मागील ब्लॉगमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात तोरू दत्त आणि कृपाबाई सथीआनंदन या भारतीय स्त्रियांनी इंग्रजी भाषा शिकून त्यात कादंबरीलेखन करण्याचे जे धाडस दाखवले होते त्याबद्दल समजून घेतले. आता आपण स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेल्या पण स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रजी कादंबरीलेखन करणाऱ्या भारतीय कादंबरीकार महिलांचा परिचय करून घेणार आहोत.त्यात आज कमला मार्कंडेय यांच्या कादंबऱ्यांचा आढावा घेतला जाईल आणि क्रमशः पुढील ब्लॉग्जमध्ये त्यांच्या तीन निवडक कादंबऱ्यांचा साकल्याने परिचय करून दिला जाईल. वाचकांबरोबर श्रोत्यांनाही या लेखाचा आनंद घेता यावा म्हणून तो श्राव्य स्वरूपात पुढे उपलब्ध करून दिला आहे.

       भारतीयांपुढील इंग्रजी भाषेत साहित्यलेखनाचे आव्हान

स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी कादंबरी लेखन करताना ज्या आव्हानांना भारतीय किंवा देशांतरीत भारतीय स्त्रियांना सामोरे जावे लागले, त्यापेक्षा वेगळी आव्हाने स्वातंत्र्योत्तर काळाच्या प्रारंभी तरी इंग्रजी कादंबरी लेखन करणाऱ्या देशांतरीत भारतीय स्त्रियांसमोर उभी राहिली असावीत.त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या टप्प्यावर जेवढे भारतीय पुरूष इंग्रजी कादंबरी लेखन करण्यासाठी पुढे सरसावले त्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण अगदी नगण्य दिसते. आर.के.नारायण,मुल्कराज आनंद हे भारतीय कादंबरीकार स्वातंत्र्यपूर्व काळातच लिहू लागले होते आणि त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळातही बरीच वर्षे उत्तम लेखन केले.

 लेखिका लक्ष्मी होल्मस्ट्रॉम यांच्या मते , “१९३० च्या दशकातील लेखक भाग्यवान होते कारण अनेक वर्षांच्या वापरानंतर, इंग्रजी ही एक भारतीय भाषा बनली होती. तिचा व्यापकपणे आणि समाजाच्या विविध स्तरांवर वापर केला जात होता आणि म्हणूनच ते लेखक अधिक धैर्याने आणि अधिक सुरक्षित स्थानावरून प्रयोग करू शकले. ” 

कमला मार्कंडेय यांचा परिचय आणि साहित्यिक कर्तृत्वः

            इंग्रजी भाषा आत्मसात करणे  आणि त्याहूनही अधिक म्हणजे शैलीदार अशा इंग्रजीतून कादंबरीसारखी मोठी साहित्यकृती लिहिणे हे भारतीय स्त्रियांना मात्र स्वप्नवत वाटावे अशीच परिस्थिती स्वातंत्र्योत्तर काळातही  होती.त्यामुळे कमला मार्कंडेय या नावाने लेखन करणाऱ्या मूळच्या भारतीय पण पत्रकार व लेखक बनण्याच्या जिद्दीने ब्रिटनमध्ये देशांतर केलेल्या स्त्रीचे कादंबरीलेखन विशेष कौतुकास्पद ठरते.कमला मार्कंडेय यांचा आणि त्यांच्या साहित्यिक कामगिरीचा  थोडक्यात परिचय या ब्लॉगमध्ये करून घ्यायचा आहे.

