीनिवास लंडनमध्ये एक जुना बंगला विकत घेतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याला तो स्वस्तात विकत घेता येतो.आता आपण पुरते ब्रिटीश झालो असे श्रीनिवास मानू लागतो.ब्रिटीशांची सभ्यता, व्यक्तीस्वातंत्र्य त्याला आवडू लागते.ब्रिटीशांसारखे कपडे तो वापरू लागतो.वसंता मात्र आपला नऊवारी साडीचा वेष , लांबसडक केसांचा आंबाडा आणि अंगठा असलेली चप्पल ही वैशिष्ट्ये सोडत नाही.तिची इंग्रजी भाषाही जेमतेम आणि दाक्षिणात्य वळणाची राहते.मात्र भारतातल्यापेक्षा लंडनमध्ये ती अधिक धिटाईने वावरते. श्नीनिवास-वसंता आणि मुलांचे सुखी समाधानी कुटुंब आहे. त्यांच्या वस्तीतील मिसेस फ्लेचर आणि मिसेस ग्लास या स्त्रिया श्रीनिवास आणि वसंताकडे हिणकस नजरेने पाहत राहतात.आपल्या काचेच्या घरांत बसून या भारतीय कुटुंबाबद्दल,त्यांच्या राहणीबद्दल त्या कुचाळक्या करत राहतात.
आपले स्वतःचे घर झाले म्हणून वसंता सुखावते.या घराला दोन मजले आहेत. पुढे आपली मुले लग्न करतील आणि त्यांना आपण घराचा एकेक मजला देऊ,सगळे आनंदाने एकत्र राहतील असे तिला वाटते आहे. पण त्याच सुमारास ब्रिटीश सरकार सर्व तरूणांना सैन्यात भरती होण्याचा आदेश देते. लक्ष्मण आणि शेषू दोघांनाही ब्रिटीश सैन्यात भरती व्हावे लागते.आपली मुले निरपराधींच्या हत्येत सहभागी होत आहेत हे संवेदनशील वसंताला आवडत नाही. श्रीनिवास व वसंता वस्तीतल्या अनेकांना बॉंबहल्ल्याच्या वेळी आपल्या तळघरात जागा देतात.वसंता तर जमलेल्या लोकांना थंडीपासून संरक्षण म्हणून स्टोव्हवर चहादेखील करून देते. कुचाळक्या करणाऱ्या स्त्रियांच्या मनातही या स्थलांतरीत भारतीयांच्या माणुसकीच्या प्रत्ययामुळे आदर निर्माण होतो.
युद्धकाळात शेषू जो केवळ वीस वर्षांचा आहे तो लढाऊ विमानाचा वैमानिक म्हणून काम करतो. निरपराध लोकांवर बॉंबचा मारा करत राहणे त्यालाही मनोमन पटत नाही. अखेरीस भित्रा म्हणून त्याची लष्करी सेवा संपवली जाते. घरी परत आल्यावर शेषू लंडनमध्ये बॉंबस्फोटामुळे लागणाऱ्या आगीमधून लोकांना वाचवण्यासाठी रूग्णवाहिका चालवत असताना आगीत होरपळून मरण पावतो. लक्ष्मण युद्धानंतर नोकरीनिमित्त आई-वडीलांपासून दूर जातो आणि तिथेच एका ब्रिटीश मुलीशी विवाह करून राहू लागतो. लक्ष्मणला मुल होते. वसंताला आपल्या नातवाचे संगोपन,कोडकौतुक करायची इच्छा असूनही लक्ष्मण ‘घर लहान आहे तू इथे येऊ नकोस’ असे वसंताला कळवतो.शेषूचा अकाली मृत्यू आणि लक्ष्मणचे दुरावणे यामुळे वसंता खचते आणि क्षय रोग तिला गाठतो.तिचे सुखी-समाधानी एकत्र कुटुंबाचे स्वप्न विदीर्ण होते.भारतात परत जावे असे तिला वाटू लागते पण आता तिथेही बांधून ठेवणारी नाती राहिली नाहीत या दुःखाने ती व्याकूळ होते. याच अवस्थेत तिची अखेर होते.
