मागील ब्लॉगमध्ये आपण कमला मार्कंडेय यांच्या ‘अ सायलेन्स ऑफ डिझायर’ या कादंबरीचे कथानक आणि कथासूत्र लक्षात घेतले. आता या ब्लॉगमध्ये आपण या कादंबरीचे पूर्वावलोकन (Preview) करणार आहोत. तसे करताना कादंबरीतील काही अंशांच्या (भाषांतरीत) आधारे मी या कादंबरीचा कथक (Narrator) तत्कालीन समाजदर्शन कसे घडवतो आहे हे स्पष्ट करत जाणार आहे. तसेच कथानक पुढे नेताना कथकाने कोणते तंत्र वापरले आहे आणि विशिष्ट भाषाशैलीचा वापर कथक का करतो आहे हेदेखील स्पष्ट करणार आहे. या प्रकारचे कादंबरीचे पूर्वावलोकन हे वाचकांना मूळ इंग्रजी कादंबरी वाचनाकडे आकृष्ट करेल अशी आशा आहे.सोबत या ब्लॉगमधील लेखन ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी ऑडिओ फाईल जोडली आहे.
कथनमीमांसाः
कोणत्याही कादंबरीत कथासूत्र- कथानक – कथक यांच्या परस्परसंबंधातून एक संरचना लेखकाने हेतूतः निर्माण केलेली असते.मागील ब्लॉगमध्ये आपण ‘अ सायलेन्स ऑफ डिझायर’ या कादंबरीचे कथासूत्र आणि कथानक लक्षात घेतले. आता आपण या कादंबरीतील कथक कशाप्रकारे कथानक पुढे नेतो, त्यासाठी तो कथनात कोणत्या क्लृप्त्या करतो या अंगाने ‘अ सायलेन्स ऑफ डिझायर’ या कादंबरीच्या पहिल्या प्रकरणातील कथानाचे विश्लेषण करणार आहोत.
कोणत्याही कादंबरीतील कथनाची सुरूवात कशी केली जाते हे पाहणे रोचक ठरते. ‘अ सायलेन्स ऑफ डिझायर’ या कादंबरीतील कथनाची सुरूवात थेट होते. सुरूवात आकर्षक करण्याचा अट्टाहास कथकाने केलेला नाही.
कादंबरीच्या कथानकाला काळ आणि अवकाशाचे परिमाण असते. आणि कथकाला ते आपल्या कथनातून वाचकांच्या मनात प्रस्थापित करावे लागते. ‘अ सायलेन्स ऑफ डिझायर’ या कादंबरीच्या पहिल्याच प्रकरणातील पहिल्या दोन ओळीत कथक कथानकाचा अवकाश प्रस्थापित करण्यासाठी कसे वर्णन करतो ते पहा. हे केवळ अवकाशाचे वर्णन नाही तर त्यातून कथानकातील दांडेकर या प्रमुख व्यक्तिरेखेची जीवनदृष्टीही वाचकांच्या मनावर ठसेल याची दक्षता कथकाने घेतली आहे.
“त्यांच्या सहा भाड्याच्या खोल्या ज्या चाळीत होत्या , त्या चाळीच्या मधोमध एक चौकोनी आवार होते.साधारण आठ फुटाच्या या आवाराची जमीन सिमेंटचा गिलावा दिलेली पण खडबडीत होती.आणि या आवाराच्या मधोमध त्याची बायको जिची रोज पूजा करी ती पवित्र तुळस होती. ते तुळशीचे एक सदाहरीत रोपटे होते , एका चकचकीत,शोभेच्या पितळी कुंडीत ते अशक्त रोपटे कसेबसे कोंबलेले होते.मात्र त्याच्या उग्र गंधामुळे त्याचा स्वतःचा म्हणून एक तोरा होता ज्यामुळे त्याच्या अशक्त रूपाकडे फारसे कुणाचे लक्ष जात नसे.असा गंध की जो तळव्यांना चिकटून राही, आणि तुम्ही तुळशीची पूजा करत नसलात तर अगदी तळवे घासून धुतले तरी तो गंध पाठलाग करे.दांडेकर तुळशीची पूजा करत नसे.तुळस हे एक झाड आहे आपण झाडाची पूजा करत नसतो तर ते झाड ज्याचे प्रतीक आहे अशा ईश्वराची पूजा करत असतो असे दांडेकर जाणीवपूर्वक सांगत असे. आणि देवाची प्रतीके जरूर असावीत कारण कोणत्याही माणसाकडे देवाचे खरे रूप प्रत्यक्ष पाहण्याची शक्ती किंवा हिंमत नाही असे दांडेकरचे मत होते.”