           कमला पुर्णैया यांचा (जन्म २३ जून १९२४ -मृत्यू १६ मे२००४) रोजी तत्कालीन म्हैसूर संस्थानात झाला होता.हे वर्ष २०२४ म्हणजे खरं तर, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष.कमला या जन्मतःच बुद्धिमान होत्या.एका पुरोगामी विचारांच्या ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊनही इंग्रजीत कादंबरी लेखन करणे कमलासाठी मोठेच आव्हान ठरले.वडिलांची नोकरी रेल्वे खात्यात असल्याने आणि बदलीच्या गावी ते कुटुंबासह स्थलांतर करत असल्याने कमलाला लहानपणीच जवळजवळ अर्धा भारत पाहता आला.त्यांचे शालेय शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले पण पंधराव्या वर्षीच त्यांनी म्हैसूरमध्ये विद्यापीठीय शिक्षणास सुरूवात केली. परंतु पदवीपर्यंत शिक्षण त्यांना पूर्ण करता आले नाही.त्याचे एक कारण म्हणजे त्याच सुमारास दुसरे महायुद्ध सुरू झाले होते.पण दुसरे आणि महत्त्वाचे कारण हे होते की त्यांना पदवी घेण्यापेक्षा पत्रकार होण्यात स्वारस्य होते. पालकांकडून विरोध असतानाही त्यांनी आपले पत्रकारीतेचे ध्येय सोडले नाही. त्यांनी एका तत्कालीन प्रागतिक विचारांच्या नियतकालिकांत महायुद्धामुळे भारतीय समाजावर होणाऱ्या परिणामांबद्दल लेख लिहिले.पण ते नियतकालिक बंद पडल्या नंतर त्यांनी स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून नोकरी मिळवली.पुढे लष्करासाठी संपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काही काळ काम केले.मुक्त पत्रकारीता केली. याच काळात त्या सामाजिक कार्यात सक्रीय झाल्या आणि त्यांनी आपले अनुभव लघुकथांतून शब्दबद्ध करायला सुरूवात केली.त्यातील काही कथा प्रसिद्धही झाल्या. परंतु तरीही आपल्या आयुष्याला निश्चित दिशा मिळालेली नाही अशी खंत त्यांच्या मनात होती.महायुद्ध संपल्यावर कमलाने ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यायचे ठरवून गावात स्थलांतर केले. त्यावेळच्या अनुभवांनाच पुढे त्यांनी त्यांच्या ‘नेक्टर इन अ सिव्ह’(१९५४) या पहिल्या कादंबरीत अभिव्यक्त केले आहे.

          १९४८ मध्ये वयाच्या केवळ चोविसाव्या वर्षी  कमलाने एकटीने पत्रकारीत करण्यासाठी इंग्लंडला देशांतर करायचा निर्णय घेतला. तिथे गेल्यावर काही दिवसांतच त्यांना लक्षात आले की आपला तुटपंजा अनुभव व शिक्षण या जोरावर  आपले हे स्वप्न पूर्ण करणे खूपच कठीण आहे.घरून आर्थिक पाठिंबाही फारसा नसल्याने त्यांनी प्रारंभी मिळालेली एका वकिलाकडील  टंकलेखकाची नोकरी पत्करली.याच प्रतिकूल परिस्थितीत कमला यांनी तीन इंग्रजी कादंबऱ्यांचे लेखन केले पण त्यातील एक म्हणजे ‘नेक्टर इन अ सिव्ह’ तेवढी अनेक प्रकाशकांनी नकार दिल्यानंतर एकदाची एका प्रकाशकांनी स्वीकारली.कमला यांनी म्हटले आहे की त्यांना जणू प्रचंड संयम राखण्याचा धडा या अनुभवाने दिला.पुढेही असेच अनुभव दुर्दैवाने त्यांना त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशीत करताना येत राहिले.परदेशी प्रकाशकांची अपेक्षा असे की भारतीय समाजाचे अधिक गडद चित्रण लेखिकेने करावे पण कमला तसे करत नव्हती.तिच्या देखण्या छायाचित्रांचा वापर वाचकांना कादंबरीकडे आकर्षित करण्यासाठी आपण केला असे प्रकाशकांनी म्हटले आहे जे अपमानास्पद ठरते.दुसरीकडे कमलाचे लेखन हे तत्कालीन अमेरिकन लेखिका पर्ल बख हिच्या ‘गुड अर्थ’ या नोबेल पुरस्कारप्राप्त कादंबरीसारखेच आहे असाही आरोप तिच्या पहिल्याच कादंबरीवर करण्यात आला.खरं तर कमलाने भारतीय खेड्यातील जनजीवन आणि झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे ग्रामीण लोकांच्या वाटयाला आलेले विदारक वास्तव संयतपणे मांडले होते.’गुड अर्थ’ ही कादंबरी चीनमधील तत्कालीन ग्रामीण वास्तव मांडणारी होती. कमलाच्या कादंबरीत आणि ‘गुड अर्थ’ मध्ये साधर्म्य असेल तर ते फक्त हेच की ग्रामीण स्त्री ही दोन्ही कादंबऱ्यांच्या केंद्रस्थानी होती आणि तिचे कष्टप्रद जीवन दोन्ही कादंबऱ्यांत मांडले गेले होते.परंतु इंग्लंडमधील प्रकाशकांना फक्त बाजारपेठेत खपणारी लोकप्रिय ठरेल अशी कादंबरी हवी होती. ‘नेक्टर इन अ सिव्ह’ ही कमला मार्कंडेय यांची कादंबरी लोकप्रिय नसेल पण शैलीदार भाषा आणि व्यामिश्र कथानकामुळे ती निश्चितच एक अभिजात दर्जाची कादंबरी ठरते.मराठीतील उद्धव शेळके यांची ‘धग आणि रा.रं.बोराडे यांची ‘पाचोळा’ या कादंबऱ्या ज्यांना भावल्या असतील त्यांनी कमला मार्कंडेय यांची ‘नेक्टर इन अ सिव्ह’ ही कादंबरी जरूर वाचली पाहिजे.