वसंताच्या मृत्यूनंतर श्रीनिवास अगदी एकटा पडतो. दुकान चालवण्यासाठी उत्साह त्याला वाटत नाही. घराची सगळी घडी विस्कटते.याकाळात त्याचा मुस्लीम मित्र अब्दुल त्याला धीर देण्याचा प्रयत्न करतो पण श्रीनिवासला जीवनात रस वाटत नाही. अशा परिस्थितीत योगायोगाने बागेत फिरायला गेलेल्या श्रीनिवासची आणि घटस्फोटीत,निराधार अशा वृद्ध मिसेस पिकरींगची भेट होते. मिसेस पिकरींग एकेकाळी नर्स असते आणि तिच्या दयाळू वागण्याने श्रीनिवासला जगण्यात रस वाटू लागतो. मिसेस पिकरींगला कोणताच आधार नसल्याने श्रीनिवासचा आधार तिलाही दिलासादायक ठरतो. श्रीनिवास मिसेस पिकरींगसोबत एकत्र राहण्याचे ठरवतो.त्याच्या मुलाला याचा थोडा धक्का बसतो,घरावरचा आपला हक्क आता जाईल की काय याची भीती त्याला आहे. पण यापुढे वडिलांची काळजी घेण्यासाठी आपल्याला वारंवार लंडनला यावे लागणार नाही याचे त्याला बरेही वाटते.
मिसेस पिकरींग आणि श्रीनिवास यांचे सहजीवन परस्परांच्या छोट्या-मोठ्या भिन्न संस्कारांना,स्वभावांना स्वीकारत समाधानाने पुढे जात असते.दोघांच्याही मनातील मानवजातीबद्दलची नितांत करूणा हा त्या दोघांना घट्ट बांधून ठेवणारा धागा ठरतो. त्यांच्या वस्तीतील काही तरूणांना मात्र हे शांत समाधानी सहजीवन पाहावत नाही.विशेषतः वस्तीतील मिसेस फ्लेचर यांचा मुलगा फ्रेडचे मन कृष्णवर्णीय आशियाई व आफ्रिकन स्थलांतरीतांबद्दल विद्वेषाने भरलेले आहे. ऑस्ट्रेलियात नोकरीसाठी जाऊन तिथून अपमानीत होऊन परत आल्यावर फ्रेडने असा गैरसमज करून घेतलेला असतो की इंग्लंडमध्ये त्याला नोकरी न मिळण्याचे कारण हे स्थलांतरीत कृष्णवर्णीय व आशियाई लोकच आहेत. हे लोक आपल्या नोकऱ्या हिसकावतात व स्वतः श्रीमंत होतात असा ग्रह त्याने करून घेतला आहे. या पूर्वग्रहातून तो श्रीनिवासकडे पाहतो आणि हा वृद्ध माणूस ब्रिटीश वस्तीत राहण्यास योग्य नाही असा अपप्रचार तो करू लागतो. कधी मिसेस पिकरींग ही गोरी बाई श्रीनिवासबरोबर राहते हे त्याला पटत नाही, या बाईचा श्रीनिवास गैरफायदा घेत आहे आणि आपला स्वार्थ साधून झाला की तो तिला बाहेर काढणार आहे असे फ्रेड लोकांमध्ये पसरवतो.
दरम्यान डॉ.रॅडक्लिफ यांनी श्रीनिवासला कुष्ठरोगाची लागण झाल्याचे निदान केले आहे. श्रीनिवास तसे मिसेस पिकरींगला सांगतो आणि आपल्या घरातील भाडेकरूंना आपल्यामुळे संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना एक महिन्यात घर रिकामे करण्याची सूचना देतो. फ्रेड त्याबद्दलही गैरसमज पसरवतो. मिसेस पिकरींग श्रीनिवासला दिलासा देते की कुष्ठरोगावर इलाज आहेत आणि त्याला झालेली लागण बरी होऊ शकते. पण श्रीनिवासने आपला आजार खूपच मनाला लावून घेतला आहे. कुठूनतरी फ्रेडला श्रीनिवासच्या आजाराची माहिती कळते आणि आधीच श्रीनिवासबद्दल त्याच्या मनात असणाऱ्या चिडीमध्ये घृणेचीही भर पडते. श्रीनिवास हा वस्तीला धोकादायक आहे असा प्रचार करण्याचा धडाका फ्रेड लावतो. श्रीनिवासने वस्ती सोडून जावे म्हणून फ्रेड आणि त्याचे बेकार साथीदार श्रीनिवासच्या घराच्या पायरीवर कधी विष्ठा आणून टाकतात तर कधी मेलेले उंदीर आणून टाकतात.
श्रीनिवास हे सगळे प्रकार सहन करून शांतपणे स्वच्छता करत राहतो. किंबहुना फ्रेडच्या या अशा डिवचण्याने श्रीनिवास आणखी निडरपणे त्याला सामोरा जाऊ लागतो. भारतात असताना आपण ब्रिटीशांचा अन्याय सहन केला नाही पण लंडनमध्ये आल्यावर आपण त्यांच्यात सामील होण्याच्या प्रयत्नांत भारतीयत्व हरवून बसलो याची जाणीव होऊन श्रीनिवास हेतूतः आपल्या आईने दिलेले धोतर नेसून रस्त्याने जातो. श्रीनिवास डॉक्टरकडे जात असताना फ्रेड त्याच्यावर पाळत ठेवतो.संधी मिळताच श्रीनिवासच्या डोक्यावर डांबर टाकून फ्रेड पळून जातो. सुदैवाने त्याच वाटेवरून जाताना रस्त्याच्या कडेला पडलेल्या जखमी श्रीनिवासला पाहून डॉक्टर रॅडक्लिफ तत्परतेने त्याच्या जखमांवर इलाज करतात आणि श्रीनिवास वाचतो. फ्रेडने आपल्याला मारले हे माहीत असूनही श्रीनिवास पोलिसांसमोर कोणाचेही नाव संशयीत म्हणून घेत नाही आणि फ्रेडला पोलिसांपासून वाचवतो.