हिंदू धर्मात निर्गुण-निराकार विश्वचैतन्य निसर्गातील प्रत्येक घटकात असते असे मानले जाते. तसे मानताना वड,केळ,तुळस यासारख्या झाडा-झुडपांच्या मिथक प्रतिमा किंवा प्रतीके बनवली गेली आहेत. त्यामागे काही मिथक कथा आहेत.पण बहुसंख्य लोक त्या मिथकांचे गर्भित अर्थ लक्षात न घेता त्या मिथक प्रतिकांना देवत्व बहाल करतात हे कथकाला सुचवायचे आहे.म्हणून तो चाळीच्या आवारातील तुळशीच्या रोपाचे केवळ वर्णन करून थांबत नाही तर काहीशी घाई करून तो दांडेकर या कथानकातल्या मुख्य व्यक्तिरेखेला प्रस्थापित करण्याआधीच त्याच्या मिथकप्रतिकांबद्दलच्या मताचा आवर्जून उल्लेख करतो. दांडेकरचे श्रद्धाळू असणे आणि त्या श्रद्धेबद्दल त्याची विवेकी दृष्टी याबद्दल वाचकाला या वर्णनातून कळते.
कथानकात पुढे हिंदू धर्मीयांच्या मर्तिपुजेची कल्पना आणि ख्रिस्ती धर्मियांची ईश्वरपूजेची कल्पना यातील फरक दांडेकरच्या कार्यालयातील चर्चेच्या संदर्भाने कथक सांगतो.पण त्याबरोबरच विशेषतः हिंदू स्त्रियांची प्रतीकांवरील श्रद्धा,भक्ती याबद्दलही कथक दांडेकरच्या पत्नीच्या संदर्भाने काही निरीक्षणे मांडतो.त्यातून दांडेकरच्या पत्नीची मतेही वाचकांपर्यंत पोहचतात. तो म्हणतो-
“दांडेकर ज्या सरकारी कार्यालयात नोकरी करत होता तिथेही तो आपले हे मत आवर्जून मांडत असे. तिथे काही कारकून मंडळी ख्रिस्ती धर्मीय होती,ते भारतीय ख्रिश्चन होते त्यांनी धर्मांतर केले होते. ते आवेशाने सांगत की ईश्वराची पूजा आणि मूर्तिपूजा यात फरक आहे. त्यांच्या मते गाय, साप, झाडे यांची गणना ईश्वराच्या प्रतिमेत होऊ शकेल मात्र चित्र, छापिल चित्र आणि पुतळे यांची गणना ईश्वरी प्रतिमा म्हणून होऊ नये. त्यांचे म्हणणे दांडेकरला संतप्त करे.आपल्या मुलांना या बाबतीत ज्ञान देण्यासाठी तो कसोशीने प्रयत्न करत होता आणि बायकोलाही शिकवू पाहात होता. त्याच्या बायकोला हे कळत नसे असे नाही .खरं तर तिचे धार्मिक संस्कार दांडेकरपेक्षा अधिक निष्ठेचे होते आणि दांडेकरला त्याचे काहीसे कमी जिव्हाळ्याचे अन्यधर्मीय मित्र धर्माबद्दल जे कूट प्रश्न विचारत त्यांची तिच्याकडे नेहमीच उत्तरे होती.पण जोपर्यंत दांडेकर विचारत नाही तोपर्यंत ती तिच्याकडची उत्तरे कशी देणार. तेव्हा तिला तुळस हे झाड आहे हे कळत नव्हते असे नाही पण तिला कधीकधी त्याचा विसर पडे आणि तुळशीची देखभाल ती एका भक्तीभावाने करू लागे.पण दांडेकरला हे मान्य करावे लागे की तुळशीची एक रोपटे म्हणून काळजी घेणे आणि तुळस एक प्रतीक म्हणून त्याबद्दल आदर दाखवणे यामधला भेद खूप सूक्ष्म आहे.पण कधीकधी दांडेकरची बायको तुळशीचे थोडे जास्तच स्तोम माजवे.”