          पुढे कमलाने बर्नाड टेलर या ब्रिटीश माणसाशी लग्न केले  आणि तिला किम ही मुलगी झाली. पण तरीही आपली ओळख कमला मार्कंडेय हीच असावी असा तिचा आग्रह असे.कमलाने ब्रिटनमध्ये आपला संसार थाटला असला तरी तिचे भारताशी नाते घट्ट होते. वेळ मिळेल तेव्हा ती भारतात येत राही आणि त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील बदलत्या वास्तवाशी तिची नाळ जुळलेली राहिली होती.तिच्या कादंबरी लेखनात त्यामुळेच समकालीनता जाणवत राहते.

‘नेक्टर इन दअ सिव्ह’ या कादंबरीनंतर कमलाने ‘सम इनर फ्युरी’, ‘अ सायलन्स ऑफ डिझायर’, ‘पझेशन’, ‘अ हॅंडफुल ऑफ राईस’, ‘दी कॉफर डॅम्स’, ‘दी नोव्हेअर मॅन’,’टू व्हर्जिन्स’ ,’दी गोल्डन हनिकोंब’, ‘शालिमार’ अशा कादंबऱ्या लागोपाठ लिहिल्या पण त्यानंतर  मात्र पतीनिधन आणि अन्य कौटुंबित ताणामुळे असेल तिच्या लेखनात सुमारे पंचवीस वर्षांचा खंड पडला. तिची शेवटची कादंबरी ‘बॉंबे टायगर’ ही २००८ साली तिच्या निधनानंतर प्रकाशित झाली.