फ्रेडच्या मनात असलेली श्रीनिवासबद्दलची असूया संपत नाही. तो रात्री-बेरात्री श्रीनिवासच्या घराजवळ घोटाळत राहतो. मुद्दाम टॉर्चचा प्रखर झोत श्रीनिवासच्या खिडकीवर मारून त्याला घाबरवत राहतो. श्रीनिवासच्या भेटीसाठी आलेल्या लक्ष्मणला धमकी देण्यासाठी फ्रेड आपल्या लहान मुलाला पढवून पाठवतो. लक्ष्मण आधी या धमकीने अस्वस्थ होतो पण अशा लोकांना आपण पुरून उरले पाहिजे असे तो ठरवतो.श्रीनिवासचा मुस्लीम मित्र अब्दुल यालाही फ्रेड आपल्या मुलाकरवी धमकीचा निरोप पाठवतो.संपूर्ण शहरात ठिकठिकाणी भिंतींवर,चौकाचौकांत स्थलांतरीतांबद्दल लिहिले गेलेले अपशब्द यामुळे सगळे वातावरणच दहशतीने झाकोळून जाते.
अखेरीस श्रीनिवासचे घर पेटवून देण्याची योजना करून फ्रेड श्रीनिवासच्या तळघरात शिरतो. तिथे श्रीनिवासने आश्रय दिलेला एक गरीब कृष्णवर्णीय रोजच्याप्रमाणे झोपण्यासाठी आलेला असतो. फ्रेड त्याच्याकडे दुर्लक्ष करून सगळ्या तळघरात रॉकेल टाकतो. लाकडे व रद्दी कागद रचतो आणि काडी पेटवतो. आग धुमसते पण ज्वाळा निघेपर्यंत थांबण्याच्या नादात फ्रेड देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडतो.कृष्णवर्णीय शांतपणे फ्रेडकडे पाहात राहतो पण त्याला मदत करत नाही.
लाकडे जळण्याच्या आवाजाने श्रीनिवास जागा होतो. घर जळते आहे याचे भान येताच त्याला शेषूची आवडती लेडिबर्ड किटकांसंबंधीची कविता आठवते. तो आपल्या खिडकीवर लेडीबर्ड किटकांनी केलेले घरटे आणि त्यातले किटक वाचवण्यासाठी खिडकी फोडतो. पोलीस आणि अग्नीशमन दल येते.डॉक्टर रेडक्लिफ ,लक्ष्मण आणि अब्दुल हा श्रीनिवासचा मित्रही तातडीने घटनास्थळी पोहचतात. ते श्रीनिवास आणि मिसेस पिकरींगला शिडीवरून खाली आणतात. तळघरात फ्रेड जळून खाक झालेला असतो. पण इथे शिडीवरून सहीसलामत खाली आणलेल्या श्रीनिवासनेही प्राण सोडलेले असतात.खरं तर, श्रीनिवासला आगीने कुठलीही इजा केलेली नसते पण आपला शांतपणे जगण्याचा हक्क नाकारला जातो आहे या ताणाने श्रीनिवास मरण पावतो. त्याच्या मृत्यूला आपण सगळे जबाबदार आहोत याची खंत आपल्याला वाटली पाहिजे असे डॉ.रॅडक्लीफ जमलेल्या गौरवर्णींयांना म्हणतात. मिसेस पिकरींग मात्र एकमेव व्यक्ती असते की जिने गौरवर्णीय असूनही शेवटपर्यंत श्रीनिवासवर मनापासून प्रेम केलेले असते, त्याची काळजी घेतलेली असते. श्रीनिवासएवढा शांत ,समाधानी माणूस आपण यापूर्वी कधीही पाहिला नव्हता असे गौरवोद्गार मिसेस पिकरींगच्या तोंडून निघतात.
म्हटलं तर ही कादंबरी श्रीनिवासची शोकांतिका आहे.विसाव्या वर्षी भारतातील ब्रिटीश राजवटीत पदोपदी होणाऱ्या मानहानीने वैतागून नाईलाजाने लंडनला स्थलांतरीत झालेल्या श्रीनिवासला भारतात प्रेमाची माणसे राहिलेली नाहीत. आणि आयुष्याची तीस-चाळीस वर्षे लंडनमध्ये राहूनही जर आपल्याला इथले लोक मनापासून स्वीकारत नसतील तर मग आपण अरत्र ना परत्र कुठलेच राहिलो नाही ही अगतिकतेची जाणीव मनाशी घेऊनच श्रीनिवासचे आयुष्य संपले आहे.