ईश्वर अमूर्त आहे हे दांडेकर जाणून होता पण मूर्तीपुजेची प्रथा त्याच्या संस्काराचा भाग होती आणि तेच संस्कार आपल्या मुलांवर देखील तो करत होता.मुर्ती आणि त्यातील देवत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे तो आपल्या पत्नीलाही समजावून सांगत असे. जे तिला कळत असे पण तरीही ती अधिक भाविक असल्याने तुळशीची एक झाड म्हणून देखभाल करता करता ती नकळत तुळशीला देवत्व देऊन तिची पुजा करत असे हे वरील वर्णनाआधारे कथक स्पष्ट करतो. थोडक्यात कथनातील मूळ मुद्दा श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्यातील अंधूक सीमारेषेचे महत्त्व समजावून देण्याचा आहे.
कथकाने पुढे दांडेकरच्या आर्थिक स्तराबद्दल सांगितले आहे. अर्थातच ते कथनातून अप्रत्यक्षपणे सामोरे येते.दांडेकर खालच्या आर्थिक स्तरातून हळूहळू नोकरीत बढती मिळत गेल्याने वरच्या स्तरात कसा आला आहे हे कथक मार्मिक भाषेत सांगतो.तसे करताना भारतीय मध्यमवर्गाय पुरूषांच्या सुखी संसाराच्या आकांक्षा आणि विशेषतः स्त्रियांच्या बचतीबद्दलच्या धारणा याबद्दल एक प्रातिनिधिक चित्र कथक उभे करतो ते असे-
“आवार खुले होते आणि आवाराच्या वर निळेभोर, लख्ख आकाश दिसे. पण चाळीच्या इतर कोणत्याही घरांतील खोल्यांतून आकाश दिसत नसे.अपवाद फक्त अगदी वरच्या मजल्यावरील खोल्यांचा.दांडेकरचे डोळे चाळीच्या आठही मजल्यांवरून फिरत. हे सर्व मजले त्याला अगदी जवळून माहित होते कारण तो आणि नंतर त्याची बायको, मुलेही प्रत्येक मजल्यावर आळीपाळीने राहिली होती. एक एक मजला खालीखाली येताना तळमजल्यावरच्या आरामदायी खोल्या मिळाल्यावर जणू तो चाळकरी म्हणून पदवीधर झाला होता.
इथे त्याला आवाराचा उपभोग घेता येत होता आणि कोपऱ्यातल्या नळावर पहिला नंबर मिळत होता.इतर भाडेकरूही तोच सार्वजनिक नळ वापरत असत पण दांडेकर कुटुंबाची सोय आधी पाहिली जाई. होय , दांडेकरची हळूहळू भरभराट झाली होती.तीन मुले, कोणतेही कर्जाचे ओझे नाही, सुस्थिर नोकरी, बऱ्यापैकी बचत जी दांडेकरच्या बायकोने व्यवस्थित , शिस्तशीरपणे स्वतःसाठी सोन्याच्या बांगड्या,हार,कर्णफुले असे दागिने बनवून रूपांतरीत केली होती. तिला दागिन्यांची हौस होती असे नाही पण एक सुरक्षितता म्हणून ती दागिन्यांकडे पाही.सोन्याचे मोल स्थिर होते. आणि सोन्याचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी अर्थव्यवस्थेत किती संस्था कार्यरत असतात हे कळले असते तर दांडेकरांना नक्कीच अचंबा वाटला असता पण त्यांनी त्याला मान्यताही दिली असती.कारण शहरी माणसांनी सोने नाही तर दुसऱ्या कशावर विश्वास ठेवायचा ? जमीन हा दुसरा पर्याय होता पण शहरांत जमीन विकत घेणे खूपच महागाचे होते. एकदा तरूण आणि वेड्या वयात असताना, लग्न झाल्याझाल्या दांडेकर त्याच्याहीपेक्षा लहान असणाऱ्या बायकोला म्हणाला होता की ही चाळ आपण विकत घेऊ.पण जेव्हापासून त्याला वास्तवाचे भान आले होते तेव्हापासून तो तसं म्हणू शकला नव्हता.सरोजिनीला, दांडेकरच्या बायकोला मात्र त्या लहान वयातही वास्तवाचे भान होते असे म्हणावे लागेल कारण ती दांडेकरला उत्सुकतेने म्हणाली होती की सातव्या मजल्यावरच्या खोल्या भाड्याने मिळाल्या तरी बरे होईल. खालच्या नळावरून आठ मजले वर पाणी भरून आणताना स्वर्ग आठवतो.त्यात एक मजला कमी चढावा लागला तरी फरक पडेल.आता सरोजिनीला पाणी भरण्याचे काम करावे लागत नव्हते. दांडेकर आता वरिष्ठ कारकुन झाला होता आणि त्यांनी एक मोलकरीण मुलगी ठेवली होती.आपण आपल्या बायकोसाठी एवढे करू शकलो या भावनेने दांडेकरला बऱ्यापैकी सुख मिळत होते.”