  कमला मार्कंडेय यांच्या कादंबऱ्यांत ग्रामीण माणसांचा जीवनसंघर्ष दिसतो.विशेषतः ‘नेक्टर इन दी सिव्ह’, ‘हॅंडफुल ऑफ राईस’,’टू व्हर्जिन्स’, ‘शालिमार’ या कादंबऱ्यात असा संघर्ष आहे. त्याचे  स्वरूप मात्र कथानकानुसार वेगवेगळे होत गेले आहे. जसे ‘नेक्टर इन अ सिव्ह’ कादंबरीत रूक्मिणी आणि नाथन हे काबाडकष्ट करणारे शेतकरी जोडपे आहे. त्यांना एक मुलगी आणि चार मुलगे आहेत.शेतीतून येणाऱ्या उत्पन्नात सर्वांची पोटे भरणे अशक्य असल्याने दोन मुलगे गावातील टॅनरीमध्ये काम करतात. पुढे एक मुलगा टॅनरीतच काही सामान उचलताना पकडला जातो आणि पहारेकरी त्याला इतके मारतात की त्यातच तो मरतो. मुलीला तिचा नवरा मुल होत नाही म्हणून परत माहेरी पाठवतो.रूक्मिणीच्या ओळखीतून एक इंग्रज डॉक्टर मुलीवर उपचार करतो.रूक्मिणीचे दोन मुलगे सिलोनला कष्ट करायला निघून जातात तर एक म्हैसूरला कामाच्या शोधात जातो. शेतसारा दिला नाही म्हणून सावकार रूक्मिणी आणि नाथन यांची जमीन टॅनरीला विकून टाकतो आणि काहीच उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने ते दोघे मुलाला शोधत म्हैसूरला येतात. तिथे मुलगा बेपत्ता झाल्याचे त्यांना सुनेकडून कळते.दगडाच्या खाणीत काम करण्याची वेळ वृद्ध जोडप्यावर येते. त्यातच वृद्ध नाथनचा मृत्यू होतो. रूक्मिणी आपल्या मानलेल्या मुलाला पुट्टीला घेऊन परत गावी निघून जाते.असे कथानक असलेल्या या कादंबरीत कष्टप्रद संघर्षमय आयुष्यातही माणुसकीचे अमृत जपून ठेवणारी साधी-भोळी माणसे कमला मार्कंडेय यांनी रंगवली आहेत.

‘हॅंडफुल ऑफ राईस’ या कादंबरीत गावातील गरीबी आणि कष्टाला कंटाळून चैन्नईसारख्या शहरात उपजिवीकेच्या शोधात आलेला रवी हा  तरूण चोरीमारी करत जगत असताना शेवटी समाजकंटक गुंडाच्या टोळीत सामील होतो.आपलं लहान बाळ मात्र तो मरणापासून वाचवू शकत नाही असे कथानक आहे. तर ‘शालिमार’ या कादंबरीत शलिमार नावाचे हॉटेल बांधण्याच्या हेतूने एका समुद्राकाठच्या गावात आलेला टुल्ली नावाचा इंजिनीयर आणि गावातील मच्छिमार तरूण रिक्की यांची कशी दोस्ती होते. पण गावात हॉटेल आले तर गावातील मच्छिमार उद्योगाला धोका निर्माण होणार आहे . आधुनिक जीवनशैली आणि पारंपरिक जीवनपद्धती यांच्या संघर्षाची ही व्यामिश्र कथा कमला मार्कंडेय यांनी रंगवली आहे.तशाच प्रकारचा संघर्ष त्यांनी ‘कॉफर डॅम’ कादंबरीत देखील दाखवला आहे. धरण बांधण्याच्या कामावर नेमला गेलेला इंग्रज अधिकारी जंगलातील आदिवासींचे होणारे नुकसान लक्षात न घेता धरण बांधण्याचे काम पुढे रेटतो आहे. परंतु त्याची पत्नी मात्र संवेदनशीलतेने आदिवासींच्या अस्तित्वसंघर्षाची दखल घेते अशी ही कथा आहे. मराठीतील बा.सी.मर्ढेकरांची ‘पाणी’ ही कादंबरी ज्यांनी वाचलीअसेल किंवा विश्वास पाटील यांची ‘झाडाझडती’ ही कादंबरी ज्यांना आवडली असेल त्यांनी कमला मार्कंडेय यांची ‘कॉफर डॅम’ही कादंबरी देखील जरूर वाचावी.