व्यापक दृष्टीने पाहिले तर ही कादंबरी ‘जगा आणि जगू द्या’ या वैश्विक तत्वाशी नाते सांगते. वस्तुस्थिती अशी आहे की सत्तास्पर्धा,अहंकार यामुळे हे वैश्विक तत्व पराभूत झाले आहे. त्याला कारण ठरणारी माणसातील हिंसक वृत्ती ही कोणत्या विशिष्ट धर्माची, वंशाची, पंथाची किंवा आर्थिक वर्गाची धारणा नसून व्यक्तीच्या मनातील अनैतिकतेने नैतिकतेचा केलेला तो पराभव आहे असे ‘दी नोव्हेअर मॅन’ ही कादंबरी सुचवते. नैतिकतेतून आलेले शांत समाधान, सहिष्णुता आणि अनैतिकतेतून आलेली अस्वस्थता, असमाधान, असहिष्णूता यांच्यातील संघर्ष आदीम आहे. हा संघर्ष मानवजातीला कुठे घेऊन जाणार आहे ? असहिष्णू द्वेषाच्या आगीत अनैतिक प्रवृत्तीचे लोक स्वतः तर जळून खाक होतीलच पण त्याचवेळी नैतिक वृत्तीच्या सहिष्णू माणसांचाही या संघर्षातून येणाऱ्या ताणामुळे अंत होईल.माणसातील चांगुलपणा, नैतिकता आणि माणुसकी जर अनैतिकतेपुढे गतप्राण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली तर हे जग कोणाच्याही जगण्यालायक तरी राहील का? असा अस्वस्थ करणारा प्रश्नच जणू ही कादंबरी वाचकांच्या मनात उभा करते.
भांडवलशाहीचा विकास आणि साम्राज्यवाद याचा परिणाम म्हणून जगभरात स्थलांतरे होणे अपरिहार्य आहे.मग ती खेड्यांतून शहरात असतील की एका देशातून दुसऱ्या देशात असतील.जीव जगवण्यासाठी किंवा अधिक चांगले राहणीमान हवे म्हणून माणसे स्थलांतर करतच राहणार आहेत. अशा परिस्थितीत माणसांची मने व्यापक आणि वृत्ती सहिष्णू, स्वीकारशीलतेचीच असली पाहिजे. लोकशाही हीच मूल्ये जोपासते.पण प्रत्यक्ष वर्तनात माणसे ती आणतील तर ना ….काळाच्या ओघात माणसाने प्रगल्भ होऊन विवेकाने आपापसातील द्वेष संपवला पाहिजे, संघर्ष निकाली काढले पाहिजेत. प्रत्येकाचा -यामध्ये संपूर्ण जीवसृष्टी देखील आली, जगण्याचा हक्क मान्य केला पाहिजे.पण आजच्या काळातही जगातील कित्येक प्रदेश,कित्येक निष्पाप माणसे युद्धाच्या,दंगलींच्या आगीत होरपळत आहेत.माणसाच्या वृत्तीतील द्वेष, हिंसकता संपत नाही तोपर्यंत जग अशांत,असुरक्षितच राहणार आहे .एवढेच नव्हे तर माणसाचा प्रचंड हव्यास आणि द्वेष याचा परिणाम पर्यावरणावर,जीवसृष्टीवरही झाला आहे. आपणच सर्वेसर्वा असे मानणाऱ्या माणसाने स्वतःबरोबर अन्य जीवांचे जगणेही धोक्यात आणले आहे.’दी नो व्हेअर मॅन’ या कमला मार्कंडेय यांच्या कादंबरीत या सर्वच गोष्टी सूचकतेने येतात. ही कादंबरी कडेलोटाकडे निघालेल्या संपूर्ण मानवजातीची शोकांतिकाच दर्शवते आहे असे म्हणावे लागेल.
‘दी नोव्हेअर मॅन’ या कादंबरीच्या या कथानकाबद्दल तुम्हाला काय वाटते हे जाणून घ्यायला मला आवडेल. पुढील ब्लॉगमध्ये या कादंबरीतील काही अंशाच्या (भाषांतरीत) कादंबरीचे पूर्वावलोकन आपण करू. हेतू अर्थातच वाचकांच्या मनात मूळ कादंबरी वाचण्याची प्रेरणा निर्माण करण्याचा असेल.
-गीता मांजरेकर
********************************************************************************************************************************

यावर आपले मत नोंदवा