दांडेकर थोडा कल्पनारंजन करणारा असला तरी त्याची पत्नी मात्र तशी नव्हती तर ती वास्तवाचे भान असणारी होती असे कथक वरील वर्णनातून स्पष्ट करतो आहे हे जाणवते.अन्य अनेक मध्यमवर्गीय महिलांसारखी सरोजिनी नवऱ्याकडून नाहक अपेक्षा आणि भौतिक गोष्टींसाठी हट्ट करत नव्हती मात्र काटकसर करून ती भविष्यातील शाश्वततेची काळजी जरूर घेत होती असे कथकाला सुचवायचे आहे. पुढे कथकाने मध्यमवर्गीय गृहकृत्यदक्ष महिला आणि एक नवऱ्याला हवे ते शारीरसुख देणारी पत्नी म्हणून दांडेकरची पत्नी सरोजिनी हिची व्यक्तिरेखा वाचकांच्या मनावर ठसवली आहे.तो म्हणतो..
“सरोजिनी खरंच चांगली पत्नी होती. मुलांशी नीट वागणारी,उत्तम स्वयंपाक करणारी,घरादाराची काळजी घेण्यात वाकबगार, दांडेकरच्या वैवाहिक जीवनाच्या पंधरा वर्षे झाली तरी ती अजूनही त्याला सुख देत होती. तिच्या प्रतिसादाची उब कमी झाली असली तरी त्याच्या मागण्यांना ती न चुकता मूकसंमती देत आली होती.त्याबाबतीत आपण भाग्यवानच आहोत हे त्याला त्याच्या सहकाऱ्यांच्या कुजबुजत्या अर्धवट बोलण्यातून कळले होते. त्यांच्या बायका पुढच्या दिवसाच्या कामाच्या विचारात , परत एक मुल होईल म्हणून ,झोपेची खोटी कारणे देत,आजारपणाचे बहाणे करत आणि एक ना अनेक कारणे सांगून थोड्या कोरडेपणानेच वागत.त्यामुळे हे पुरूष बायकांच्या या दुष्ट वागण्याने दुबळे पडत. सरोजिनी मात्र दांडेकरला जेव्हा पहिजे तेव्हा लाघवीपणे जवळ येई ,तिने कधीच वेगळे आचरण केले नसल्याने तिच्या प्रेमातील आवेग,उत्कटता कमी झाल्याबद्दल दांडेकरला काही कमतरता जाणवत नसे.त्याला वाटे ती बहुतेक गोष्टी आपुलकीने,प्रेमाने करते. आणि या तिच्या शांतपणामुळे दांडेकरचा दैनंदिन व्यवहार त्याला स्वाभाविकपणे हव्या असलेल्या नेटकेपणाने, व्यवस्थित, नियमीतपणे सुरळीत पुढे जात होता.”