‘टू व्हर्जिन्स’ या कादंबरीत ललिता आणि सरोजा या दोन ग्रामीण मुलींची कथा कमला मार्कंडेय मांडतात.ललिता दिसायला सुंदर आहे. तिच्या वडिलांनी तिला गावातल्या इंग्रजी माध्यमाच्या मिशनरी शाळेत शिकायला घातले आहे तर सरोजा दिसायला सामान्य आहे आणि सरकारी शाळेत शिकते आहे. ललिताला नेहमीच आपल्या सुंदर असण्याची जाणीव आणि गर्व आहे. आपण सिनेमात काम करावे असे तिला वाटते. गावात माहितीपट बनवण्यासाठी आलेल्या गुप्ता नावाच्या माणसाने तिला संधी दिल्याने ललिता शहरात पोहोचते पण तिथे गुप्ता तिला फसवतो आणि अवैध मार्गाला लावतो. सरोजाला पण ललितासारखे असावे असे लहानपणी वाटत असले तरी अंतःस्फुर्तीने ती मात्र योग्य मार्गाने जाते आणि स्वतःचा विनाश टाळते, असे कथानक ‘टू व्हर्जिन्स’ या कादंबरीत रंगवले आहे.मराठी चित्रपटातील गाजलेल्या अभिनेत्री शांता आपटे यांचे ‘जाऊ मी सिनेमात’ हे आत्मकथेसारखे छोटेसे पुस्तक आणि हंसा वाडकरांचे ‘सांगत्ये ऐका’ हे आत्मकथन मला टू व्हर्जिन्स ही कमला मार्कंडेय यांनी लिहिलेली कादंबरी वाचताना आठवले.आधुनिक जगातील झगमगाटाची, वलयांकीत क्षेत्रे स्त्रियांसाठी कशी आजही असुरक्षित आहेत हे आपल्याला माहीतच आहे.इंग्रजांनी आणलेली आधुनिक मूल्ये आणि तत्कालीन भारतातल्या खेड्यांतील पारंपरिक मूल्ये यांच्यातील संघर्ष टू व्हर्जिन्स या कादंबरीतून प्रभावीपणे समोर येतो.

‘पझेशन्स’ या कादंबरीत एक फ्रेंच स्त्री भारतात आली असता एका आदिवासी मुलाने काढलेली चित्रे पाहते आणि त्याला मोठा चित्रकार बनवण्याची संधी देण्यासाठी फ्रान्सला घेऊन जाते. मुलगा तिथे आधुनिक चित्रकला शिकतो आणि नाव कमावतो. पण शेवटी आपली मूळे ज्या भारतीय संस्कृतीत आहेत तिथे आणि ज्या आध्यात्मिक गुरूने त्याला चित्रकलेची प्रेरणा दिली तिथे तो परत येतो.आपण त्या मुलाला संधी दिली, शिक्षण दिले तरी त्याच्या आयुष्यावर मालकी सांगू शकत नाही याचे भान फ्रेंच स्त्रीला शेवटी येते असे कथानक कमला मार्कंडेय यांनी रंगवले आहे.मराठीतील प्रेमानंद गज्वी यांच्या ‘पांढरा बुधवार’ या नाटकात सवर्ण स्त्री आणि तिने सांभाळलेला दलित मुलगा यांच्यात हक्कावरून होणारा संघर्ष वाचकांनी पाहिला असेल तर कमला मार्कंडेय यांच्या पझेशन्स कादंबरीतील संघर्षही त्यांना कळू शकेल.

          भारतीय समाज वास्तव दाखवतानाच कमलाने आपल्या कादंबऱ्यांतून युरोपीय समाज वास्तव देखील दाखवायचा प्रयत्न केला आहे.विशेषतः  भारतीयांना  किंवा गौरेतर वंशीयांना ब्रिटीशांकडून मिळणारी दुय्यम वागणुक कशी त्रासदायक असते हे वास्तवही आपल्या ‘नोव्हेअर मॅन’ या कादंबरीत दाखवले आहे.अतिशय संयत ,प्रवाही आणि काहीशी मिश्किल भाषाशैली हे कमला मार्कंडेय यांच्या कादंबरीलेखनाचे वैशिष्ट्य ठरेल.

          कमला मार्कंडेय यांच्या ‘अ सायलन्स ऑफ डिझायर’, ‘नो व्हेअर मॅन’ आणि ‘बॉंबे टायगर’ या तीन कादंबऱ्यांचा सखोल परिचय मराठी वाचकांना पुढील ब्लॉगलेखनातून  क्रमशः करून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

-गीता मांजरेकर

**********************************************************************************

१ प्रतिसाद

  1. मराठी वाचक, विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी आपले हे लेखन अतिशय उपयुक्त आहे. वाचनासोबत आपल्या आवाजात ऐकण्याचा अनुभवदेखील आनंददायी आहे.

    Like

यावर आपले मत नोंदवा