कथकाने पुढे जो प्रसंग रंगवला आहे त्याला संवाद आणि वर्णनामुळे दृक-श्राव्य परिमाण मिळाले आहे आणि त्यामुळे तो प्रत्ययकारी झाला आहे. या प्रसंगाचे वर्णन करताना कथक रितीभूतकाळ वापरतो.त्यातून त्या घटनांत असणारी वारंवारता, नियमितता कथकाला सुचवायची आहे. सरोजिनीने नित्यनेमाने उत्तम स्वयंपाक करणे ,दांडेकरच्या कार्यालयात जाण्या-येण्याच्या वेळा सांभाळून त्याच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष पुरवणे,त्याची रसना तृप्त करणे हे दांडेकरचा अहंकार सुखावणारे, त्याच्यात जगण्याची ऊर्मी वाढवणारे, आत्मविश्वास वाढवणारे आहे हे कथक सुचवतो. दांडेकरच्या संसारात स्वास्थ्य टिकवण्यात सरोजिनीचा असलेला अनन्यसाधारण सहभाग कथकाला अधोरेखीत करायचा आहे.दांडेकरचे अनेकार्थाने सरोजिनीवर अवलंबून असणे, तिची निष्ठा गृहीत धरणे आणि त्या गृहितकाला धक्का बसताच त्याने दयनीय होणे या प्रसंगातून स्पष्ट होते.दांडेकर स्वभावाने दुष्ट नाही पण सरोजिनीच्या अनुपस्थितीने आणि त्याच्यासाठी पूर्णब्रह्म असणारे अन्न वेळेवर न मिळाल्याने त्रस्त झालेल्या दांडेकरची आपल्या मोलकरणीकडे पाहण्याची वृत्तीही असहिष्णूतेची झाली आहे हेदेखील या प्रसंगातून जाणवते.तो प्रसंग आपण पाहू…
“वानगी दाखल आता तिने आवारात त्याच्या पावलांचा आवाज ऐकला की इकडे बटाट्याचे काप कढईत टाकलेले असत. त्या तळणीचा सुखावणारा चुर्र असा आवाज त्याचे हातपाय धुवून ,कपडे बदलून होईपर्यंत विरत नसे. तोपर्यंत सरोजिनी स्वतःही त्याच्यासाठी तय्यार झालेली असे आणि संध्याकाळचा स्वयंपाकही सज्ज असे.तो नेहमीच यासाठी तयार असे कारण दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळी सातपर्यंत मध्ये बराच काळ उलटून गेलेला असे. मधल्या काळात त्याला शिपायाने बाहेरच्या ठेल्यावरून एक पाणीदार कॉफी तेवढी आणून दिलेली असे.
जेवणाच्या विचाराने दांडेकरचे पोट जणू उचंबळून येई.त्याला वाटे ही भूक एक सुखद संवेदना आहे मात्र पुढे जेवण मिळणार याबद्दल निश्चिंती असेल तरच.आताही तो आला, त्याने आपल्या चपला बाजूला टाकल्या आणि तो वेगाने नळाकडे गेला, आपले हातपाय,चेहरा त्याने अगदी काटेकोरपणे स्वच्छ धुतले, तोंडातील धुळीची चव त्याने चुळा भरून काढून टाकली आणि तो कपडे बदलायला गेला.तो आपले धोतर नेसत असताना त्याला जाणवले की काहीतरी चुकले आहे. स्वयंपाकघरातून कसलाच आवाज येत नाही आहे. त्याला दयनीय वाटले.अशी परिस्थिती त्याने कधी शब्दांत मांडलीही नव्हती पण बायकोची लगबग, तिचा स्वयंपाक होत असताना येणारे आवाज हे सगळे त्याच्यासाठी नेहमीच त्याच्या आगमनाचे घटक होते.
त्याने धोतर नेसले, ओल्या केसांवरून हात फिरवून ते नीट बसवले पुनश्च एक चक्कर त्याने आवारात मारली कारण कोणत्याच खोल्यांतून त्याला काही सादपडसाद ऐकू येत नव्हते आणि स्वयंपाकघर तर रिकामेच पडले होते.
चाळीच्या कोणत्यातरी भागातून त्याला आपल्या दोन मुलींचे भांडणाचे आवाज ऐकू येत होते. नक्कीच त्या चाळीच्या गच्चीवर असणार ..तीच त्यांची आणि आजूबाजुच्या अर्ध्याअधिक घरांतील मुलांची भेटण्याची आवडती जागा आहे त्याला वाटले.त्याने मुलींना हाका मारल्या पण त्या कुणाला ऐकू येण्याची आशा नव्हतीच. त्याने मोलकरणीला हाक मारली.पंधरा वर्षांची सुकलेली,अशक्त मुलगी होती ती आणि त्याच्या धाकट्या किरकिर करणाऱ्या, झोपेला आलेल्या मुलाला कडेवर घेऊन ती कुठूनशी अवतरली. त्याने मुलाच्या आवाजापेक्षा उंच असा आवाज चढवला.
“तुझ्या मालकीण बाई कुठे गेल्या ?”
मोलकरीण खिदळली .तिला ही एक सवयच होती.परिस्थितीनुसार ऐकणाऱ्याला कधी तिचे हे हसू सुखावणारे वाटे तर कधी वेडावणारे वाटे.
“बाईसाहेब बाहेर गेल्यात”
“बाहेर गेल्यात ते दिसतंच आहे मला पण कुठे गेल्या ?”
“बाईसायबांनी कायबी सांगितलं नाय”…परत एकदा ती मुलगी खिदखिदली
“चंद्रुबाबाला बघ म्हनून सांगायलंय”
“किती वाजता गेल्या आहेत त्या ?”
उत्तरादाखल त्या मुलीचे डोळे आसमंत न्याहाळू लागले आणि खिदळणे सुरूच राहिले. दांडेकरचा चेहरा मात्र कधीही वीज कडकडेल इतका क्रुद्ध झाला होता.त्याला आठवले की या मुलीला वेळ सांगता येत नाही. ती एक महामुर्ख आहे .काहीच माहीत नसलेली अडाणी.आपला राग त्याने त्या मुलीवर काढायला सुरूवात केली.
ही काय पद्धत झाली का तुझी चंद्रुबाबाला सांभाळायची त्याने आतापर्यंत निजायला पाहिजे होतं.बाईसाहेब एक संध्याकाळ तुझ्यावर जबाबदारी टाकून गेल्या आहेत आणि तू साधी चंद्रुला झोपवूदेखील शकली नाहीस .बघ किती थकलेला दिसतोय बाळ.बरोबच आहे या वेळेपर्यंत तू त्याला कडेवर घेऊन आहेस.
“चंद्रु बाबा त्रास दितोया सायब. आयेला हाका मारतुया सदा न कदा.झोपिवलं तर रडतू, माझी काय सुदीक चुकी नाही सायब ..” आणि आता बाळाच्या बरोबरीने ती मोलकरीणही रडू लागली.
“गप्प …तू आता त्याला पूर्णच जागा करशील ” …दांडेकर चिडून म्हणाला.विशेषतः बाळ झोपलं नाही तर रात्री आपल्याला झोपायला देणार नाही आणि रात्रभर रडत्या बाळाचं ओझं घेऊन फिरावं लागेल ही चिंता त्याच्या मनात होती. “ए आता ऐकतेयंस की नाही… गप बस पाहू” पण आता ती मुलगी हुंदके देत रडू लागली. काहीशी भयभीतही झाली होती ती चंद्रुला झोपवता न आल्याने.
“माझी काय चुकी नाय सायब ती आवंढा गिळत म्हणाली”, पण तिचे अश्रू आता अधिकच वाहू लागले आणि आपला ओला चेहरा एका हाताने पुसत , ती लाथा झाडणाऱ्या बाळाला कडेवरून खाली पडू न देता कशीबशी सांभाळत राहिली.किती अडाणी चेहरा आहे हा दांडेकरला वाटले.तो त्या मुलीकडे असहायतेने आणि रागाने पाहत राहिला.तिला काही बोलावे तर आणखीनच रडण्याचे कढ तिला आले असते. दांडेकरला वाटले स्त्रियांसाठी ईश्वराने केव्हाही अगदी सहज अश्रू ढाळण्याची ही कसली कंटाळवाणी तरतुद करून ठेवली आहे.
अशा या अशांत क्षणी सरोजिनीचे आगमन झाले.
बाळाने आपले रडणे तिला पाहून मध्येच थोडे थांबवले आणि नंतर ते परत बारीक सूरात रडू लागले.शेवटी एकदाचे तिने त्याला घेतले आणि शांत केले.मोलकरीण मुलीचे हुंदके थांबले.दांडेकरने परिस्थिती बायकोच्या हाती सोपवून हुश्श म्हटले.”
कथक पुढे पत्नीच्या येण्यामुळे दांडेकर कसा निश्चिंत होतो हे दाखवतो. विशेषतः पत्नीने जेवण वाढल्यावर तर तो अधिकच शांत होऊन स्थिर चित्ताने पत्नीच्या आपण घरी येण्याच्या वेळी बाहेर जाण्यामागचे कारण जाणून घेण्यासाठी उत्सुक होतो असे कथनातून वाचकांना कळते. याच प्रसंगात दांडेकर आणि त्याच्या पत्नीत संवाद असला तरी काहीतरी लपवाछपवी सुरू झाली आहे याची चाहूल कथक वाचकांना देतो.या प्रसंगातील जेवणघरातील पार्टिशनचे वर्णन आणि त्या पार्टिशनवरील देवदेवतांची चित्रे ही दांडेकरच्या व सरोजिनीच्या जीवनातील आश्वस्त करणारी पार्श्वभूमी आहे असे कथकाचे म्हणणे सूचक आहे. दांडेकर आणि त्याची पत्नी दोघेही श्रद्धाळू आहेत. परस्परांवरील त्यांचा विश्वास हा देवावरील श्रद्धेतूनच आला आहे असे कथकाला सुचवायचे आहे.या श्रद्धेलाच सरोजिनीच्या बदललेल्या वर्तनामुळे तडा जाऊ लागला होता. छोट्या-छोट्या गोष्टींत तिचे वागणे बदलू लागले होते. तिने दांडेकर घरी येण्याच्या वेळी घरात नसणे, स्वयंपाक तयार नसणे असो की तिने मुलींना पैसे देऊन बाहेरच खाऊ खायला प्रवृत्त करणे असो. वरवर या गोष्टी नगण्य वाटल्या तरी त्या नित्यनेम बिघडवणाऱ्या होत्या आणि म्हणूनच दांडेकरला अस्वस्थ करणऱ्या होत्या. दांडेकरसाठी सरोजिनी हा भावनिक आधार आहे. शाश्वततेची, सुरक्षिततेची सरोजिनी ही एक खूण आहे. त्याच्या संसाराचा पाया स्थिर ठेवणारी , त्याच्यावर निष्ठा ठेवणारी सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे पण तीच बदलू लागल्याची चाहूल वाचकांना कथक देतो. आपण तो प्रसंग पाहू…
“साधारण अर्ध्या तासाच्या अवधीत सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित झाली. चंद्रू झोपी गेला. मोलकरीण मुलगी अदृष्य झाली. तसे व्हावे ही दांडेकरची फारच तीव्र इच्छा होती.सरोजिनी त्याला जेवायला वाढण्यासाठी भाताला तुपाची फोडणी देऊ लागली होती आणि तळलेल्या बटाट्यांवर तिने खोबरे व कोथिंबिर घातली होती.
“आता फार वेळ नाही लागणार” सरोजिनी दांडेकरचा उत्साह वाढवत म्हणाली. खरं तर मी सगळा स्वयंपाक तयारंच ठेवला होता ..थोडं इकडेतिकडे काही ..ती बधिर झाल्यासारखी त्या छोट्याशा खोलीत लगबग करत होती.वाट्या, ताट मांडत ती अधूनमधून चुलीवरच्या भांड्यात पळी फिरवत होती….”जरा कुरकुरीत व्हायला हवेत ना काप म्हणून ते आधीच करून नाही ठेवले ..”
‘अगं , पण तू या अशा वेळी गेलीस तरी कुठे होती ?’ दांडेकरचा आवाज विचारताना कर्कश झाला. तिच्या येण्याने मिळालेला दिलाशाने धुसर झालेले इतर प्रश्न आता पुन्हा तक्रारीत रूपांतरीत होऊन पुढे सरकले.
हो ही योग्य वेळ नव्हती असं म्हणत सरोजिनी पानं वाढू लागली. “पण तुम्हाला तर माहिती आहे माणसं कशी असतात ते . ती नेहमीच स्वतःच्या सोयीचा विचार करतात, आणि माझ्या चुलत बहीणीने मला बोलावल्यावर ..”
“कोणती चुलत बहीण ?”
“राजम ..तिला वेळेत पाठवणं मला शक्य नाही झालं”
“कोणाला जमेल ? कसं बोलते ती बाई” दांडेकर चुकचुकला “पण तू कुठे गेली होतीस तिच्याबरोबर?”
“ फक्त बसस्टॉपपर्यंत. तिला आठवतंच नव्हता बसस्टॉप.”
“पन्नास वेळा तरी आली असेल ती इथे ..खरं तर तिच्याकडून इथे चालत यायला एक ताससुद्धा लागत नाही, लागतो का ? पाव मैल देखील नसेल अंतर !” तो आला तेव्हा घरात झालेली भयंकर परिस्थिती त्याने परत किरकिर सुरू केली.
“आम्हाला बससाठी थांबाव लागलं” सरोजिनी पटापट कामे उरकत होती. “पान वाढलं आहे”
तो तिच्या मागोमाग अरूंद जेवण घरात आला. तिथे दोन गुळगुळीत लाकडी बाकडी होती. सरोजिनीने हिरव्या केळीच्या पानावर,वाट्यांतून अन्न वाढलं होतं.या खोलीत दांडेकरला नेहमीच मोकळं वाटे.त्याला ही खोली कधीच अरूंद वाटत नसे,फक्त सणासुदीला नातेवाईक जमत तेव्हा ती खोली अरूंद वाटे पण मग तो गर्दीला दोष देई.या खोलीच्या भिंती ज्यावर स्वयंपाक घर आणि जेवणघराच्या मधला चार फुटाचा आडोसा(पार्टिशन) उभा केलेला होते त्या स्वयंपाकघरातून येणाऱ्या धुराने आणि तेलामुळे पिवळट,चिकट झाल्या आहेत हे देखील त्याच्या कधी लक्षात येत नसे.आणि तशीही त्या भिंतींवरची मोकळी जागा फारच थोडी होती.बहुतेक जागा देव-देवतांच्या चित्रांनी आणि तसबिरींनी व्यापलेलीच होती.या देव-देवता एखाद्या चित्रात एकेकट्या तर एखाद्या चित्रात घोळक्याने होत्या, एखाद्या तसबिरीत त्या स्वर्गातील न्यायसभेत न्यायनिवाडा करणाऱ्या दिसत होत्या तर एखाद्या चित्रात युद्ध करताना,तर एखाद्यात अद्भुतपणे समुद्राच्या लाटा भेदून किंवा पृथ्वीच्या पोटातून त्या जन्मलेल्या दिसत होत्या.दांडेकरला या एकाही रंगीत चित्रांतील प्रसंग वर्णन करून सांगता आले नसते पण चित्रे त्याला आवडत.ही चित्रे म्हणजे त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या जीवनातील परिचित आणि आश्वस्त करणारी पार्श्वभूमी होती.
सरोजिनी वाढंत होती.दांडेकर बाकड्यावर आरामाशीर नीट मांडी घालून बसला होता आणि रोजच्या सवयीने मुलींना हाका मारत होता.मग त्याला लक्षात आलं की त्यांच्यासाठी पाने वाढलेलीच नव्हती.आणि तो थांबला
“मुली ..” तो म्हणाला “त्यांची जेवणं झालीयंत का आधीच ?”
“होय.म्हणजे तसं नाही” सरोजिनी म्हणाली “मी त्यांना खाऊसाठी पैसे दिले होते त्यांना आता भूक नसणार ”
“खाऊसाठी पैसे”, दांडेकरने तेच शब्द पुन्हा उच्चारले “तुला माहीत होतंस दिसतंय की बससाठी तुला बराच वेळ थांबाव लागणार होतं”
“नाही हो” सरोजिनी पटकन म्हणाली “ते फक्त असंच
.. तुम्हाला माहिती आहे ना मुली कशा आहेत.त्यांना बाहेरचा खाऊ हवा असतो अधुनमधून घरच्या रोजच्या अन्नापेक्षा काहीतरी वेगळं वाटतं त्यांना ते”
“मला असा बदल कधीच नको वाटेल” दांडेकर उदारपणे म्हणाला. त्याला आता पुन्हा आनंदी, स्वस्थ वाटू लागलं होतं. “या उपहारगृहांत कोणते पदार्थ वापरत असतील सांगता येत नाही.. .स्वस्तातलं काहीतरी ,त्यांना तर फायदाच पाहायचा असतो नाही का ?ते कशाला आजच ऑफिसमधला पिल्लई मला सांगत होता …”
तो दिवसभरातल्या घटनांचा आढावा घेऊ लागला. हा उद्योग त्याला नेहमीच सुखकर वाटायचा. विशेषतः आता त्याच्या खोडसाळ मुली अनुपस्थित असताना त्याला हा आढावा घ्यायला आवडे.सरोजिनीच्या काही शंकाकुशंका ,प्रश्न नसत आणि ती एक चांगली श्रोता होती.”
अशाप्रकारे सरोजिनीने पुन्हा नेहमीसारखे आपले म्हणणे ऐकण्याची दाखवलेली आज्ञाधारक उत्सुकता दांडेकरला पुन्हा एकदा आपल्या संसारातील शाश्वततेचा, सुरक्षिततेचा प्रत्यय देणारी ठरते असे दाखवून कथनकाचा पहिला टप्पा संपवतो.
आपणही आजच्यासाठी इथेच थांबूया. पुढील ब्लॉगमध्ये आपण कमला मार्कंडेय यांच्या ‘ दी नोव्हेअर मॅन’ या दुसऱ्या कादंबरीचे कथानक समजून घेणार आहोत. आजचे लिखाण तुम्हाला कसे वाटले याबद्दलच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.
-गीता मांजरेकर
***********************************************************************************************************

यावर आपले मत नोंदवा